गुडगुडकर नेमकं जाणार कुठं ?

मुंबई -  'स्मार्ट मित्र'मधून अशोकाचं पिकलं पान लवकरच गळणार आहे. त्याजागी नवं हिरवं पान आणण्याऐवजी टाइम्स ग्रुप "उघडा डोळे ,बघा नीट "चा "कर" लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे घडल्यास "राहा एक पाऊलं पुढे" मधून अस्त पावलेल्या गुडगुडकरांची 'उघडा डोळे , बघा नीट' मध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे.
काल गुडगुडकरांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर मराठी मीडियात मोठा भूकंप झाला,फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याची बातमी मागे पडली आणि गुडगुडकरांची चर्चा सुरू झाली. गुडगुडकरांना चॅनेलनं काढलं की त्यांनी स्वतःहून  राजीनामा दिला, यावर सध्या  कवित्व सुरू आहे, तसेच गुडगुडकर नेमकं  जाणार कुठे ? अशी चर्चाही रंगू लागली आहे. 
कोण म्हणतंय, गुडगुडकर चॅनलपेक्षा स्वतःला मोठे समजत होते आणि चॅनलपेक्षा स्वतःला जास्त प्रमोट करीत होते, त्यामुळे दिल्लीतील 'चंद्र' नाराज होते, तर चंद्रामुळे उदयचा दिवसेंदिवस अस्त होत होता आणि शेवटी  ग्रहण लागल्यामुळे त्यांनी स्वतःहून मुक्तता करून घेतली ! आता खरं - खोटं गुडगुडकरांनाच माहीत !
असो , आता गुडगुडकर नेमके जाणार कुठे ? यावर येवू या ...
पहिली शक्यता "चला जग जिंकू या"ची सुरू आहे, पण आताच कुठे "काथ्याकूट" करून सगळीकडे  "प्रसाद" वाटला असताना, आणि चॅनलचं नवं बारसं ठेवलं असताना, ही शक्यता कमी वाटत आहे. 
दुसरी शक्यता "उघडा डोळे, बघा नीट"ची सुरू आहे. येथील "करां"ना टाइम्सची ऑफर आहे. स्मार्ट मित्रच्या "अशोका"चं पिकलं पान लवकरच गळणार आहे, त्यासाठी करांना खास बोलावणं आलं म्हणे.पण प्रिंट मधून आलेल्या करांना टीव्हीवर चमकण्याची मोठी सवय जडल्याने ते पुन्हा प्रिंट मध्ये  जाणार का ? हे एक कोडचं आहे. जर ते  खरंच गेलं तर गुडगुडकर उघड्या डोळ्यामध्ये  ड्रॉप टाकू  शकतात.
पण हे सर्व हवेतील बाण असून, अजून कसलीही खात्री पटलेली नाही. तुम्हाला तर माहीत आहे, बेरक्या खात्री पटल्याशिवाय कुठली बातमी टाकत नाही,तोपर्यंत ही बातमी मनोरंजन म्हणून वाचा !
चला पुन्हा भेटू !

जाता जाता - 
"राहा एक पाऊल पुढे" मधून उदयचा अस्त झाल्यामुळे येथे  जाण्यासाठी 'चला जग जिंकू या ' सोडून गेलेला फणस, 'थेट, अचूक , बिनदास्त'चे तुळशीपत्र, गेल्या चार वर्षात चार चॅनेल बदलणारे नीलकंठेश्वर, मॅक्सचा चंद्र, सोलापुरी ओबामा आणि काही स्वतः ला ज्येष्ठ, विद्वान, शहाणे समजणारे डझनभर संपादक उतावीळ आहेत !