बीड - गेवराई येथील पत्रकार व ‘सकाळ’चे बातमीदार जगदीश बेदरे यांनी भूमाफियांकडून झालेल्या फसवणुकीमुळे मानसिक खच्चीकरण झाल्याने बुधवारी (ता. २०) आत्महत्या केली. साधारण परिस्थिती असलेल्या बेदरे कुटुंबीयांच्या मदतीसाठी आता अनेकांनी हात पुढे केले आहेत.
जगदीश बेदरे आत्महत्या प्रकरणातील आरोपी दादा घोडके अद्याप फरारी असून कृष्णा मुळे न्यायालयीन कोठडीत आहे. दादा घोडकेच्या अटकेच्या मागणीसाठी पत्रकार आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान, जगदीश बेदरे यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची परवड होऊ नये यासाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आहे. विधान परिषद सदस्य तथा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी जगदीश बेदरे यांच्या दोन्ही मुलांचे शिक्षणाचे पालकत्व स्वीकारले आहे. तसेच गणेश बेदरे, माजी उपनगराध्यक्ष रघुनाथ बेदरे, राजेंद्र बेदरे, बप्पासाहेब बेदरे, सिनू बेदरे, ऋषिकेश बेदरे आदी त्यांच्या सध्याच्या राहत्या घरालगत नवीन घरखोली बांधून देणार आहेत. तर गेवराई तालुका पत्रकार संघ व राज्य पत्रकार संघाच्या गेवराई शाखेच्या पुढाकाराने त्यांच्या मुलीच्या नावे बॅंकेत फिक्स डिपॉझिट करणार आहे. दरम्यान, या आत्महत्येप्रकरणातील दुसरा फरार आरोपी दादासाहेब घोडके याला पोलिसांनी दोन दिवसांत अटक न केल्यास गेवराई तालुका पत्रकार संघ पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करणार आहे.
परळी पत्रकार संघाचे निवेदन
बेदरे यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या फरार आरोपीला त्वरित अटक करून या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी परळी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. बुधवारी (ता.२७) येथील शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक श्री. मानकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी परळी संघाचे तालुकाध्यक्ष संजय खाकरे, कार्याध्यक्ष रामप्रसाद शर्मा, शहराध्यक्ष मोहन साखरे, प्रकाश सूर्यकर, राजेश साबणे, रामप्रसाद गरड, प्रकाश चव्हाण, प्रशांत जोशी, ओमप्रकाश बुरांडे, आत्मलिंग शेटे, जगदीश शिंदे, धीरज जंगले, गोपाळ आंधळे, लक्ष्मण वाकडे, प्रा. रवींद्र जोशी, धनंजय आढाव, अनंत कुलकर्णी, मोहन व्हावळे, धनंजय आरबुने, संभाजी मुंडे, किरण धोंड, महादेश शिंदे, संतोष जुजगर, प्रवीण फुटके, महादेव गित्ते, शेख मुकरम आदी उपस्थित होते.
घोडकेला अटक करण्याची मागणी
पत्रकार जगदीश बेदरे यांच्या आत्महत्येच्या घटनेला आठ दिवस उलटूनही या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि दादा घोडकेला अटक करण्याची मागणी आष्टी येथील पत्रकारांनी बुधवारी (ता. २७) तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. पत्रकार जगदीश बेदरे प्रकरणातील आरोपींना काही पक्ष आणि नेत्यांकडून पाठबळ मिळत असल्याचा आरोपही निवेदनात केला आहे. निवेदनावर उत्तम बोडके, बबन पगारे, दत्ता काकडे, शरद तळेकर, भीमराव गुरव, अण्णासाहेब साबळे, अशोक मुरकुटे, अविनाश कदम, अनिरुद्ध धर्माधिकारी, मुझाहिद्दीन सय्यद, अविशांत कुमकर, गणेश दळवी, सचिन रानडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.