चौथा स्तंभ कि चोथा स्तंभ ?

आजकाल पत्रकारीतेने इतके विकृत स्वरूप धारण केले आहे की,पत्रकारीता हा खरोखरच लोकशाहीचा चौथा स्तंभ राहिला आहे का ? हा प्रश्न माझ्यासारख्या  पत्रकारीतेत आयुष्य व्यतित केलेल्या पत्रकारास पडू लागला आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता, पत्रकारीता ही  आजच्या इतकी स्वस्त,बाजारू व विकाऊ कधीच झाली नव्हती. 

     "भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी हाणू काठी"  किंवा " खिचो न किमान को न तलवार निकालो,जब तोप मुखाबिल है तो तलवार निकालो" अशी ब्रिद वाक्यं असलेली पत्रकारीता लोप पावत चालली आहे. पत्रकारीता,वृत्तपत्र वा न्यूज चॅनल हे आता एखाद्या राजकिय पक्षाचे,एखाद्या राजकिय नेत्याचे वा समाजाचे मुखपत्र होऊ पहात आहे. मार्केटिंगचे उत्तम साधन म्हणून पाहिले जात आहे.

    पत्रकार कक्ष हे पत्रकारांचे जिव्हाळ्याचे ठिकाणी.बातम्यांची देवा- घेवाण करण्याचे ठिकाण होते.जणू ते पत्रकारांचे मंदिरच.पण आज हेच ठिकाण सेटींगचे व गि-हाईक शोधण्याचे,काॅपीपेस्ट बातम्या पेरण्याचे केंद्र झाले आहे.पुर्वी  पत्रकारांना सन्मानाने आमंत्रण यायचे. आता एक एसएमएस आला की पत्रकार, पत्रकार परिषदेवर तुटून पडतात.नीर-क्षीर न्यायाने व परखडपणे बातमी देण्याची अपेक्षा करणे मुर्खपणा समजला जाऊ लागला आहे. पत्रकार परिषदेच्या आयोजकांचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बातम्या काॅपीपेस्ट केल्या जातात.

   
वर्तमान पत्राच्या पहिल्या पानावर वाचकाचा पहिला हक्क असतो.कारण तो पैसे देऊन वृत्तपत्र विकत घेतो ते बातमी वाचण्यासाठीच. पुर्वी- आज कोणत्या वृत्तपत्रात काय हेडिंग/मथळा आहे, याला महत्व असायचे.परंतू आता तर मुखपृष्ठावरच जाहिरातींचे अतिक्रमण दिसते.पुर्वी जाहिराती पानपुरक असायच्या.आता मात्र जाहिराती छापून उरलेल्या जागेत बातमी बसवली जाते. त्यातही सामाजिक,विधायक बातम्यांपेक्षा विद्धंसक व गुन्हेगारी बातम्यांना जास्त महत्व दिले जाते. कारण त्यामुळे TRP व खप वाढतो म्हणे.पुर्वी बातमी सर्वप्रथम छापुन येण्यासाठी चढाओढ असायची. त्या बातमीवर त्या-त्या बातमीदाराची छाप असायची.नांव नसले तरी अमुक बातमी ही दिलीप मालवणकरांचीच हे वाचक ओळखत असत. आता तर सर्व बातम्या काॅपी पेस्ट असतात. आणि 4-4 पेपरचे विद्वान संपादक ती जशीच्या तशीच छापतात. पुर्वी संपर्क व दळण वळणाची साधनं नव्हती.बातमी लिहिणे,ती फोनवर सांगणे अथवा स्वतः घेऊन जाणे, छायाचित्र असल्यास कॅमेरामन शोधुन फोटो काढणे, त्याचे प्रिंट काढणे, इतके सायास करावे लागत.मग प्रेसमधे प्लेट बनत असे किंवा ब्लाॅक बनत असत.त्यामुळे बातमीदारी कष्टप्रद होती;  तरी ती आनंदाने केली जात होती. कारण ते एक व्रत मानले जाई.सुरूवातीला विना मानधन,नंतर दरमहा 40 रूपये करीत करीत 400 इतके मानधन माझे दैनिक  मला देत असे.तरी त्यात समाधान मानणारे बातमीदार होते. आता बातमीदारी सहज साध्य झाली आहे.संगणक,
मोबाईलवर बातमी टाईप केली व वाट्टेल तेवढे फोटो जोडले की इंटरनेट द्वारे बातमी काही क्षणांत प्रेसमधे पोहचते. कित्येक पत्रकारांचा एकच "राईटर" असतो.तोच बातमी टाईप करतो व वेग वेगळ्या वर्तमान पत्रात धाडून देतो. इतकी सहज साध्य पत्रकारीता झाल्याने पत्रकारीता स्वस्त झाली आहे. कोणीही झोळी घेतो आणि पत्रकार म्हणवतो. मी माझ्या 35 वर्षाच्या पत्रकारीतेत कधीही स्कुटरवर वा घरावर "पत्रकार" असे लिहिले नाही. त्याची गरजच भासली नाही. दिलीप मालवणकर म्हणजे "नवशक्ती" हे समिकरण झाले होते.तसे प्रत्येक बातमीदाराचे होते. त्यावेळी बातमीदार हाताच्या बोटावर मोजण्याइतके  असत.त्यामुळे ओळख पत्राची गरज नसे व सन्मानही मिळत असे. आता बातमीदारांचे पिक अमाप आले आहे. पुर्वी जसे टाईपिस्ट कम क्लार्क पद असायचे  तसेच आज पत्रकार कम जाहिरात एजन्ट झाले आहे. काही दैनिकं तर मानधन देत नाहीत.ते ज्यांना ओळखपत्र देतात, त्यांना महिन्याच्या जाहिरातींचे टार्गेट दिले जाते. जितक्या जास्त जाहिराती तितके जास्त कमिशन आणि तेच मानधन. अगदी ब्युरो चिफ म्हणजे जाहिरात कलेक्शन एजन्सी, अशी विदारक परिस्थिती अनेक दैनिकांत पहायला मिळते. मग बातमी देण्याचे पैसे, बातमी दडपण्याचे पैसे हा प्रकार जन्म घेतो. अनेक पत्रकार स्थायी समिती सभापती कडून दरमहा मिळणा-या पाकिटाकडे डोळे लावुन बसलेले असतात.तर अनेकांना विशिष्ट नेते त्यांच्या बातम्यांचा रतिब घालण्यासाठी पॅकेज देतात.अशा परिस्थितीत भ्रष्टाचारा विरोधात निरपेक्ष बातम्यांची अपेक्षा करणे हे स्वप्न रंजन ठरते. 

