मुंबई - दिनांक ९ मेच्या बहुतेक आघाडीच्या वर्तमानपत्रात एबीसीच्या पत्रकार परिषदेची एक बातमी पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिध्द करण्यात आली आहे. मराठी वृत्तपत्रांचा खप वाढत असल्याची ही गुड न्यूज सगळ्यांनीच मनापासून प्रसिध्द केली आहे. दहा वर्षात सरासरी ८० टक्के वाढ झाली असल्याचे या न्यूजमध्ये म्हटले आहे, मराठी वर्तमानपत्राचा खप वाढत असेल तर त्याचा आनंद बेरक्यालाही निश्चित आहे. परंतु एबीसीच्या पत्रकार परिषदेची बातमी देताना त्यामध्ये गेल्या दहा वर्षाचा हवाला दिला आहे. खपाच्या वाढीचा हवाला देताना तो गेल्या तीन वर्षातील दिला असता तर वस्तुस्थिती नेमकी काय आहे, याचा अंदाज आला असता.
तीन वर्षात सोशल मीडियाचे आक्रमण इतक्या वेगाने झाले आहे की न्यूज ही संकल्पनाच त्यामुळे बदलून गेली आहे. दहा वर्षाचा हवाला दिला असल्याने सुरूवातीच्या पाच वर्षात वर्तमानपत्रचा खप वाढला असेलही. परंतु त्यानंतरच्या पाच वर्षात खप इतका घसरला आहे की आघाडीच्या वर्तमानपत्राच्या मालकांनी छातीवर हात ठेऊन ठाम पणे सांगावे की खप घसरला की वाढला. वस्तुस्थिती नेमकी झाकून ठेऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करून आघाडीची वर्तमानपत्रे जर खप वाढल्याची आवई उठवत असतील तर त्याचा दुष्परिणामच होणार आहे, घसरणाऱ्या खपाची कारणे अनेक आहेत. त्या कारणाचा शोध घेण्याऐवजी एबीसीच्या पत्रकार परिषदेची न्यूज चालाखीने छापून समाधान मानणाऱ्या या लोकांना काय म्हणावे? आता बेरक्याचे एकच आवाहन सगळ्या आघाडीच्या वर्तमानपत्रांना आहे की त्यांनी गेल्या तीन वर्षातील खपावर आधारीत एक वस्तुनिष्ठ न्यूज द्यावी आणि नेमका खप वाढला आहे की घसरला आहे, याची माहिती वाचकांना द्यावी. दहा वर्षाचा हवाला देऊन वाचकांचा संभ्रम वाढवू नये.
खप वाढल्याची न्यूज वाचून किंवा जाहिरात पाहून वाचकांची संख्या वाढत नसते, हे लक्षात ठेवावे. वर्तमानपत्रांची संख्या एका बाजुला वाढत आहे, परंतु दुसऱ्या बाजुला वाचक काही वाढताना दिसत नाही. फक्त तो या वर्तमानपत्रावरून त्या वर्तमानपत्रावर डायव्हर्ट होत आहे. हेही लक्षात घ्यायला हवे.