ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचं निधन


ज्येष्ठ पत्रकार, लेखक, महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंद तळवलकर यांचं ह्यूस्टन (अमेरिका) येथे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांनी लोकसत्ता वृत्तपत्रातही सहाय्यक संपादक म्हणून काम पाहिले. त्यांची एकूण २५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास असणारे व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी वेळोवेळी केलेले सडेतोड लिखाण आजही वाचकांच्या स्मरणात आहे. तळवलकर यांना पत्रकारिकेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार, बी.डी.गोयंका, दुर्गारतन अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
www.berkya.com

गोविंद तळवलकरांचा जन्म डोंबिवली येथे २२ जुलै १९२५ रोजी झाला. शंकरराव देव यांच्या नवभारत या नियतकालिकापासून त्यांनी आपल्या पत्रकारितेला प्रारंभ केला असला तरी त्यांची दै. लोकसत्ता व दै.महाराष्ट्र टाइम्समधील कारकिर्द खऱ्या अर्थाने गाजली. दै.लोकसत्तामध्ये ते बारा वर्षे उपसंपादक म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र टाइम्सचे ते २७ वर्षे संपादक होते. गोविंद तळवलकर यांच्यावर एम.एन. रॉय यांच्या विचारांचा प्रारंभी विलक्षण प्रभाव होता. त्याचप्रमाणे नेहरुवादाचेही ते पाईक होते. उदारमतवादी विचारसरणीवर त्यांचा गाढा विश्वास होता. त्यांच्या लिखाणात ही सारी सूत्रे आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र टाइम्सचे संपादक झाल्यानंतर ते अतिशय प्रखर वैचारिक वृत्तपत्र बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. गोविंद तळवलकरांनी लिहिलेले अग्रलेख हे त्यातील लेखनशैली, विश्लेषण व मांडणीच्या दृष्टीने अप्रतिम असत. त्यांनी आपल्या लेखनाने वाचकांच्या दोन पिढ्यांचे वैचारिक भरणपोषण केले.

तळवलकर हे व्यासंगी वाचक होते. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयी कोणतेही महत्वाचे पुस्तक प्रकाशित झालेले असो ते गोविंद तळवलकर आवर्जून मिळवून वाचत. त्या पुस्तकांचा आपल्या लेख, अग्रलेखांतून वाचकांनाही ते परिचय करुन देत असत. महाराष्ट्राला व्यासंगी संपादकांची जी परंपरा आहे त्यामध्ये तळवलकर हे अग्रस्थानी होते. ह. रा. महाजनी यांच्या संपादकत्वाखाली लोकसत्तामध्ये काम करीत असताना तळवलकरांच्या विचार व लेखनाची बैठक अजून मजबूत झाली. त्यानंतर त्यांची महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून असलेली कारकिर्द विलक्षण गाजली. अंतुलेंनी केलेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण असो किंवा शिवाजीराव निलंगेकरांचे प्रकरण त्यावेळी गोविंद तळवलकरांनी लिहिलेल्या अग्रलेखाने राज्याच्या राजकारणात बदल घडून आले. शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून पुलोदचे सरकार स्थापन करण्याचा केलेला प्रयोग केला होता. त्याआधी तळवलकरांनी लिहिलेला `ही तो श्रींची इच्छा' हा अग्रलेख गाजला होता.

गोविंद तळवलकर यांनी आपले लेखन मराठीपुरते मर्यादित न ठेवता अनेक इंग्रजी नियतकालिके,वृत्तपत्रातही ते लेखन करीत असत.अगदी सात-आठ महिन्यांपूर्वीपर्यंत ते टाइम्स ऑफ इंडिया, एशियन एज, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाइन मॅगझिन यांसारखी विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांत लिहित होते. इतके सातत्याने व आशयगर्भ लिहिणारे संपादक म्हणूनही गोविंद तळवलकर अग्रस्थानी होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणावर त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. 


गोविंद तळवलकर यांचं प्रकाशित साहित्य
अग्निकांड :- “युद्धाच्या छायेत” ह्या स्तंभलेखनाचा पुस्तकरूपी संग्रह
इराक दहन :- सद्दाम हुसेन यांच्या पाडावाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेने पुकारलेल्या लढ्याची सखोल चिकित्सा
अफगाणिस्तान
नौरोजी ते नेहरू (1969)
बाळ गंगाधर टिळक (1970)
वाचता वाचता (पुस्तक परीक्षणांचा संग्रह, खंड 1 आणि 2) (अनुक्रमे 1979 आणि 1992)
परिक्रमा (1987)
अभिजात (1990)
बदलता युरोप (1991)
अक्षय (1995)
ग्रंथ सांगाती (1992)
डॉ. झिवागोचा इतिहास (लेख ललित दिवाळी अंक, 2015)
नेक नामदार गोखले
पुष्पांजली (व्यक्तिचित्रे, मृत्युलेख संग्रह)
प्रासंगिक
बहार
मंथन
शेक्सपियर – वेगळा अभ्यास (लेख – ललित मासिक, जानेवारी 2016)
सत्तांतर (खंड 1-1977 , 2-1983, व 3-1997)
सोव्हियत साम्राज्याचा उदय आणि अस्त (खंड 1 आणि 2)

गोविंद तळवलकर यांना मिळालेले पुरस्कार
पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी “दुर्गा रतन” व “रामनाथ गोयंका” पुरस्कार
लातूर येथील दैनिक एकमत पुरस्कार
न.चिं केळकर पुरस्कार (“सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त” पुस्तकासाठी)
इ.स. 2007 चा जीवनगौरव पुरस्कार
लोकमान्य टिळक पुरस्कार
सामजिक न्यायाबद्दल रामशास्त्री पुरस्कार