   
मी जेंव्हा पत्रकारीता करीत होतो,  तेंव्हा पक्षविरोधी कार्य करणा-या माझ्याच पक्षाच्या लोकांनी माझे अजब लोकशक्ती हे साप्ताहिक  जाळले होते. दिलीप मालवणकर मुर्दाबाद !! घोषणा देत मोर्चा काढला होता. याहून निष्पक्ष पत्रकारीता ती काय असू शकते ?? त्यावेळी  पत्रकाराची ताकद काय असते ते मी मोर्चेक-यांना दाखवुन दिले. मी थेट मातोश्री गाठले व बाळासाहेबांकडे दाद मागितली असता स्थानिक दोन पदाधिका-यांना पदमुक्त केल्याचे दुस-याच दिवशी दैनिक सामनात  बाळासाहेबांनी जाहिर केले होते.

    धर्मवीर अद्याप गप्प का ? हे मी ज्यांना गुरू व नेता मानत होतो त्या आनंद दिघे साहेबांच्या विरोधात लिहिण्याचे धाडस करणारी माझी पत्रकारीता होती. शिवसेना प्रमुख हिंदू ह्रदयसम्राट माननीय बाळासाहेबांना- "साहेब 100 पानी वही कितीला मिळते ?"  हा प्रश्न मातोश्रीवर विचारणारी माझी पत्रकारीता होती. माझ्याच साप्ताहिकाच्या मथळ्यावरून प्रकाशन प्रसंगी तत्कालीन  खासदारांनी  " याचे गंभीर परिणाम होतील,"अशी धमकी देण्यासारखे जळजळीत वास्तववादी लेखन करण्याची धमक माझ्या पत्रकारीतेत होती. "वाईन सम्राट नगराध्यक्ष होत असेल तर काॅन्ग्रेसने गांधीजींची जपमाळ जपणे बंद करावे," असा मथळा छापून तत्कालीन वाईन सम्राट व उल्हासनगरचे नगराध्यक्ष  असलेल्या अनभिषिक्त सम्राटास आव्हान देणारी निर्भीड पत्रकारीता मी केली आहे. या पत्रकारीतेसाठी मी वयाच्या 31व्या वर्षी  माझी क्लास 2 दर्जाची सरकारी नोकरी सोडून छपाईचा व्यवसाय सुरू करून उपजिविका केली व पत्रकारीता हा छंद म्हणून जोपासला .माझ्या पत्रकारीतेमुळेच मी दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलो. अनेक आंदोलनांचे यशस्वी नेतृत्व केले. भ्रष्टाचारी संस्थाचालक व  कुख्यात डाॅनला जेलमधे पाठवले. ही खरी पत्रकारीतेची ताकद होती. 

