> >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

मंगळवार, २३ एप्रिल, २०१९

लाव रे तो व्हिडीओ ! निखिला म्हात्रे सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी , लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा एकही उमेदवार उभा न करता महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रचार सभा घेवून मोदी आणि शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. सभेच्या ठिकाणी एलईडी स्क्रीनवर मोदी - शाह यांच्याविषयी लेखा - जोखा मांडत आहेत. त्यांच्या भाषणातील 'लाव रे तो  व्हिडीओ' हा डायलॉग फेमस झाला आहे.

काही प्रचार सभा उरकल्यानंतर राज ठाकरे यांनी विविध न्यूज चॅनल्सला मुलाखती दिल्या आहेत. टीव्ही ९ मराठी साठी न्यूज एडिटर आणि अँकर निखिला म्हात्रे यांनी राज यांची मुलाखत घेतली आहे. मुलाखती दरम्यान राज आणि निखिला यांच्यात चांगलेच खटके उडाले आहेत.  इतकेच नाही तर राज यांनी निखिला यांना चांगलेच धारेवर धरले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

निखिला म्हात्रे यांचा
लाव रे तो व्हिडीओ 


रविवार, २१ एप्रिल, २०१९

उमेश कुमावत यांचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीनंतर चॅनल सोडणार

मुंबई - न्यूज 18 लोकमत चे संपादक उमेश कुमावत यांनी, अवघ्या पाच महिन्यात चॅनलला राम राम ठोकला आहे. त्यांनी आपला राजीनामा मॅनेजमेंटकडे सुपूर्द केला आहे.लोकसभा निवडणूक पार पडताच ते चॅनल सोडणार आहेत.1 मे नंतर ते चॅनलमध्ये दिसणार नाहीत, असे सांगितले जात आहेत.

उमेश कुमावत यांना रिपोर्टिंगचा अनुभव जास्त आणि संपादक पदाचा अनुभव कमी आहे. संपादक पदाची सर्कस चालवण्यात ते कमी पडले. चॅनलमध्ये असलेली गटबाजी, मॅनेजमेंटचा हस्तक्षेप यामुळे ते हैराण होते. त्याचबरोबर चॅनलचा  टीआरपी वाढत नसल्याने कुमावत आणि मॅनेजमेंट यांच्यात खटके उडत गेले, त्यातून कुमावत यांनी राजीनामा देणे पसंद केले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांची मालकी असलेल्या न्यूज 18 लोकमत चॅनलमध्ये  कोणताही संपादक एक वर्षही टिकत नसल्याने आश्चर्य व्यक्त  होत आहे.

नेस्ट कोण ?
 निखिल वागळे गेल्यानंतर मंदार फणसे, राव, प्रसाद काथे, उदय निरगुडकर, उमेश कुमावत असे कार्ड वापरण्यात आले. कुमावत यांनी  राजीनामा दिल्यामुळे आता 18 लोकमत चे न्यूज संपादक कोण होणार ? याबाबत औत्सुक्य आहे.या पदासाठी निलेश खरे, तुळशीदास भोईटे, राजेंद्र हुंजे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. 

गुरुवार, १८ एप्रिल, २०१९

'सकाळ’च महाराष्ट्राची ‘नंबर वन’ पसंती...

'एबीसी’च्या सर्वेक्षण अहवालात ‘सकाळ’वर अव्वल मोहोर

पुणे - महाराष्ट्राची खरी पसंती ‘सकाळ’ हीच असल्याची मोहोर लाखो वाचकांनी पुन्हा एकदा उमटवली आहे. ‘सकाळ’ हेच महाराष्ट्रातील अव्वल खपाचे दैनिक असल्याचे सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट झाले आहे.

‘ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्‍युलेशन’ने (एबीसी) जुलै ते डिसेंबर २०१८ या काळात प्रत्यक्ष विक्री झालेल्या प्रतींच्या आधारे केलेल्या अहवालानुसार ‘सकाळ’च्या सर्व आवृत्त्यांचा एकत्रित खप महाराष्ट्रात अन्य दैनिकांच्या तुलनेत अधिक आहे. मुद्रित माध्यमांच्या संदर्भात जाहिरात आणि प्रकाशन क्षेत्रामध्ये ‘एबीसी’चे निष्कर्ष आणि आकडेवारी विश्‍वासार्ह आणि अधिकृत मानली जाते.

