निरगुडकरांबद्दल व्हायरल पोस्ट ! रियलिटी चेक !!

झी २४ तास चे संपादक उदय निरगुडकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर काही पोस्ट फिरत आहेत. निरगुडकर यांना काही नेटिझन्सने हुतात्मा केले आहे. या दोन्ही पोस्ट आम्ही प्रसिद्ध करीत आहेत आणि शेवटी रियालिटी चेक करून आमचे म्हणणे देत आहोत ... 
 
 
समर्थनार्थ पोस्ट 
 
डॉ.उदय निरगुडकरांना झी टी.व्ही.कडून अपमानाचा नारळ

निखील वागळे, प्रसून जोशी, अशीष जाधव यांचेनंतर भाजपा विरोधी
भूमिका घेणारा मराठी वृत्तवाहिन्यांतला चौथा बुलंद आवाजही बंद


झी 24 तास या वृत्तवाहिनीचे संपादक आणि सूत्रसंचालक डॉ. उदय निरगुडकर यांनी काल सायंकाळी अचानक ‘झी’ व्यवस्थापनाला आपला राजीनामा सादर केला. ‘रहा, एक पाऊल पुढे’ ही टॅगलाईन घेऊन उदय निरगुडकर यांनी झी-24 या मराठी वृत्तवाहिनीला गेल्या काही महिन्यांत क्रमांक एकवर नेऊन ठेवले होते. त्यांचा ‘रोखठोक’ हा चर्चात्मक कार्यक्रम देखील लोकप्रिय होता. अत्यंत तटस्थपणे एखाद्या विषयाचे विश्‍लेषण करून थेट, अचूक आणि वस्तुनिष्ठपणे भूमिका मांडणे आणि संबंधित विषयाची सांगोपांग चर्चा घडवून आणण्यात त्यांचा हातखंडा होता. कोणत्याही पक्ष अथवा विचारधारेशी किंवा कोणा व्यक्तीशी आकस वा पुर्वग्रह न ठेवता संबंधित व्यक्ती वा पक्षाच्या प्रवयत्याला ते आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी देत असत. त्याला प्रतिप्रश्‍न विचारून बोलतेही करत असत आणि एखाद्याची बोलती ही बंद करत असत. एखाद्याकडून ‘खुबी’ने सत्य वदवून घेण्याची अपवादात्मक ‘कला’ त्यांना अवगत होती. एखाद्या चांगल्या कृती वा धोरणाचे जोरकस समर्थन करताना जनतेच्या हिताला बाधा आणणार्‍या धोरणांवर ते परखड टीकाही करत असत. निरगुडकरांची ही तटस्थताच काही मंडळींना नको होती. सरळच सांगायचे तर भारतीय जनता पक्षाला खटकत होती. करायचे तर फक्त आमचे फक्त कौतुकच करा. मोदींचे गुणगान गा. आमच्या प्रत्येक कृती-उक्ती आणि कामाचे (बिनकामाचे सुद्धा) समर्थनच करा. अन्यथा तुमचा आवाज बंद करा. हेच भाजपाचे ध्येयधोरण आहे. भाजपाच्या या धोरणाचे पहिले बळी ठरले ते निखील वागळे आणि राजदीप सरदेसाई. 2014 च्या निवडणुकांपूर्वी हीच जोडगोळी जेव्हा केंद्रातील
मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील युपीए सरकारवर आणि
महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकारवर तुटून पडत होती तेव्हा याच भाजपा आणि संघीय मंडळींनी या दोघांना डोययावर घेतले होते. 2014 ला केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र र आल्यानंतर मात्र राजदीप सरदेसाई आणि निखील वागळे आणि त्यांचा आजचा सवाल अडचणीचा वाटू लागला. मग आयबीएन वृत्तसमुह रिलायन्स उद्योग समुहाच्या मुकेश अंबानींनी विकत घेतला आणि भाजपाच्या धोरणांवर टीका करणार्‍या राजदीप सरदेसाई आणि निखील वागळेंची गच्छंती झाली. मग वागळे कांचन अधिकारींच्या ‘मी मराठी’ वृत्तसमुह एकदम प्रकाशझोतात आला. तेथील त्यांचा पॉईंट ब्लॉक गाजू लागला. टीआरपी वाढला. जाहिरातीही वाढल्या. पण अचानक एक दिवस वागळे ‘मी-मराठी’वरून गायब झाले. कारण तेच; भाजपा विरोधी भूमिका, संघ, सनातन संस्था आणि कट्टर हिंदुत्वाबाबतची वागळेंची परखड आणि सडेतोड मते. घाबरून मी – मराठीने वागळेंना बाहेरचा रस्ता दाखवला. वागळेंनी काही दिवस बेकारीत काढले, जय महाराष्ट्र सारख्या लेडीज बार संघटनेचा अध्यक्ष असलेल्या मनजितसिंग सेठीच्या चॅनलमध्ये ‘खिडकी’ पत्रकार म्हणूनही रोजंदारी केली. मोठा पॉज घेत त्यांनी पुन्हा महाराष्ट्र – 1 चॅनल सुरू केले. अल्पावधीत ते गाजलेही. बराच कालावधी दडपलेला वृत्त वाहिन्यांवरचा भाजपा विरोधी आवाज पुन्हा खणखणायला लागला. सुरुवातीला असे वाटले की हे चॅनल स्वत: वागळेंनीच काढले की काय? पण नंतर ते एका चीटफंड घोटाळ्यातील आरोपीच्या मालकीचे असल्याचे उघड झाले. भाजपा सरकारने ‘त्या’ घोटाळेबाजाला तुरूंगात डांबले आणि वागळेंना अर्थातच महाराष्ट्र – 1 ला जय महाराष्ट्र करावा लागला. त्याजागी मग अशीष जाधव आले. त्यांनी वागळेंचाच वारसा चालवल्या मुळे अखेर चीटफड घोटाळ्यातील आरोपीचे चॅनल या नावाखाली सरकारने या चॅनलची परवानगीच रद्द केली,आणि अशीष जाधवांचा ‘आवाज’ बंद झाला. बेकार वागळे मग टी.