    आम्ही अभिमानाने सांगायचो,पत्रकारीता हा आमचा धर्म आहे. निष्पक्ष, सडेतोड व बिनधास्त बातम्यांना इतकी धार असायची की त्या काळचे डाॅन,सत्ताधिश, शासकिय व पोलीस यंत्रणा ही पत्रकारांना वचकूनच असायची. मला आठवते; कित्येक वर्षे ठाणे पोलीस आयुक्तालयातून प्रेस नोट घेऊन पोलीस आमच्या घरापर्यंत यायचा.पत्रकार परिषद म्हणजे पत्रकारांनी उलट सुलट प्रश्नांचा केलेला भडिमार असायचा. आज प्रेस नोट मिळवावी लागते, पत्रकार परिषदेत पत्रकार श्रोत्यांच्या भूमिकेत असतात,जुजबी प्रश्न विचारून आयोजकाला जे सांगायचे ते ऐकून बातमी तयार होते. बातमी लॅपटाॅपवर टाईप करून पाठवली की स्नेह भोजनास सुरूवात होते. कधी कधी काॅकटेल पार्टी व शेवटी पाकिट वाटप !!" मागिल निवडणुकीत मी एका पत्रकार परिषदेस गेलो होतो.पत्रकार परिषद संपली,भोजन झाले तरी पत्रकार रेंगाळत होते. मी एका ओळखीच्या पत्रकाराला विचारले हे का थांबले आहेत  ? तो म्हणाला- साहेबांचा पीए यादी नुसार पाकिट भरत आहे. ते मिळाल्या शिवाय पत्रकार परिषदेची सांगता होणार नाही. मला या प्रकाराचा किळस आला व मी काढता पाय घेतला.नेते  पाकिटातील  रक्कमेवरून पत्रकाराची किंमत व लायकी ठरवतात.

   
हाच प्रकार मोठमोठ्या दैनिकांचे संपादक वेगळ्या पद्धतीने हाताळतात. अमुक अमुक दैनिकात तमुक तमुक नेत्याची मुलाखत !! अशी जाहिरातबाजी करून दैनिकांत मुलाखत दणक्यात प्रसिद्ध केली जाते.ही मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंगच असते. मुलाखतकाराने कोणते प्रश्न विचारायचे,त्याचे काय उत्तर द्यायचे ?  हे सर्व पुर्व नियोजित असते. अर्थात त्याचा मोबदलाही लाखोत मोजावा लागतो. 
दुसरा प्रकार मॅरेथॉन मुलाखतीचा. प्रकार तोच पण मोठ्या आकारात. 3-4 दिवस मुलाखत रंगवली जाते. आजवर ज्यांच्या मॅरेथाॅन मुलाखती प्रसिद्ध झाल्या त्या आठवा. एका तरी सामाजिक कार्यकर्त्यांची,
सेवाभावी व्यक्तीची वा संस्थेची मॅरेथाॅन मुलाखत वाचल्याचे आठवते का ? सर्व मुलाखती अब्जाधिश नेत्यांच्याच आढळतील.कारण उघड आहे. मरेॅथाॅन  मुलाखतीचा आकार ( ? ) ज्यांना झेपतो त्यांनाच हा मान मिळतो. दूरदर्शन वाहिन्यांचे अॅन्कर अल्पावधीत करोडपती व अब्जाधिश का होतात ? याचे उत्तर  देखील मुलाखतीतच सापडेल.

      आरोग्यम धन संपदा, हेल्थ केअरच्या नावाखाली दूरर्शनवरील वाहिन्यांवर स्पेशालिस्ट डाॅक्टरांच्या मुलाखती तर त्या डाॅक्टरांची जाहिरात व पेशंटला आमंत्रण देण्यासाठीच असतात. अर्थात अर्धा-अर्धा तास एकाच डाॅक्टरला आपल्या वाहिनीवर चमकावण्यामागे उदात्त हेतू काय असतो ? हे न कळण्याएवढे प्रेक्षक अडाणी नसतात. मेडिकल काॅन्सिलच्या नियमानुसार डाॅक्टरला आपल्या प्रोफेशनची जाहिरात करता येत नाही,यातून काढलेली ही चोरवाट असते. निवडणूक काळात राजकिय मुलाखतींना उधाण येते.

