अँकरच्या फेसबुक पोस्टनंतर पाठलाग करणाऱ्या तरुणांना अटक

आग्रा  - ​रात्री उशिरा काम संपवून घरी निघालेल्या एका न्यूज अँकरचा नशेत धुंद असणाऱ्या दोन तरुणांनी पाठलाग करून तिला त्रास देण्याची घटना उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात घडली आहे. दामिनी माहौर असे या न्यूज अँकरचे नाव असून तिच्या सोबत घडलेल्या या भयानक घटनेचे संपूर्ण वर्णन फेसबुकवर पोस्ट केले आहे. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाली आहे. महिला हेल्पलाइन क्रमांक १०९० वर फोन करून या घटनेची माहिती देऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा दावाही या पोस्टमधून दामिनीने केला आहे.

दामिनीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय, '' २५ जानेवारीच्या रात्री ८ वाजता मी भगवान टॉकीजकडून एमजी रोडकडे निघाले होते. नशेत असलेले ते दोन तरूण भगवान टॉकीजपासूनच माझ्यासोबत चालत होते. मी सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पण काही वेळाने ते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले. आपला मार्ग बदलावा म्हणून सूरसदनपासून पुढे मी दुसऱ्या दिशेला वळले तर ते दोघे तिथेही माझ्यामागे आले. शेवटी अस्वस्थ होऊन मी त्यांच्या गाडीच्या नंबरप्लेटचा फोटो काढू लागले. तेव्हा हा नंबरच बनावट असल्याचं मागच्या सीटवर बसलेला तरूण सांगू लागला. मग जेव्हा मी त्याचा फोटो घेऊ लागले तेव्हा तो चित्रविचित्र पोझेस देऊ लागला. आपण फोटोंमध्ये पाहू शकता, त्यांच्या चेहऱ्यावर लाज आणि भीतीचा लवलेशही दिसत नाहीए.''