‘सकाळ’ने १२ लाख ९२ हजार १३४ प्रतींचा खप नोंदविला आहे. सकारात्मक परिवर्तनाचा वसा जपत राज्यात अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ‘सकाळ माध्यम समूहा’च्या विश्‍वासार्हतेवर या अहवालाने लोकमान्यतेचीच मोहोर उमटवली आहे. या अधिकृत सर्वेक्षणापासून दूर राहणारे काही दैनिक खपाचे पोकळ दावे करीत असल्याचे या सर्वेक्षणावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

‘एबीसी’च्या आकडेवारीनुसार ‘सकाळ’च्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक-जळगाव, औरंगाबाद, सोलापूर, सातारा आणि नगर या आवृत्त्यांचा एकूण खप राज्यात अव्वल आहे. ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीचा दररोजचा खप पाच लाख ७८ हजारांपेक्षा अधिक आहे. पुणे आणि मुंबई या महानगरांमधील ‘सकाळ’चा खप दररोज सात लाखांच्या पुढे आहे. राज्यातील उदयोन्मुख शहरांमध्ये वाचकांनी ‘सकाळ’वरच विश्‍वास व्यक्त केल्याचे ‘एबीसी’च्या अहवालातून समोर आले आहे.

वृत्तपत्राच्या क्षेत्रात नवनवी शिखरे पादाक्रांत करणाऱ्या ‘सकाळ’ने केवळ माहिती पुरविण्याचे काम न करता सातत्यपूर्ण सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविले आहेत. डिजिटल माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवून सर्वसामान्य वाचकांचा आवाज म्हणून व्यवस्थेकडून अपेक्षित बदल घडवून आणले आहेत. प्रयोगशीलता जपणारे, बदल घडवून आणणाऱ्या सकारात्मक कामास नेहमीच प्रोत्साहन दिले. ‘एपी ग्लोबाले’, ‘सकाळ सोशल फाउंडेशन’, ‘सकाळ रिलीफ फंड’, ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’, महिलांना सशक्‍त व्यासपीठ देणारे ‘तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान’, तरुणाईला नेतृत्व देणारे ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’, ग्रामविकासाला चालना देणारी ‘सरपंच परिषद’ आदी माध्यमांतून ‘सकाळ’ राज्यातील जनतेसोबत एकरूप झाला आहे. ‘सकाळ’ची ही उपक्रमशीलता आणि समाजबदलासाठीचे प्रामाणिक प्रयत्न, यामुळेच ‘सकाळ’ने महाराष्ट्रातील आपले प्रथम स्थान कायम राखले आहे.

सोमवार, १५ एप्रिल, २०१९

'सुंदर' जीवनाचा करुण अंत...

सुंदर लटपटे जेव्हा लोकपत्रचे संपादक होते तेव्हा त्यांची आणि माझी ओळख झाली, माझ्या हस्ते त्यांनी लोकपत्रच्या वेबसाईटचे उद्घाटन केलं आणि एका ग्रामीण पत्रकाराचा उचित सत्कार केला. तेव्हापासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो.
पुण्यनगरीला असताना माझ्यासाठी त्यांना नोकरी सोडावी लागली. ६ सप्टेबर २०१६ रोजी उस्मानाबादच्या गावकरी कार्यालयावर हल्ला करून माझ्यासह तिघांवर खोटा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी तत्कालीन निष्क्रिय आणि भ्रष्ट पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना फोन करून खोटा गुन्हा दाखल का केला म्हणून जाब विचारला. त्यानंतर देशमुखने उस्मानाबादच्या काडीमास्टरला फोन केला. काडीमास्टने मालकाला फोन करून सुंदरबद्दल काडी केली. मालकाने विचारणा करताच, त्यांनी स्वाभिमानाने नोकरी सोडली पण लाचारी पत्करली नाही. मित्र असावा तर असा...
ते मला डिजिटल मीडियाबद्दल सतत प्रोत्साहन देत होते. मलाही वेबसाईट काढायची आहे, असे सांगत होते. पण गेले काही दिवस त्यांनी मोबाईल नंबर बदलल्याने संपर्क तुटला आणि काल धक्कादायक बातमी समजली.
त्यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त जेव्हा समजलं, तेव्हा माझा विश्वास बसला नाही.एक जिगरबाज पत्रकार आत्महत्या कसं काय करू शकतो, या विचारत मी पडलो. सुंदर लटपटे सर यांनी खूप यश पाहिले आणि अपयश सुद्धा. मी संकटातून पुन्हा नव्याने उभा राहिल्यानन्तर त्यांना कौतुक वाटत होते. सुनील तुम्ही कसं सहन करता ? असे ते मला एकदा विचारत होते.
सुंदर लटपटे यांच्या आत्महत्येने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. करोडो रुपयाची उलाढाल सुरु असताना लोक कसे जवळ येतात ? संपादक असताना कसे पुढे पुढे करतात पण जेव्हा तो अडचणीत असतो, संकटात असतो तेव्हा कशी पाठ फिरवतात ?
त्यांची एक्झिट मन सुन्न करणारी आहे. मी निशब्द झालो आहे.
सुंदर जीवनाचा करुण अंत पाहून काळीज चर्रर्र झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...


