दैनिक भास्कर समुहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांचे निधन

अहमदाबाद/भोपाळ - दैनिक भास्कर वृत्तपत्र समुहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांचे बुधवारी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. रमेशचंद्र अग्रवाल हे दिल्लीहून अहमदाबादला आले होते. विमानतळावर छातीत दुखायला लागल्यानंतर त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले, त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रमेशचंद्र अग्रवाल यांच्या निधनाच्या वृत्तावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, भास्कर समुहाचे चेअरमन श्री रमेश अग्रवाल यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. संवेदनशील आणि तत्काळ निर्णय घेणारे म्हणून ते स्मरणात राहतील. श्री. रमेश अग्रवाल यांच्या आत्म्याला शांती आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वराने प्रदान करावी अशी प्रार्थना मी करतो. श्री रमेश अग्रवालजींचे कुटुंबीय आणि भास्कर समुहाप्रती मी संवेदना व्यक्त करतो. मध्य प्रदेशने खरंच आज एक अनमोल रत्न गमावला आहे.
- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला. रमेश अग्रवालजी यांच्या दुर्दैवी आणि आकस्मिक निधनाने धक्का बसला. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ, असे प्रभूंनी ट्वीटमध्ये पोस्ट केले.
- रमेशजींच्या निधनाचे वृत्त कळताच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. श्रद्धांजली अर्पण केली.

देशातील 50 शक्तीशाली व्यक्तींमध्ये समावेश
- रमेशचंद्र अग्रवाल यांनी भोपाळ विद्यापीठातून राज्यशास्त्राची पदवी पूर्ण केली होती. पत्रकारितेत त्यांना राजीव गांधी जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
- 2003, 2006 आणि 2007 मध्ये इंडिया टुडेने त्यांचा समावेश भारतातील 50 सर्वात शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत केला होता.

1958 पासून केली होती सुरुवात
- रमेश अग्रवाल यांच्या नेतृत्त्वातच भास्कर समुहाने यशाचे शिखर गाठले. त्यांनी 1958 मध्ये मध्य प्रदेशात दैनिक भास्करचा पाया ठेवला. आज देशातील 14 राज्यांत या वृत्तपत्राच्या 62 आवृत्ती आहेत.
- रमेशजी यांच्या नेतृत्त्वातच समुहाने हिंदी वृत्तपत्र दैनिक भास्कर, गुजराती वृत्तपत्र दिव्य भास्कर, इंग्रजी वृत्तपत्र डीएनए, मराठी वृत्तपत्र दिव्य मराठी, रेडिओ चॅनल माय एफएम आणि डीबी डिजिटलला मीडिया जगतात अव्वल स्थानी पोहोचवले.