     स्थानिक पातळीवरील पत्रकार किती खालच्या थराला जातात त्याचा हा किस्सा.  साधारण वर्षभरापुर्वी आम्ही मुंबईला उद्धव ठाकरेंच्या पी.ए.ला.भेटायला चाललो होतो. विषय अर्थात गोल मैदानाच्या मिड टाऊन हाॅलला बाळासाहेबांचे नांव देण्याचा.त्यावेळी एका सहप्रवाशी पत्रकाराने सांगितलेला हा किस्सा. दोन पत्रकार एका बांधकाम सुरू असलेल्या साईटवर गेले व पैश्यांची मागणी करू लागले. संबंधित व्यक्तीने पैसे देण्यास नकार देताच या कथित पत्रकारांनी तेथील घमेले-फावडे उचलून आणले ! आत्ता बोला !! कित्येक झोळीछाप पत्रकार एखाद्या बीट मुकादमा प्रमाणे शहरात फिरून 200 ते 500 रूपये गोळा करतात. महापालिकेचे कर्मचारी एकवेळ उशीरा पोहचतात पण काही पत्रकार मात्र आपली वेळ अचुक पाळतात.

       एखाद्यावर गुन्हा दाखल झाला तर बातमी न देण्यासाठी ही पैसे उकळणारे दलाल पत्रकार आहेत. सध्या माझे जे आंदोलन सुरू आहे त्या विरूद्ध आयुक्तांकडे गेलेल्या दोन पत्रकारांनी मालवणकर वर गुन्हा दाखल आहे ! अशी आयुक्तांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक मीच दोन वर्षापुर्वी चार खंडणीखोरां विरोधात गुन्हा दाखल केला होता.चार खंडणीखोरांना अटक करायला भाग पाडले होते.तसेच सदर खंडणीबाजांच्या वकिलासही अटक करायला लावुन पोलीस कस्टडीची हवा दाखवली होती व त्याची कारही जप्त करायला भाग पाडले होते. ही बातमी दडपणारेच आयुक्तांना मालवणकरवर खंडणीचा गुन्हा दाखल असल्याचे सांगत होते.इतकी भाटगिरी  काही पत्रकारांत भिनली आहे.

     जनतेच्या कष्टाचे, कररूपाने भरलेले 6 कोटी  रूपये डस्टबीन सारख्या तकलादू वस्तूवर  उधळू नयेत व तेही 2.5 पट जादा दराने घेऊ नयेत !! यासाठी मी आंदोलन केले. स्मशानात झालेले हे पहिलेच उपोषण असताना या आंदोलनास प्रसिद्धी न
 देण्याचा विडा उचललेले पत्रकार  ठेकेदाराची दलाली करीत होते. याबाबत मी मुंबईच्या एका मोठ्या दैनिकाच्या संपादकासही जाब विचारला व खडसावले. "अशा  जन आंदोलनात तुम्हाला न्यूज व्याल्यू दिसत नाही, तुम्ही कसले पत्रकार ? लोकांना उपदेशाचे डोस पाजण्याचे ढोंग बंद करा!" असे सुनावले, तर त्या इतक्या मोठ्या दैनिकाच्या संपादक महाशयाची बोलती बंद झाली.कारण याच दैनिकाने पूर्ण पान रंगीत जाहिरातीची विष्ठा काही दिवसापुर्वीच चघळली  होती. असे हे विकाऊ पत्रकार लोकशाहीचे काय रक्षण करणार ?? आणि काय पत्रकारीता धर्म पाळणार ? पैसे कमवायचे तर बरीच क्षेत्रं आहेत. नितीमत्ता व स्वाभिमान गहाण टाकून लोकांना संपादकीयातून बोधामृत पाजण्याचा यांना तिळमात्र अधिकार नाही !!

     अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानवतावाद, अन्याया विरूद्ध बुलंद आवाज अशा पोकळ वल्गना करणारे वृत्तपत्राचे मालक व संपादक बातमीदारांना एखाद्या वेठबिगारासारखी वागणुक देतात. अत्यल्प मानधनावर त्यांची बोळवण करून वृत्तपत्र स्वातंत्र्य, पत्रकारांचे हक्क यावर लेखणी झिजवतात.पण ख-या अर्थाने जर पत्रकारांचे शोषण कोण करीत असेल तर ते वृत्तपत्राचे मालक व चालकच. आपले ग्लॅमर टिकविण्यासाठी व हितसंबंध टिकविण्यासाठी पत्रकार नाईलाजाने ही गुलामी स्विकारतात. एकदा सर्व दैनिकांनी ते आपापल्या बातमीदारास देत असलेले मानधन जाहिर करावे,म्हणजे दुध का दुध  व पानी का पानी उघड होईल. बातमीदार व प्रतिनिधींना गैरव्यवहार करायला भाग पाडणारे दुसरे तिसरे कोणी नसून वृत्तपत्र व्यवसायच जबाबदार आहे,या बद्दल कोणाचेही दुमत नसावे.