व्ही. 9 कडे गेले. टी.व्ही. 9 नेही काही काळ वागळेंचा वापर केला. वागळे आणि टी.व्ही. 9 दोन्हीही चर्चेत आले. पण इथेही पुन्हा घात झाला. एका चर्चेदरम्यान सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांना वागळेंनी त्यांच्या नेहमीच्या शैलीने कडक शब्दात झापले. वर्तकही संतापले. खडाजंगी झाली. त्यावेळी वागळेंनी वर्तकांना स्टुडिओमधून अक्षरश: हाकालून लावले. ‘याला वखोटीला धरून बाहेर काढा’ असे वागळे म्हणाले. वागळेंच्या टी.व्ही.9 मधील गच्छंतीला एवढे कारण पुरेसे ठरले. एकूणच हा सगळा उपद्व्याप; म्हणजे तो वागळेंच्या संदर्भातला असो, अशीष जाधवांच्या बाबत असो की नुकताच घडलेला डॉ. उदय निरगुडकरांच्या बाबतीत असो, हे सगळं घडवण्यामागचा सूत्रधार कोण आहे? भाजपाविरुद्ध ‘ब्र’ उङ्खारणार्‍या प्रत्येक संपादकांची यथासांग गच्छंतीच होते हा योगायोग तर नक्कीच नाही. संबंधित संपादकांच्या काही ‘चुका’ असू शकतात. पण मालकांना ज्या दुभत्या गायींच्या लाथा काही काळ गोड लागतात त्याच मालकांना त्याच गायी आटल्या की, खाटकाला विकताना काहीच कसे वाटत नाही? तेही ‘भाजपा’ला पसंत नाहीत म्हणून ? फक्त वागळे, राजदीप सरदेसाई, अशीष जाधव आणि उदय निरगुडकरच नाही. एबीपी
माझावरचे प्रसून जोशी देखील कौतुकास्पद कामगिरी असताना अचानक ‘काढले’ गेले. ते कोणाच्या सांगण्यावरून? आणि का म्हणून? चौथ्या स्तंभाची तटबंदी अशी ढासळत असेल तर मग सरकारला जाब विचारणार कोण?
जनहिताचे प्रश्‍न मांडणार कोण? जनतेची बाजू घेऊन सत्ताधार्‍यांशी भांडणार कोण? सरकार घटनेची, घटनात्मक अधिकार आणि लोकशाहीची पायमी करत असेल, बहुमताचा आणि सत्तेचा गैरवापर करत असेल, जनतेच्या प्रश्‍न आणि समस्यांकडे दुर्लक्ष करीत असेल तर या गैरकारभाराला ‘उघडे’ पाडायचे कोणी? अनेक दिवस बेकारीत घालवलेले दैनिक सकाळचे माजी संपादक ‘विजय कुवळेकर’ आता डॉ. उदय निरगुडकर यांच्या जागी नियुक्त झाले आहेत. प्रिंट मीडियातला माणूस इलेयट्रॉनिक मीडियात कसा काम करणार? शिवाय त्यांचे वय! पण हा प्रश्‍न विचारायचा नाही. कुवळेकरांचेही काय? ज्या दिवशी ते ‘भाजपा’विरोधी बोलायला लागतील त्या दिवसापासून त्यांच्या गच्छंतीचा प्रवास सुरू होईल. पत्रकार विश्‍वातील आपसातल्या ‘खो-खो’च्या खेळाचा पत्रकारांनाच त्रास-मन:स्ताप होतो तो असा.
कुवळेकरांचे हे खो खो खेळण्याचे वय नाही. पण सुंभ जळाला तरी पीळ जळत नाही आणि परतीचा पाऊस गेला तरी म्हातार ‘चळ’ जात नाही म्हणतात तो असा. कुवळेकरांचे पत्रकारितेत पुन्हा सक्रीय होणे (तेही वृत्त वाहिनीत) हा निव्वळ परतीचा पाऊस आहे. त्याने फार फार तर ‘पाणी टंचाई’ मिटते. पण पिकांचे मात्र नुकसान होते. अर्थात कुवळेकरांसारख्या अवकाळी ‘ढगां’ना ‘पिकपाण्या’ची तशीही काही चिंता नसतेच. (केतकर नावाचा असाच एक ढग सध्या नव्या जमिनीच्या शोधात फिरतोय म्हणे) बातमी अशी आहे की रिलायन्स
समुहाचे मुकेश अंबानी आणि प्रसिद्ध हिरे व्यापारी गौतम अदानी यांनी एकामागून एक न्यूज चॅनल विकत घेण्याचा किंवा त्याचे जास्तीत जास्त शेअर घेण्याचा सपाटा लावला आहे. सध्या तरी हे गंडांतर वृत्तवाहिन्यांपुरते मर्यादित आहे. म्हणून तिथली ‘तटबंदी’ ढासळताना दिसते आहे. तिथे एकदा
पाहिजे तशी तटबंदी बांधून ‘खंदक’ खोदले की मग अंबानी-अदानी नावाचे ‘गजदळ’ प्रिंट मीडियाकडे वळेल. निखील वागळे, राजदीप सरदेसाई, प्रसून जोशी, अशीष जाधव आणि उदय निरगुडकर; यह तो बस झाँकी है.
 
 विरोधात पोस्ट
झी 24 तासचे संपादक उदय निरगुडकर याना तडकाफडकी काढून टाकण्यात आले. त्यासंदर्भात विविध पोस्ट दोन दिवस सोशल मीडियावर फिरत आहेत. निरगुडकर यांनी फडणवीस यांना अडचणीचे प्रश्न विचारले म्हणून त्यांना काढले असली एक बाळबोध थेरी मांडली जात आहे. ती भंपक तर आहेच परंतु मांडणाऱ्याच्या अकलेचे दिवाळे वाजले असल्याचे दाखवून देणारी आहे. निरगुडकर यांना राजदीप सरदेसाई, निखिल वागळे यांच्या पंगतीत बसवण्याचा  प्रयत्न होतोय, हे अत्यंत हास्यास्पद आहे. निरगुडकर हे मूळचे पत्रकारितेतले नसताना त्यांनी पत्रकारितेमध्ये जे यश मिळवले ते कौतुकास्पद असले तरी त्यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीतप्रवाहपतीत राहून पत्रकारिता केली. रास्व संघाशी संबंधित आणि त्याच माध्यमातून त्यांनी झी चोवीस तासमध्ये प्रवेश मिळवला होता. ज्या नाट्यमयरित्या त्यांची चॅनलमध्ये एंट्री झाली होती,तशाच नाट्यमयरित्या एक्झिट झाली आहे. ती नेमकी का आणि कशामुळे झाली त्याची कारणे त्यांना आणि झीच्या  व्यवस्थापनाला ठाऊक असतील. बाकीच्यांनी भलते अंदाज बांधून अर्धवट ज्ञानावर निरगुडकर यांना धडाडीचे पत्रकार वगैरे म्हणून पत्रकारितेचे अवमूल्यन करू नये. निरगुडकर हे आपल्या पदावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपसाठी पूरक काम करीत होते. संघाला अभिप्रेत असलेल्या धार्मिक बाबींचा बडीवार माजवत होते.

राहता राहिला विजय कुवळेकर यांचा प्रश्न. पत्रकारितेतला प माहित नसताना निरगुडकर यांच्यासारख्या व्यक्तिने पाच वर्षे संपादक म्हणून काम केले. कुवळेकर यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा अनुभव नसला तरी पत्रकारितेचा सुमारे पंचेचाळीस वर्षांचा अनुभव आहे. ताठ कण्याचे संपादक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्यासंदर्भात आताच काही बोलण्यापेक्षा काळच त्यांच्या झी चोवीस तासमधील कामाचे मूल्यमापन करेल.
 

रियालिटी
> डॉ उदय निरगुडकर यांना काढून टाकण्यात आले आहे, ही  बाब सत्य आहे. त्यांना मालकांनी   राजीनामा देण्यास सांगितले आणि निरगुडकर यांनी तो दिला हि वस्तुस्थिती आहे.
कारण
डॉ निरगुडकर हे चॅनेलपेक्षा स्वतःला जास्त मोठे समजत होते आणि स्वतःला जास्त प्रमोट करीत होते तसेच मध्यंतरी त्यांनी IBN  लोकमतसाठी प्रयत्न केला म्हणून राजीनामा देण्यास सांगण्यात आले.
डॉ  निरगुडकर हे भाजप विरोधी होते हे पूर्ण चुकीचे आहे.
 या चॅनलचे मालक भाजप धार्जिणे असून, डॉ निरगुडकर त्यामुळे पाच वर्ष भाजपच्या नेत्यांना गोंजारत होते, त्यांची बाजू उचलून धरत होते.
डॉ निरगुडकर याना पत्रकारितेचे कसलेही नॉलेज नसताना, नागपुरी गडावर जाऊन मनधरणी करूनच झी मध्ये लागले होते.
जेव्हा राजीनामा देण्यास सांगण्यात आले तेव्हा निरगुडकरांनी महाराष्ट्राच्या मुख्य भाजप नेत्याकरवी मालकास फोन केला होता,
पण मालक म्हणाले, होय डॉ निरगुडकर खूप मोठे आहेत. पण त्यांची सवय खाल्या ताटात xx  करण्याची आहे. त्यामुळे आता शक्य नाही.
ही सर्व वस्तुस्तिथी असताना, निरगुडकर स्वतःला हुतात्मा समजत आहेत.