दूध का दूध पानी का पानी ...

बरोबर सहा वर्षे, एक महिना आणि सहा दिवसांपूर्वी म्हणजे 11 मे 2011 रोजी मी आणि माझ्या सहकार्‍यांवर येथील विजापूर नाका पोलीस ठाण्यात लाच देण्याचा प्रयत्न करणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आदी आरोपांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी फिर्याद दिली होती विजापूर नाका पोलीस ठाण्याचेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामुगडे यांनी. पोलीस ठाणे त्यांचेच, फिर्यादी ते स्वत:च, गुन्ह्यातील साक्षीदार सर्वजण त्याच पोलीस ठाण्याचे दुय्यम अधिकारी आणि कर्मचारी. या गुन्ह्याचा तपास करणारेसुध्दा याच ठिकाणचे पोलीस अधिकारी. लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार लाचेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास स्थानिक पोलिसांनी न करता तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवणे आवश्यक असते. मात्र याठिकाणी रामुगडेसाहेब आणि त्यांच्या वरिष्ठांनी तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवलाच नाही. कारण त्यांनी आमच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला होता, अशावेळी हा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवला असता तर रामुगडेसाहेब आणि त्यांच्या वरिष्ठांचे पितळ उघडे पडले असते. त्यासाठी त्यांनी हा खटाटोप केला होता.
जेव्हा याच मुद्यावरून मी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली तेव्हा न्यायालयाने दणका देताच रामुगडेसाहेब आणि त्यांच्या वरिष्ठांची अक्षरश: सोलापूर ते मुंबई अशी धावपळ उडाली. अधिकार आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई का करू नये? अशी विचारणा उच्च न्यायालयाकडून होताच या अधिकार्‍यांची घाबरगुंडी उडाली. शेवटी उच्च न्यायालयापुढे बिनशर्त लेखी माफीनामा सादर केल्यामुळे हे पोलीस अधिकारी बचावले.
मित्रांनो, या प्रकरणात आम्हाला पोलिसांनी जाणीवपूर्वक गुंतवले होते. या घटनेपूर्वी मी माझ्या ‘सुराज्य’ या दैनिकातून सोलापूर शहर पोलिसांच्या कार्यपध्दतीवर परखड, सडेतोड लिखाण केले होते. त्यामुळे पोलिसांची दुकानदारी बंद पडली होती. म्हणून पोलीस माझ्यावर आणि ‘सुराज्य’वर चिडून होते. मला अडकावण्याची ते संधीच शोधत होते. पण मी सरळ, स्वच्छ, पारदर्शी आणि प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळे पोलिसांच्या तावडीत कधी सापडलोच नाही. माझ्या दुर्दैवाने आणि पोलिसांच्या सुदैवाने 11 मे 2011 रोजी एका असाध्य रोगाने पछाडलेल्या युवकाची कैफियत घेऊन मी विजापूर नाका पोलीस ठाण्याला गेलो आणि आयताच पोलिसांच्या तावडीत सापडलो. त्या रुग्णाच्या जागेवरचे वीज मीटर चोरीला गेले होते. त्याची फिर्याद दाखल करून घेऊन फिर्यादीची प्रत देण्यासाठी विजापूर पोलीस ठाणे अंकित औद्योगिक चौकीचे पोलीस पैसे मागत होते. ते देणे त्या रुग्णाला शक्य नव्हते. म्हणून या कामी मदतीची याचना पत्रकार या नात्याने त्या रुग्णाने माझ्याकडे केली होती. मी माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी या प्रकरणात सहभाग घेतला आणि पोलिसांच्या पूर्वरोषाला बळी पडावे लागले. मी त्या दिवशी फोनवरून रामुगडेसाहेबांना संपर्क साधून त्यांना औद्योगिक चौकीच्या