दर्डांना जडलाय भस्म्या ...

`एमआयडीसी'चे नऊ भूखंड हडपूनही बाबूजी भुकेले!
मुंबई : "लोकमत वृत्तपत्र समूहा'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तथा माजी खासदार विजय दर्डा यांना भस्म्या रोग जडला आहे. कोळसा काय? भूखंड काय ? त्यांचा स्वाहाकार चालूच आहे. कितीही खाल्ले तरी भूक शमत नाही, अशा आजारास भस्म्या म्हणतात. या भस्म्या रोगावर जालीम आणि रामबाण उपाय मुख्यमंत्री नावाच्या डॉक्‍टरकडे असल्याचे समजते. मात्र, हे डॉक्‍टर दर्डांना पोलिस कारवाईचे इंजेक्‍शन देवून त्यांचा आजार बरा करायला तयार नाहीत. या भस्म्या रोगाला आळा बसावा यासाठी विदर्भातील सामाजिक कार्यकर्ते पंकज ठाकरे राज्यपाल विद्यासागर राव यांना भेटून दर्डांवर योग्य ते उपचार केले जावेत, यासाठी आग्रह धरणार आहेत. तसेच त्यासाठी आवश्‍यकता भासल्यास न्यायालयाची पायरी चढून याचिकाही दाखल करणार आहेत. 
दोन महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते पंकज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह दर्डा यांच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला होता. विजय दर्डा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राजकीय पदाचा गैरवापर करीत नागपूर येथील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात तब्बल नऊ भूखंड अनधिकृतरित्या गिळंकृत केल्याचा आरोप केला होता. दर्डा यांच्यावर कारवाई झाली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी त्या वेळी दिला होता.
या गैरव्यवहारप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. पण तरीही दर्डा कुटुंबीयांवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे आता आम्ही राज्यपालांकडे तक्रार दाखल करण्याबरोबरच न्यायालयातही लवकरच याचिका दाखल करणार आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले.
दर्डा यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळात हे बहुतांश भूखंड हडप केले आहेत. एक भूखंड हडपताना दुसऱ्या भूखंडाविषयीची माहिती लपवून ठेवायची आणि सतत भूखंड हडप करायचे, असे प्रकार दर्डा कुटुंबीयांनी केले आहेत. यासाठी त्यांनी एमआयडीसीचे अधिकारी, तत्कालीन उद्योगमंत्री यांच्याशी संधान साधून हे भूखंड हडपल्याचे कागदपत्रांतून दिसून येत आहे.
अपंग, मतिमंद मुलांसाठी राखीव असलेला भूखंडही दर्डा कुटुंबीयांनी हडपला आहे, असेही ठाकरे म्हणाले. दर्डा यांचे हे भूखंड प्रकरण अत्यंत गंभीर आहे. फडणवीस सरकारकडून या प्रकरणी कारवाई होईल, असे आम्हाला वाटले होते; पण कारवाई करण्यास सरकारकडून अक्षम्य दिरंगाई होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आपण सतत पाठपुरावा करणार असल्याचेही ठाकरे म्हणाले.
भूखंडांचे श्रीखंड (एकूण 40 एकरांचा गैरव्यवहार)
1) भूखंड क्र.बी -192 : 40,000 चौ.मी चे (10 एकर) मे. लोकमत मीडिया लि. ला वाटप
2) भूखंड क्र. बी-192/1 : 16000 .88 चौ.मी (4 एकर) रचना दर्डा यांच्या मे. मीडिया वर्ल्ड एंटरप्रयाझेसच्या नावे
3) भूखंड क्र.192 पार्ट : 16000 चौ.मी चे (4 एकर) लोकमत न्यूज पेपरच्या नावे
4) भूखंड क्र .बी 207 : 6790 चौ.मी.चे (1.69 एकर) वाटप लोकमत न्यूज पेपर लि.
5) भूखंड क्र. बी-208 : 1800 चौ.मी.चे (अर्धा एकर) वाटप वीणा इन्फोसिस या नावे
6) भूखंड क्र.आरएच -18 : 51750 चौ.मी. (सुमारे 13 एकर) वाटप लोकमत कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था यांच्या नावे निवासी प्रयोजनासाठी
7) भूखंड क्र पी - 60 : 3997.30 चौ.मी.चे (एक एकर) वाटप जैन सहेली मंडळाला
8) भूखंड क्र. पीएल 7 : 16 हजार चौ.मी.चे (चार एकर) वाटप लोकमत समूहाच्या कामगारांसाठी
9) भूखंड आर.एक्‍स. 1 : 6 हजार चौ. मी. (दीड एकर) वर दर्डा परिवाराचे भव्य गेस्ट हाउस आहे.
 
सरकारनामा वरून