माध्यमांनी स्वत:ला अपग्रेड करण्याची वेळ !

पुणे – डिजिटल मीडियाची व्याप्ती आणि आवाका लक्षात घेता, इतर माध्यमांनी स्वत:ला अपग्रेड करण्याची वेळ आली आहे, असं मत पुण्यात झालेल्या डिजिटल मीडिया कार्यशाळेत तज्ज्ञांनी व्यक्त केलं. कॅलिडस इंटरनॅशनल मीडिया अँड आर्ट्स अकॅडमीच्या वतीने या एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑनलाईनमधील कन्टेन्ट, क्रिएटिव्हिटी आणि हिट्स, वेबसाईट कशी अपलोड करावी, वेब पोर्टलचं आर्थिक गणित आणि सतत बदलणारा सोशल मीडिया आदी विषयांवर या कार्यशाळेत 'सकाळ'चे डिजिटल संपादक सम्राट फडणीस, ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, ‘महाराष्ट्र लाइव्ह’चे संपादक सुनील ढेपे, सोशल मीडिया तज्ज्ञ विनायक पाचलग यांनी मार्गदर्शन केलं. 
             
प्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्त्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं, इतर माध्यमांनी वेळीच सावध होवून स्वत:ला अपग्रेड केलं नाही तर ती कालबाह्य ठरण्याची शक्यता सम्राट फडणीस यांनी व्यक्त केली. सध्या रोज घरी पेपर येतो, पण तो वाचला जाईलच असं नाही. बातम्याही टीव्हीऐवजी स्मार्टफोनमधून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहण्याकडेच लोकांचा कल वाढतोय, याकडेही फडणीस यांनी लक्ष वेधलं. 
                  ऑनलाईन मीडियातील कामाचा अनेक वर्षांचा अनुभव असणारे ज्येष्ठ पत्रकार सचिन शंकर परब यांनीही डिजिटल मीडियाचं महत्त्व अधोरेखित केलं. व्हिडीओ आणि टेक्स्ट हाच डिजिटल माध्यमांचा प्रमुख भाग असेल आणि खेड्यापाड्यातील सामान्य माणूस या डिजिटल माध्यमात सामावलेला दिसेल, असं परब म्हणाले. तर वेब पोर्टल आणि यू टूयब चॅनल तयार करून तरुणांनी स्वत:च या माध्यमात उतरावं, असं मत सुनील ढेपे यांनी व्यक्त केलं. वेब पोर्टल कसं तयार करावं, बातम्या कशा अपलोड कराव्यात, डोमेन आणि  टेम्प्लेट कसं खरेदी करावं याचं प्रात्यक्षिकही ढेपे यांनी करून दाखवलं.   
              अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलची सक्सेस स्टोरी कृष्णा वर्पे यांनी उलगडून सांगितली. रोज बदलत जाणाऱ्या माध्यमांचा अभ्यास, अचूक निरीक्षण, लोकांना हवा असणारा कन्टेन्ट योग्य पध्दतीनं देण्याची हातोटी असेल, तर या माध्यमात सहज यशस्वी होऊ शकता असं ते म्हणाले. विनायक पाचलग यांनीही सोशल मीडियाचा अचूक वापर कसा करावा, याविषयी मार्गदर्शन केलं. कार्यशाळेला आलेल्या विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणींचंही त्यांनी निराकरण केलं. जगात इंटरनेट वापराच्या तुलनेत भारताचा क्रमांक सर्वात वरचा असून निवडणुकांच्या काळात डिजिटल मीडियात तरुणांसाठी कशा अनेक संधी उपलब्ध होतील, यावर त्यांनी भाष्य केलं.
                   या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र आणि गोव्यामधून अनेक पत्रकार आणि पत्रकारिता शिकणारे विद्यार्थी आले होते. या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. कॅलिडस इंटरनॅशनल मीडिया अँड आर्टस अकॅडमीचे संचालक पंकज इंगोले यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.

या कार्यशाळेस महाराष्ट्र तसेच गोव्यातील जवळपास 50 प्रशिक्षणार्थीनी हजेरी लावली होती....गोव्यातील चार पत्रकार या कार्यशाळेस हजेरी लावून, गोव्यात डिजिटल मीडिया कार्यशाळा घेण्याचा मनोदय व्यक्त केला ....



डिजिटल मीडिया कार्यशाळेमुळे मी अपडेट झालो !

पुण्यात कॅलिड्स इंटरनॅशनल मीडिया आर्ट्स अकॅडमीच्या वतीने शनिवारी दुसरी राज्यस्तरीय डिजिटल मीडिया कार्यशाळा पार पडली, यापूर्वी 15 ऑक्टोबर  रोजी कार्यशाळा झाली होती, या दोन्ही कार्यशाळेस मी उपस्थित होतो.
प्रिंट, टीव्ही मीडियानंतर आता वेब तथा डिजिटल मीडिया अस्तित्वात आला आहे, पत्रकारांना पत्रकारितेत टिकायचे असेल तर काळाबरोबर चालावे लागेल आणि त्यासाठी डिजिटल मीडियाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
डिजिटल आणि सोशल मीडियातुन पैसे कसे कमवावेत, हेही यातून शिकायला मिळाले. या कार्यशाळेमुळे मी खूपच अपडेट झालो, खूप काही नवीन शिकायला मिळाले, विशेषतः सम्राट फडणीस, सुनील ढेपे, सचिन परब, विनायक पाचलग यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले.
अशी कार्यशाळा राज्यात ठिकठिकाणी झाली पाहिजे आणि त्यासाठी पत्रकार संघांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

- चंद्रशेखर भांगे
पुणे