दत्तावतारी संपादकांचा बेजबाबदारपणा !

चला जग जिंकू या ! म्हणणाऱ्या IBN लोकमतचे नामकरण  न्यूज १८ लोकमत करण्यात आले, डॉ. उदय निरगुडकर येऊनही या चॅनलचा टीआरपी वाढत नाही. टीआरपी वाढवा म्हणून एक सनसनाटी बातमी  महागौप्यस्फोट या मथळ्याखाली  चालवण्यात आली, मात्र या बातमीमुळं हे चॅनल अडचणीत आले आहे. यावर चित्रलेखामध्ये एक लेख छापून आला असून, हा लेख संपादक ज्ञानेश महाराव  यांनी लिहिला आहे.
हा लेख जसाच्या तसा प्रसिद्ध करीत आहोत..

महाराष्ट विधिमंडळाच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना महागौप्यस्फोट या मथळ्याखाली एक बातमी प्रसारित करण्यात आली. बरेच दिवस मराठी वृत्तवाहिन्यांवर काही सनसनाटी किंवा खळबळजनक बातमी प्रसिध्द झाली नव्हती. त्यामुळे या बातमीबाबत मोठे कुतुहल होतं. बातम्यांच्या जगात काही खळबळजनक घडल. अस वाटत होतं. परंतु प्रत्यक्षात हा महागौप्यस्फोट प्रसारित झाला आणि बघणार्‍यांनी ऐकणार्‍यांनी फुस्स म्हटल ! खुप गाजावाजा करून एखादा सिनेमा प्रदर्शित करावा आणि तो सुपरफ्लॉप व्हावा, तसे या बातमीच झालं.

 संबंधित बातमीत एक कथित बांधकाम व्यावसायिक आणि कथित मध्यस्थ, अशा दोन व्यक्तींमधील दुरध्वनी संभाषाची ती ध्वनिफित महागौप्यस्फोट म्हणुन ऐकवण्यात आली. त्यातुन विधिमंडळात प्रश्न विचारण्यासाठी आर्थिक व्यवहार होतात. असा आरोप ध्वनित होत होता. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांचा त्यांच्याशी संबंध जोडण्यर्चीं येत होता. कारण त्यातील एक व्यक्ती धनंजय मुंडे यांच नाव घेत होती. 

ज्या वाहिनीने ही बातमी चालवली, तिथे गुरूदेव दत्त याच्यासारखी संपादक म्हणुन तीन डोकी आहेत. त्यातले एक तर डॉक्टर आहेत. पण त्यांना आणि त्यांच्या दोन कंपाउुंडर संपादकांना बातमीचे साध तत्व कळत नसण्याचा रोग जडला असावा, हे लक्षात घेऊनच तिथल्या पत्रकारितेची दुरावस्था समजुन घ्यावी लागते. या प्रकाराने एकुण इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेची आब्रु चव्हाट्यावर आणलीय. धनंजय मुंडे यांची सुपारी तर घेतली नव्हती ना. अशी शंका येण्याजोगी ही बातमी होती. अन्यथा एवढी पोचट बातमी कुणी दाखवलीच नसती. आणि दाखवली असती, तर त्यात ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांचे म्हणणे दाखवण्याचीही खबरदारी घेतली असती तस झाल नाही. 

आज सरकारविरोधात विधिमंडळात आणि महाराष्ट्र भरात धनंजय मुंडे हेच एकटे आक्रमकपणे बोलताना दिसतात त्यांचे चारित्र्यहनन करून सरकारविरोधात बोलणारा एक आवाज बंद करण्याचं कारस्थान म्हणुनही या बातमीकडे पहाव लागेल. परंतु संबंधिताचं हे कारस्थान यशस्वी होऊ शकले नाही. कारण बातमी म्हणुन जी ऑडिओ क्लिप ऐकवण्यात येत होती. त्यातील एक गृहस्थ म्हणत होते की, उद्या जर काही झालं आणि धनंजय मुंडेला पैसे द्यायला लागले तर माझ्या पदरचे मी देईलन. पण हा विषय (विधीमंडख सभागृहात) येऊ देणार नाही. त्याला सांग तु टेंन्शन नको घेऊ एवढ्याच संवादाची ती ध्वनिफित होती. 

या संभाव्य व्यवहाराबाबत संबंधित वाहिनी आणि तिचे संपादक ठाम नव्हते. तर त्यांनी स्वतः त्याची खात्री करून घ्यायला हवी होती. त्या विषयाचा पाठपुरावा करून त्यातील सत्य आणि तथ्य तपासुन ती बातमी पुराव्यांसह अधिक मजबुतपणे मांडायला हवी होती. परंतु तस न करता आम्ही संबंधित ध्वनिफितीची पुष्टी करत नाही. अशी टीप टाकुन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. अर्थात संपादकाला अशी जबाबदारी झटकता येत नाही. केवळ दोन अनोळखी व्यक्तीमधील संपादकाच्या आधारे, संबंधित संवादाची कोणत्याही प्रकारे पुष्टी होत नसल्याची जाणीव असतानाही आरोपामधील सत्यता पडताळुन न पाहता एखाद्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करणे, हे सुपारीला पुष्टीचा गंध लावुन पुजेचा गणपती बनवायची भटगिरी आहे. ही बातमी प्रसारित होत असतानाच विधिमंडळातील चर्चेत या बातमीला खोडसाळ ठरवुन हक्कभंगाचा इशारा दिल्यानंतर बातमीचे प्रसारण थांबवण्यात आले. परंतु ऐवढी अपरिपक्व बातमी प्रसारित होतेच कशी? हा प्रश्न महत्वाचा आहे. या प्रकरणी आता न्युज 18 लोकमत या वृत्तवाहिनीचे मालक, संपादक, वृत्तसंपादक, वृत्तनिवेदक संबंधित वार्ताहर आणि एचडीआयएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पुरंदरे यांच्याविरूध्द विधान परिषदेत विशेषाधिकार भंगाची तक्रार दाखल करण्यात आलीय. 

या तक्रारीची विशेषाधिकार समितीमार्फत चौकशी करून एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेत. या चौकशीच व्हायच ते होईल कदाचित, भविष्यातील संबंध बिघडु नयेत म्हणुन तक्रार मागेही घेतली जाईल कारण माध्यमांशी संबंध सुरळीत ठेवणे, ही राजकीय नेत्याची गरज असते. परंतु या व्यवहारात पत्रकारितेची विश्वासार्हता किती गमावायची ? झाल्या प्रकारामुळे इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेच्या विश्वासर्हतेला आणखी एक तडा गेलाय.

- ज्ञानेश महाराव
  संपादक साप्ताहिक चित्रलेखा