पोलिसांचा प्रताप सांगितला. तेव्हा रामुगडेसाहेबांच्याच बोलावण्यावरून मी माझ्या सहकार्‍यांसह पोलीस ठाण्यात गेलो. त्याठिकाणी आमची तक्रार ऐकून घेऊन औद्योगिक चौकीच्या पोलिसांवर कारवाई करण्याऐवजी उलट आमच्यावरच रामुगडेसाहेब यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा खुद्द रामुगडेसाहेब यांनीच दाखल केला. प्रत्यक्षात त्या रुग्णाकडे लाचेची मागणी करत होते ते औद्योगिक चौकीचे पोलीस, लाच देण्याची आमची इच्छा आणि त्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती नव्हती म्हणून मी त्या पोलिसांची तक्रार करण्यासाठी त्यांचे वरिष्ठ असणार्‍या रामुगडेसाहेबांकडे गेलो. तेव्हा त्यांनीच तक्रार देण्यासाठी पूर्वपरवानगी घेऊन गेलेल्या माझ्यासारख्या पत्रकारावर त्यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात मला तसा प्रचंड त्रास झाला. पत्रकार म्हणून ज्या समाजात ताठ मानेने प्रामाणिकपणे काम केले; त्याच समाजात ‘आरोपी’ म्हणून वावरण्याची वेळ पोलिसांनी माझ्यावर आणली. इतरवेळी इतरांसाठी पळणार्‍या माझ्यासारख्या पत्रकाराला पोलिसांनी कोर्टकचेरीच्या फेर्‍यात अडकावले होते. एवढ्यावरच न थांबता मी आणि आमचे संपादक महोदय आदरणीय राकेश टोळ्ये सरांवर याच रामुगडेसाहेबांनी पोलीस खात्यासंदर्भातील वृत्त प्रसिध्द करून पोलिसांमध्ये अप्रितीची भावना चेतावल्याचा दुसरा एक गुन्हा दाखल केला. त्रास देण्याची एकही संधी त्यावेळी पोलिसांनी सोडली नाही.
आम्हाला पत्रकारितेतून संपवण्याचाच घाट पोलिसांनी घातला होता. पण आमच्यावर विश्‍वास असणारे ‘सुराज्य’चे तमाम वाचक, हितचिंतक, सोलापूरकर, सोलापुरातील पत्रकार, पत्रकार संघटना आणि त्यावेळचे शहरातील आमदार दिलीप माने, विजयकुमार देशमुख, प्रणिती शिंदे, माजी आ. आडम मास्तर यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांनी आमच्या पाठीशी आपली ताकद उभी केली. त्यामुळे आम्हाला पहिल्यापेक्षाही अधिक बळ आले. ही ताकद खचून न जाता पुन्हा एकदा भरारी घेण्याची उभारी देऊन गेली. म्हणून आम्हीही उठलो संघर्ष करण्यासाठी. दुसर्‍यांवरील अन्यायाच्याविरोधात आवाज उठवणारे आम्ही पत्रकार आमच्यावरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सिध्द झालो.
सोलापूरच्या सेशन कोर्टापासून मुंबईच्या हायकोर्टापर्यंत न्यायासाठी लढा दिला. शेवटी या लढ्याला यश आले. पोलिसांनी आमच्याविरोधात दाखल केलेला खटला हा पोलिसांचा कल्पनाविलास असून खोट्याचे खरे करण्यासाठी पोलिसांनी केलेला बनाव आहे, हा खटला विश्‍वास ठेवण्यालायक नाही, असे मत नोंदवून न्यायालयाने आम्हाला निर्दोष मुक्त केले. आमची बाजू सत्याची होती म्हणून न्यायालयाने आम्हाला साथ दिली. दूध का दूध, पानी का पानी केले. सहा वर्षांपासून आमच्या कपाळी लागलेला कलंक न्यायालयाने पुसून टाकला.
या संपूर्ण संघर्षाच्या वाटेवर वडीलकीच्या नात्याने आमचे संपादक महोदय आदरणीय टोळ्ये सर माझ्या पाठीमागे डोंगरासारखे खंबीरपणे उभे राहिले. किंबहुना या संपूर्ण खटल्यात ते माझ्यामागे सावलीसारखे सातत्याने वावरले. त्यांची भक्कम साथ आणि न्यायालयाने दिलेला ‘न्याय’ यामुळे माझ्या माथ्यावर लागलेला ‘आरोपी’ हा डाग पुसला गेला.
- राजकुमार नरूटे
 (कार्यकारी संपादक, दैनिक सुराज्य, सोलापूर)