पत्रकार विनोद वर्मा यांना अटक

गाझियाबाद- ज्येष्ठ पत्रकार विनोद वर्मा यांना शुक्रवारी सकाळी छत्तीसगड पोलिसांनी
अटक केली. छत्तीसगडमधील भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री राजेश कुमार यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी गाझियाबादमधील निवासस्थानातून विनोद वर्मा यांना अटक करण्यात आली. वर्मा यांना गाझियाबादमधील पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. छत्तीसगडमधील मंत्री राजेश कुमार यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ वर्मा यांच्या हाती लागले होते. या व्हिडिओच्या आधारे वर्मा यांनी मला ब्लॅकमेल केले आणि माझ्याकडून खंडणी मागितली, असा आरोप राजेश कुमार यांनी केला आहे. पोलिसांनी विनोद वर्मा यांच्या घरातून ५०० हून अधिक सीडी जप्त केल्या आहेत. विनोद वर्मा यांना पुढील चौकशीसाठी रायपूरच्या पोलीस ठाण्यात नेण्यात येईल, असे समजते.
विनोद वर्मा हे बीबीसीचे माजी पत्रकार असून अमर उजालाच्या डिजिटल विभागाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. एडिटर्स गिल्डचे ते सदस्यदेखील आहे. विनोद वर्मा हे छत्तीसगड सरकारविरोधात स्टिंग ऑपरेशन करणार होते अशी चर्चादेखील रंगली आहे. माजी पत्रकार आणि आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांनी ट्विटरवरुन विनोद वर्मा यांच्या अटकेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. हा माधम्यांवरील हल्ला असल्याचा आरोप त्यांनी केला.
माझ्याकडे छत्तीसगढच्या मंत्र्याच्या अश्लील चित्रण असलेल्या सीडीज आहेत. म्हणूनच छत्तीसगढचे सरकार माझ्याविरोधात आहे. असे वर्मा यांनी म्हटले. याबाबत मंत्र्यांनी  ‘त्या सीडीज बनावट असल्याचे तसेच त्या सीडीजची चौकशी कोणत्याही तपास यंत्रणेमार्फत करावी असे सांगितले.
छत्तीसगढच्या भाजप आयटीचे सदस्य प्रकाश बजाज यांनी केलेल्या तक्रारीनंतर वर्मा यांना अटक केली गेली.