   मुंबईच्या अत्यंत जुन्या व नांवलौकिक असलेल्या दैनिकाच्या संपादका बद्दल सोशल मिडियावर जे जाहिर वक्तव्य वायरल झाले ते तर लज्जास्पद व शरमेने मान खाली घालावे लागेल असे आहे. त्यात बराच तथ्यांश आहे. पत्रकाराने आपल्या नांव लौकिकास काळीमा फासणारी व दलाल स्वरूपाची वेठबिगारी का करावी ?? संपादकही पैश्यासाठी किती हिन पातळी गाठतात ? याचे हे जळजळीत उदाहरण आहे. दिर्घ काळाची परंपरा व लौकिक असलेल्या दैनिकाची ही दुरावस्था पाहिल्यावर  रेड लाईट एरीया तरी बरा ! असे वाटू लागते.तेथे तर सरळ सरळ सौदा होतो. प्रतिष्ठेचा,नितिमत्तेचा व बुद्धीमत्तेचा बुरखा पांघरून सौदेबाजी करणा-यांपेक्षा  सरळ सरळ आपले दाम वसुल करणा-या परवडल्या. !! ही पत्रकारीतेची शोकांतिका आहे. 

    पुर्वी एखादे दैनिक त्यांच्या संपादकाच्या नावाने ओळखले जाई. पु.रा.बेहेरे म्हणजे नवशक्ती, गोविंदराव तळवळकर म्हणजे म.टा., विद्याधर गोखले म्हणजे लोकसत्ता, केसरी म्हणजे लोकमान्य टिळक ,मराठा म्हणजे आचार्य अत्रे असे समिकरण होते.आज स्वतःला बुद्धीजीवी म्हणवणारे शेटजींचे वेठबिगार बनले आहेत. शेटजीच्या इशा-यावर व धोरणरूपी घाण्या भोवती फिरणारे बैलच. स्वतःची बुद्धी गहाण ठेऊन शेटजी ठरवेल ते धोरण.त्यावर हे आपली बुद्धी पाजळणार. काही संपादक शेटजीची विशेष मर्जी संपादन करू शकले तर त्यांची वर्णी राज्यसभेवर. मग कालचा नोकरच नेता होतो,प्रवक्ता होतो. ज्यांना लोकाश्रय नाही,नेतृत्व गुण नाहीत, फक्त शेटजीची रि ओढू शकतात;  ते खासदार होतात ? मग अनायसे संपादक कमी आणि राजकारणी अधिक अशी स्थिती निर्माण होते. त्यातूनच मग संजय निरूपम तयार होतो व कालच्या मालकाला आव्हान देत सुटतो.

    पत्रकारीता हा धर्म राहिला नाही, हे क्षणभर मान्य केले, तरी तो धंदा होऊ नये; व्यवसाय झाला तरी समजू शकते. व्यवसायाचीही एक नितीमत्ता असते. एक गुडवील असते.ध्येय धोरण असते. त्यांचाही लवलेश ज्या पत्रकारात नसेल तर तो धंदेवाईकच समजला जावा.पत्रकारीतेस ज्या धंदेवाईक प्रवृतीने घेरले आहे, पेड न्यूज, पाकिट पत्रकारीता व  व्यभिचारी भ्रष्टाचाराची किड लागली आहे, त्यामुळे  लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आहे कि चोथा झालेला स्तंभ आहे ? असा प्रश्न  उपस्थित होतो. आज पत्रकारीतेची प्रतिष्ठा लयाला गेली आहे.पत्रकारीतेस पुर्वीची प्रतिष्ठा मिळवुन देणे हे प्रत्येक प्रामाणिक पत्रकाराचे कर्तव्य आहे. जशी गंगा नदी शुद्धीकरणाची मोहिम हाती घेतली आहे, तशीच पत्रकारीतेची मैली झालेली व प्रदुषित झालेली गंगा शुद्धीकरणाची मोहिम निष्ठावंत व प्रामाणिक पत्रकारांनी हाती घेतली पाहिजे. पत्रकारीतेस  प्रतिष्ठा व गतवैभव प्राप्त करून दिले पाहिजे. आजही 10 टक्के पत्रकार वरील अपप्रवृत्तींना अपवाद आहेत. त्या 10 टक्के पत्रकारांनी पत्रकारीता हे एक मिशनआहे, हे बिंबवण्याचा व प्रतिष्ठा टिकविण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या या लेखनाचे सार्थक होईल.

दिलीप मालवणकर 
उल्हासनगर 
9822902470