सरकारवर माध्यमांचा अंकूश महत्वाचा - मुख्यमंत्री

अमरावती - लोकशाहीतील सरकार निरंकुश असणे योग्य ठरत नाही, म्हणूनच माध्यमांच्या अंकुशाचे महत्त्व मोठे आहे. सरकार माध्यमांना सर्वोतोपरी सहकार्य करत असले तरी त्यामागे निरपेक्ष कर्तव्याची भावना आहे. सरकार सरकारचे कर्तव्य करीत आहे. माध्यमांनी माध्यमांचे कर्तव्य बजावत राहावे. प्रत्येक कर्तव्यामागे स्वहिताची नव्हे तर समाजहिताची आणि देशहिताची भावना असली पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अमरावती येथे उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचे उदघाटन आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित पत्रकार भवन लोकार्पण सोहळयाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार आनंदराव अडसुळ, आमदार सर्वश्री डॉ. सुनिल देशमुख, डॉ. अनिल बोंडे, यशोमती ठाकूर यांची उपस्थिती होती. महानगर पालिकेचे आयुक्त हेमंत पवार, मुंबई सकाळचे कार्यकारी संपादक राहुल गडपाले, उद्योजक नरेंद्र भाराणी, अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल आदी यावेळी व्यासपीठावर होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, पत्रकारितेत अनेक बदल झाले असून या बदलांच्या आव्हानांचा सामना करीत माध्यमे समाजहिताचे कार्य करीत आहेत. त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरु राहण्यासाठी माध्यमांच्या स्वातंत्र्याला शासनाची नेहमीच पाठिंब्याची भूमिका राहिली आहे. शासनाचे विविध लोकोपयोगी निर्णय जनतेपर्यंत पोहचवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

अमरावती जिल्ह्याच्या पत्रकारितेच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले की, या जिल्ह्याने राज्याला व देशाला अनेक चांगले पत्रकार दिले आहेत. स्वातंत्र्य चळवळीत येथील पत्रकारांचा वाटा मोठा आहे. एका अर्थाने अमरावती हे पत्रकारितेचे माहेरघरच म्हणावे लागेल. पत्रकार भवनाच्या नूतन वास्तूबद्दल बोलतांना ते म्हणाले की, या भवनात अद्यावत ग्रंथालय सुरु करावे, त्यासाठी निश्चितपणे सहकार्य केले जाईल.

पत्रकारांसाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत राज्यातील विविध 500 रुग्णालयांतून त्यांना आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. पत्रकारांच्या पेन्शन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे.

शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल बोलताना ते म्हणाले की, अत्यंत जलदगतीने तथा पारदर्शकपणे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रीया पूर्ण केली जाईल. कापसाची खरेदी ही आधार कार्ड नोंदणी करुनच केली जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल, असेही त्यांनी सांगितले. अमरावती येथील पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. विविध सरकारी योजना राबवतांना माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे शक्य होत आहे. त्याचा उपयोग जनतेला होत आहे. माध्यमांनी याची नोंद घेतली आहे आणि अजूनही अशी नोंद घेतली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटीaल म्हणाले की, पत्रकारिता हा देशाचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. नवीन पत्रकार भवनाचा पत्रकारांना निश्चितपणे लाभ मिळेल व त्यांच्या कार्याला चालना मिळेल. शासनाचे निर्णय पत्रकारांनी जनतेपर्यंत पोहोचवावेत.

पत्रकारीता क्षेत्रात 40 वर्षांपासून अविरत सेवा देणारे जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे आणि दिलीप एडतकर यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी दैनिक हिंदुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे, मनपा आयुक्त हेमंत पवार, माहिती व जनसंपर्क, नागपूर विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, मुंबई सकाळचे कार्यकारी संपादक राहुल गडपाले, उद्योजक नरेंद्र भाराणी यांचाही सत्कार मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

तत्पुर्वी मुख्यमंत्री यांनी शहरातील वालकट कंम्पाउंड येथे उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचे फित कापून उदघाटन केले. यावेळी त्यांनी भवनाची पाहणी करुन पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.