- सुनील ढेपे
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह
9420477111

ता.क.
जेव्हा एकलव्य प्रकाशन काढलं होतं तेव्हा त्यांची करोडो रुपयाची उलाढाल होती, पण नंतर हे प्रकाशन बंद पडलं. महाराष्ट्र , काल, आज आणि उद्या हे साप्ताहिक त्यांनी काढलं होतं, त्यात त्यांना प्रचंड घाटा झाला ...

रविवार, १४ एप्रिल, २०१९

सुंदर लटपटे यांची आत्महत्या

औरंगाबाद -   येथील जेष्ठ पत्रकार सुंदर लटपटे यांनी रविवारी पहाटे स्वतःच्या राहत्या घरी  गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्राच्या माध्यम क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

लोकपत्र, पुण्यनगरी, पुढारी आदी  वृत्तपत्रात संपादक, कार्यकारी संपादक म्हणून काम केलेले सुंदर लटपटे यांनी, आर्थिक चणचण आणि त्यात पत्नी संसार  सोडून माहेरी गेल्याने आत्महत्येचे टोकाचे  पाऊल उचलले.

औरंगाबादचे ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांच्या बहिणीबरोबर त्यांचा आंतरजातीय विवाह झाला होता. विवाह झाल्यापासून त्यांचे आणि संजीव उन्हाळे यांचे टोकाचे मतभेद होते. यातून त्यांनी अनेक वेळा फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. यातूनच त्यांनी आत्महत्या केली.

पत्रकार ते एकलव्य प्रकाशन आणि पुन्हा पत्रकार हा त्यांचा प्रवास  संघर्षमय राहिला.  गेल्या काही महिन्यापासून ते आर्थिक विंवचनेत होते. त्यात गेल्या काही महिन्यापासून पत्नी माहेरी गेल्याने ते अधिकच खचले होते. एक अतिशय हुशार, जिगरबाज पत्रकार  जेव्हा आत्महत्या करतो, तेव्हा काळीज नक्कीच चर्रर्र होते.

काय लिहिले सुसाईड नोट मध्ये 

 केवळ माझा मेहुणा संजीव उन्हाळेमुळे आत्महत्या करत आहे. तो गुन्हेगार , जातीयवादी आणि भ्रष्ट आहे. त्याने माझ्या पत्नीचे मन परिवर्तन करून आमचा ३० वर्षाचा संसार मोडला. त्यास शिक्षा मिळाली पाहिजे.
- सुंदर लटपटे 


बुधवार, ३ एप्रिल, २०१९

चौथा स्तंभ पुरस्काराचे शानदार वितरण

औरंगाबाद -  पत्रकारिता क्षेत्रात भरीव कामगिरी  करणाऱ्या  पत्रकारांना  चौथा स्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. डॉ. अनिल फळे यांच्या अप्रतिम मीडियाच्या वतीने हे पुरस्कार देण्यात आले. 

  औरंगाबाद येथे पार पडलेल्या एका या शानदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णु पादानंदजी महाराज होते .  यावेळी व्यासपीठावर माजी महसूल आयुक्त कृष्णा भोगे, प्रसिद्ध उद्योजक राम भोगले , वृत्तपत्र विद्या प्रमुख दिनकर माने, सामाजिक कार्यकर्त्या सौ . वैशाली खाडिलकर , पत्रकार संजीव उन्हाळे, डॉ. अनिल फळे ,प्रीतम फळे उपस्थित होते .

नगरच्या रेडिओ धमालच्या आर जे मनीषा इंगळे - जोशी यांना चौथा स्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला
 

सोलापुरात 'पुढारी' बदलला !

सोलापूर - पद्मश्रीच्या सोलापुरात 'पुढारी' बदलण्यात आला आहे. नवे युनिट हेड म्हणून एन.एस. पाटील हे जॉईन झाले आहेत. पूर्वीचे युनिट हेड हेमंत चौधरी यांचे अधिकार गोठवण्यात आले आहेत.

सोलापूर आवृत्तीच्या जाहिरात बिलाची थकबाकी वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. नवे युनिट हेड एन.एस. पाटील यांनी  यापूर्वी लोकमत, सकाळ, पुण्यनगरी, प्रभात आदी वृत्तपत्रात काम केलं आहे. 


फेसबुक वर शेअर करा

Facebook