गौरी लंकेश हत्येचा मुंबईत तीव्र निषेध

मुंबई - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या भ्याड हत्येचा आज मुंबईतील विविध पत्रकार संघटनांनी एकजुटीने निषेध केला. मुंबई प्रेस क्लबने निषेधासाठी आयोजित केलेल्या 'मेणबत्ती जागरा'ला मोठ्या संख्येने पत्रकारांची उपस्थिती होती. निषेधाच्या घोषणा तसेच फलक झळकावत यावेळी पत्रकारांनी या कृत्याचा निषेध केला. गौरी लंकेश यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध होत आहे. दिल्ली, मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये या हत्येविरोधात निदर्शने करत विविध पत्रकार संघटना, सामाजिक संघटनांनी निषेध नोंदवला. मुंबईत प्रेस क्लबचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या उपस्थितीत प्रेस क्लबजवळ तीव्र निदर्शने करण्यात आली.





गौरी लंकेश यांच्या हत्येचा मुंबई मराठी पत्रकार संघाकडून निषेध

मुंबई: निर्भिड  पत्रकार गौरी लंकेश यांच्या भ्याड हत्येचा मुंबई मराठी पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध केला आहे.
प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वाबळे यांनी म्हटले आहे की, 'गौरी लंकेश पत्रिके' या साप्ताहिकाच्या संपादिका असलेल्या गौरी लंकेश या निर्भिड आणि परखड लिखानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांच्या या लिखानाने पिसाळलेल्या माथेफिरु प्रवृत्तीनेच त्यांचा बळी घेतला असावा असे दिसते. एका असहाय्य महिलेला एकांतात गाठून तिची निर्घूण हत्या करणे यासारखा दुसरा भ्याडपणा कोणता असू शकतो? पण व्यक्ती मारल्याने विचार मरत नसतात.
दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या विचारवंतांची हत्या करणारे आरोपी अद्यापही मोकाट असताना गौरी लंकेश यांची झालेली हत्या धक्कादायक आहे. या हत्येची कसून चौकशी करुन आरोपींना त्वरीत गजाआड करावे अशी आमची मागणी आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ या भ्याड हत्येचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे.