पत्रकारांची चौकशी होणार !

कल्याण : बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी स्वीकारल्याप्रकरणी अटकेत असलेली माहिती अधिकार कार्यकर्ती चारु शीला पाटील हिच्या चौकशीदरम्यान अनेक नावे बाहेर येऊ लागली आहेत. त्यात काही पत्रकारांचीही चौकशी होणार आहे.
ठाकुर्ली-चोळेगाव येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांच्याकडून चारु शीला हिने ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यात तडजोड होऊन २५ लाख देण्याचे ठरले होते. यातील दोन लाख रुपये चारु शीला हिने आधी घेतले होते. उर्वरित तीन आणि पाच लाखांचे धनादेश स्वीकारताना ठाणे खंडणीविरोधी पथकाने तिला रविवारी अटक केली. कल्याण सत्र न्यायालयाने तिला १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान काही महत्त्वाची माहिती पुढे आली आहे.
महापालिका मुख्यालयातील राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते कार्यालयातून पाटील हिने अनेक तक्रार अर्ज केले असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. तसेच तक्रारदार सुरेंद्र पाटील व चारुशीला पाटील यांच्यातील देण्याघेण्याची बातचीतही या ठिकाणीच झाल्याचेही उघड झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते कार्यालयातील खाजगी सचिवाला तसेच तेथील शिपायालाही खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, तिच्या झालेल्या चौकशीत काही पत्रकारांची नावेही उघड झाली असून त्यांचीही चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे. त्या पत्रकारांचा या खंडणी प्रकरणाशी संबंध आहे का, हे देखील तपासले जाणार आहे.
हे पत्रकार नेमके कोण आहेत, याची चवीने चर्चा सुरु आहे, 

साभार - लोकमत 
https://goo.gl/igdV4i