गावकरी बंद, आदर्श गावकरी सुरु !

औरंगाबाद - गावकरीची औरंगाबाद आवृत्ती पुन्हा एकदा बंद पडणार असून, आता गावकरी ऐवजी "आदर्श गावकरी" सुरु होणार आहे. आदर्श गावकरीचे कार्यालय आहे त्याच ठिकाणी राहणार असून, प्रिटिंग मात्र लोकपत्र किंवा सांजवार्ता मध्ये होणार आहे. आदर्श गावकरीच्या कार्यकारी संपादकपदी अभय निकाळजे यांची नियुक्ती करण्यात आली असून, जुनी सर्व टीम बदलण्यात येत आहे. नवीन भरती सुरु करण्यात आली आहे.
नाशिकचे वंदन पोतनीस यांच्या मालकीचे गावकरी वृत्तपत्र आहे. १० वर्ष औरंगाबाद आवृत्ती सुरु होती, मात्र आर्थिक अडचणीमुळे औरंगाबाद आवृत्ती बंद पडली होती. त्याला आदर्श ग्रुपचे अंबादास दादा मानकापे - पाटील यांनी उर्जित अवस्था प्राप्त करून दिली. मध्यस्थ होते, डॉ. अनिल फळे. ८ जून २०१६ रोजी गावकरी पुन्हा सुरु झाला. खोकडपुरा येथील जुन्या प्रिंटींग मशीनवर नवे पार्ट बसवून प्रिंटींग सुरु झाली. लातूर, उस्मानाबाद, नांदेड करीता लातूरच्या एकमत मधून अंक छापले जात होते. गावकरीने विविध अंक काढून तसेच विविध कार्यक्रम घेऊन चर्चा घडवून आणली.डॉ. अनिल फळे, दिनेश हारे, नितीन गायकवाड आदींनी गावकरी चर्चेत आणला.  
भागीदारी संपुष्टात
आदर्श  ग्रुपची गावकरी बरोबर असलेली भागीदारी एक वर्षानंतर संपुष्टात आली आहे. आदर्श  ग्रुपने स्वतःच्या मालकीचे आदर्श गावकरी हे टायटल आणले आहे. याच नावाने आता एक आठवड्यात आदर्श गावकरी सुरु होणार आहे. आदर्श गावकरी चे कार्यकारी संपादक म्हणून अभय निकाळजे जॉईन झाले आहेत. निकाळजे अनेक वर्ष सकाळमध्ये होते. नंतर ते पुढारीत गेले होते. पुढारीला सोडचिठ्ठी देवून त्यांनी आदर्श गावकरी जॉइन केला  आहे.
 आदर्श  ग्रुपचे सीईओ महावीर देवसाळे यांनी आदर्श गावकरीची संकल्पना मांडली आणि मालक अंबादास दादा मानकापे - पाटील यांनी  त्याला अनुमती दिली. आदर्श गावकरी मध्ये डॉ. अनिल फळे , दिनेश हारे, नितीन गायकवाड हे राहणार नाहीत, अशी माहिती आहे.गावकरी मध्ये उभी फूट पडल्यामुळे जुनी टीम अस्वस्थ आहे. अनेकांना नारळ देण्यात आला आहे.आदर्श गावकरी सुरु झाल्यानंतर मूळ गावकरी बंद पडणार आहे.
महावीर देवसाळे पूर्वी सकाळ मध्ये अनेक वर्ष युनिट हेड होते. सकाळची जुनी टीम त्यांनी आदर्श गावकरी मध्ये आणली आहे. अभय निकाळजे आणि महावीर देवसाळे काय चमत्कार करणार याकडे लक्ष वेधले आहे.