५१ लाख व्हिजिटरचा टप्पा पूर्ण

मराठी मीडियाची बित्तंबातमी देणाऱ्या बेरक्या ब्लॉगने ५१ लाख व्हिजिटरचा टप्पा पूर्ण केला आहे. हे केवळ आणि केवळ बेरक्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य वाचकांमुळे शक्य झाले आहे.  याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत.
२१ मार्च २०११ रोजी आम्ही बेरक्या ब्लॉग सुरु केला.त्यानंतर हा ब्लॉग गेल्या साडेसहा वर्षांपासून अखंडित सुरु आहे. सुरुवातीला विश्वास निर्माण करण्यास वेळ गेला, पण जेव्हा विश्वास निर्माण केला तेव्हा बेरक्यावरील बातमी म्हणजे १०१ टक्के खरी असते, हे सिद्ध  केले आहे. ५१ लाख व्हिजिटरची आकडेवारी ही  काही बोगस नाही.गुगल ब्लॉगरच्या Configure Stats Widget ने काढलेली आकडेवारी आहे..

बेरक्या ब्लॉग सर्व वृत्तपत्रातील कर्मचारी, चॅनलचे कर्मचारी, त्यांचे मालक, संपादक, पत्रकारितेतील विद्यार्थी, शासकीय अधिकारी आणि  कर्मचारी, पोलीस, आमदार, मंत्री वाचतात, हे एका सर्व्हेवरून सिद्ध झाले आहे.

मराठी मीडियातील प्रत्येक अपडेट देण्याबरोबर चांगल्या पत्रकाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे काम बेरक्याने केले आहे.त्याचबरोबर अनेक गरीब पत्रकारांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे कामही बेरक्याने केले आहे. मराठी मीडियातील घडामोडी, पडद्यामागच्या हालचाली, माहितीपूर्ण लेख देणायचे काम बेरक्याने प्रामाणिकपणे केले आहे.

जे चुकले त्यांच्या विरुद्ध बातमी देताना बेरक्याने कोणाचाही मुलाहिजा ठेवला नाही. नेहमीच निर्भीड आणि सडेतोड बातम्या दिल्या. बेरक्याचा कोणीही शत्रू नाही. जे चुकले  त्यांना त्यांची चुक दाखवण्याचा प्रयत्न केला. यातून अनेकांनी बोध घेतला.

बेरक्याविरुद्ध  अनेक वेळा पोलिसामध्ये खोट्या तक्रारी  करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र बेरक्या त्यांना पुरून उरला. खरी बातमी देणे हा काही गुन्हा नाही.आम्ही गुन्हेगार नाही , त्यामुळे  कोणाला घाबरत नाही. आम्ही कितीही अडचणीत आलो तरी  सोर्सचे नाव कधीही जाहीर करीत नाही. त्त्यामुळेच बेरक्या  आणखी नवे इतिहास घडवेल, असा आम्हाला विश्वास आहे.

बेरक्याला चार डोळे किंवा चार हात नाहीत. तोही तुमच्यासारखा सामान्य पत्रकार आहे. आमचा व्याप सांभाळत केवळ पत्रकाराच्या हितासाठी हे व्रत अंगिकारले आहे. यात आमचा कसलाही स्वार्थ नाही. तरीही आमच्याकडून काही चुकले असेल तर क्षमस्व ! कोणाचे मन दुखावले असेल तर दिलगीर आहोत. !

पुनश्च आभार !

बेरक्या उर्फ नारद

वाचत राहा
http://www.berkya.com