आजच्या राजकीय धामधुमीच्या
,धकाधकीच्या (खरे तर धकवा धकवीच्या) आणि धक्काबुक्कीच्या काळात एखाद्या
पत्रकाराला राज्यसभेत खासदार होण्याची संधी मिळणे (लोकसभेत निवडून येणे
केवळ अश्यक्य म्हणून) हा दुर्मिळातील दुर्मिळ योगायोग म्हणावा
लागेल.आमच्यातल्या (पत्रकार या नात्याने) श्री श्री श्री कुमार केतकरांना
हा 'योग' साधला.काही खवचट मंडळी याला 'अखेर गंगेत घोडे न्हाले'म्हणतात.पण
आम्ही तसे म्हणणार नाही.फार फार तर 'घोडे'अखेर ( अखेर का होईना )अटकेपार
पोहचले ; किंवा 'दिल्लीचेही तख्त 'गाठतो' पत्रकारही मराठी.असे आम्ही
'आदरार्थी'म्हणू .केतकर अचानक खासदार कसे झाले ? याची रंजक कथा ते खासदार
पदावरून निवृत्त झाल्यावर मुमुक्षूंच्या सेवेत पुस्तक रूपाने (अर्थात
यथावकाश) प्रस्तुत करतीलच.तूर्तास खासदार झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन
करण्याचे औचित्य राखायला हवे.तर त्यांचे खासदार झाल्या बद्दल हार्दिक
अभिनंदन (आणि त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्या बद्दल जाहीर निषेध ) केतकर
महोदयांकडून (महाभाग म्हणण्याचा मोह टाळला आहे ) पत्रकारांचे काही भले
घडवून आणण्याच्या अपेक्षा ठेवण्यात अर्थातच काही 'हशील'( हा त्यांच्याच
ठेवणीतला शब्द) नाही.मुळात ते तिथे कशासाठी गेलेत हे खुद्द त्यांनाही
अद्याप नक्की माहिती नसावे. ते पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून राज्यसभेत
गेलेत का ? की काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून ? कळायला मार्ग नाही . केतकरही
काही सांगायला तयार नाहीत .बरे,पुढील सहा वर्षात ते तेथे पत्रकारांच्या
संबंधी एखादा तरी प्रश्न मांडणार आहेत का ? पत्रकारांची बाजू घेऊन बोलणार
आहेत का ? गॉड नोज ! हे मान्य की ज्या दावणीला चारा पाणी मिळतो तिथेच शेण
सोडावे लागते.( केतकरांनी ते अवश्य आणि भरपूर सोडावे ) त्याच मालकाचे शेत
नांगरावे-वखरावे लागते.( यालाही हरकत नाही ) त्यामुळे केतकर या पुढे (
किमान सहा वर्ष तरी ) पत्रकार म्हणून भूमिका मांडण्यापेक्षा पक्ष प्रवक्ते
म्हणून काँग्रेसची तरफदारी करताना दिसतील हे नक्की.( फक्त त्यांनी नंदीबैल
बनून खेळ करू नयेत इतकेच ) कदाचित माध्यमांनी काँग्रेसवर टीका केली तर ते
माध्यमांवर गुरकावतील देखील ( विकलेला बोकड मालकावर शिंगे रोखतो म्हणतात)
अर्थात त्यात आश्च्यर्य वाटण्या सारखे काही नाही.कुमार केतकर हे काही
खासदार झालेले पहिले वाहिले पत्रकार नव्हेत.या पूर्वी भरतकुमार राऊत,विजय
दर्डा खासदार होऊन गेले आहेत.संजय राऊत विद्यमान आहेत.( राज्यसभेत ते
उपसभापती होणार अशाही अफवा आहेत ) या मंडळींनी राज्यसभेत जाऊन
पत्रकारांसाठी काय केले? आणि आता कुमार केतकर काय करणार ? हा आमचा सवाल
आहे.संजय राऊत किमान बाष्कळ-बेताल बडबड तरी करतात.केतकर तोंड तरी उघडतील
काय? समजा कधी उघडलेच तर 'नमनालाच घडाभर तेल जाळणारे'त्यांचे प्रस्तावनाखोर
'बीज'भाषण तिथे कोणी ऐकेल का ?या बाबत आम्हाला भयाण शंका आहेत. आम्हाला
खात्री आहे केतकर हे 'दांडीबहाद्दर'खासदार असतील.काँग्रेसने त्यांना खासदार
केले आहे ते 'थिंक टॅंक'म्हणून.पण हा थिंक टॅंक आधी काठोकाठ भरावा लागतो
हे काँग्रेसला अजून माहिती नाही.पुन्हा तो 'भरपूर'प्रमाणात 'गळका' देखील
आहे.खरे तर केतकरांना थिंक टॅंक म्हणण्यापेक्षा 'फिश टॅंक'म्हणणे अधिक
श्रेयस्कर (आणि सोयीस्कर देखील ) ठरेल.त्यांच्या कडे अनेक रंग ढंगाचे
'पाळीव 'मासे'आहेत.त्या आधारे ते काँग्रेसच्या दिवाणखान्याची शोभा वाढवू
शकतात.बाकी पत्रकार म्हणून पत्रकारांसाठी त्यांच्या कडून काही भले घडेल
याची सुतराम शक्यता नाही.संजय राऊत -भारतकुमार राऊत, विजय दर्डा यांनी काय
दिवे पाजळले म्हणून केतकर दीपमाळ उजळवतील ? पत्रकाराचाच संदर्भ द्यायचा तर
कितीतरी राजकीय नेते 'आपण कधीकाळी पत्रकार देखील होतो' हे मोठ्या
मानभावीपणाने सांगत असतात.प्रमोद महाजन आपल्या पत्रकारितेचे रंजक किस्से
खाजगी मैफलीत आवर्जून सांगायचे.माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी देखील
पत्रकार होते.या शिवाय प्रकाश जावडेकर,विनय सहस्रबुद्धे,नितीन
गडकरी,सुप्रिया सुळे सुद्धा आपण कधीकाळी पत्रकारिता केल्याचे सांगतात.ही
यादी आणखीही मोठी असू शकेल.परंतु या पैकी कोणी संसदेत गेल्यावर आपण जेथून
आलो त्या पत्रकार विश्वाच्या कक्षा विस्तारण्याचा सोडा ; किमान अपेक्षा
पूर्ण करण्याचा प्रयत्न केला ? नसेल तर मग केतकरांसारख्याचे संसदेत
भाडोत्री प्रवक्ते म्हणून जाणे आम्हाला तरी जयाप्रदा,रेखा,रूपा
गांगुली,दारासिंग,हेमा मालिनी,जया भादुरी,परेश रावल,धर्मेंद्र,विनोद खन्ना
इत्यादी पेक्षा वेगळे वाटत नाही.
रवींद्र तहकिक
कार्यकारी संपादक
दैनिक लोकपत्र