जिल्हा माहिती अधिकारी सानपवर अखेर गुन्हा दाखल

तुळजापूर -  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई  तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यासह मंदिर परिसरात ड्रोन कॅमेऱ्याने विनापरवाना चित्रीकरण केल्याप्रकरणी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या सहा जणांविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजाभवानी देवीचा मुख्य गाभारा, मंदिर परिसरासह राजे शहाजी महाद्वार परिसरात कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय बुधवारी (दि.३०) सायंकाळी चित्रीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्रीकरण करण्यात आल्याने खळबळ माजली होती. यावेळी मंदिर परिसरातील तिघांकडून ड्रोन कॅमेऱ्यासह ऑपरेटिंग सिस्टिम, तीन मोबाइल आदी साहित्य ताब्यात घेतले होते. जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप चित्रीकरणासाठी परवानगी घेतल्याचे सांगत होते. परंतु तब्बल २४ तासांनंतरही सानप चित्रीकरणासाठी परवानगी घेतल्याचे पत्र सादर करू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी सहायक पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी आरोपींची पाच तास कसून चौकशी केली.

शासकीय आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन
दरम्यान या प्रकरणात विनोद गणपत महाडिक (४२, प्रॉडक्शन हेड, रा. काशीनगर (ई ) मुंबई), कुशल कैलास वाघळे (२९, फिल्म डायरेक्टर रा. शिवाजी पार्क, दादर मुंबई) शेख सोहिद नासीर (२९, ड्रोन ऑपरेटर रा. अमृतनगर मुंब्रा, गोपाळ गबाजी कावडे (२८, कॅमेरामन रा. हारदांडा मुंबई ५२, सचिन हरिश्चंद्र मोरे (रा. वलगुड) मनोज शिवाजी सानप यांच्या विरोधात तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यासह मंदिर परिसरात ड्रोन कॅमेऱ्यासह विना परवाना चित्रीकरण करून शासकीय आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या फिर्यादी वरून १८८, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर
या प्रकाराने तुळजाभवानी मंदिराची सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. तुळजाभवानी मंदिराची सुरक्षा खासगी कंपनीकडे असून तब्बल २०० सुरक्षारक्षक तैनात असतानाही तुळजाभवानी मंदिरात ड्रोन कॅमेरा गेला कसा, कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात देवीचे चित्रीकरण करताना सुरक्षारक्षक किंवा मंदिर कर्मचाऱ्यांनी का रोखले नाही, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.


चित्रीकरणाचा हेतू काय? 
मंदिर परिसरात ड्रोन कॅमेरा सह विना परवाना चित्रीकरण केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये प्रॉडक्शन हेड, फिल्म डायरेक्टर यांच्यासह कॅमेरामन, ड्रोन ऑपरेटर आदींचा समावेश असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

सानप याने बळीराजा चेतना अभियानमध्ये लाखो रुपयाचा घपला केला आहे. एका सहकारी महिला कर्मचाऱ्यांस छळलं आहे,पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यास आजपर्यंत पाठीशी घातले आहे.आता तरी सानप याच्यावर कडक कारवाई करावी, त्यास निलंबित करावे,अशी पत्रकरांची मागणी आहे.

जिल्हा माहिती अधिकऱ्यास निलंबित करण्याची मागणी
उस्मानाबाद - जिल्हा माहिती अधिकारी पदाचा दुरूपयोग करून सरकारी कामात गैरकृत्य करणाऱ्या मनोज सानप यास तात्काळ निलंबित करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लोकपत्रिका संपादिका सौ. शिला उंबरे यांनी दिला आहे.
सानप यांच्यासह सहा जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याने माहिती व जनसंपर्क विभागाला काळिमा लागली आहे. सानप यांनी यापूर्वीही अनेक प्रताप केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यास पाठीशी घातले आहे.
सानप यांना तात्काळ निलंबित न केल्यास उस्मानाबादचे अनेक पत्रकार विभागीय माहिती कार्यालयासमोर आंदोलन करतील, असा इशारा उंबरे यांनी दिला आहे.
सौजन्य - उस्मानाबाद लाइव्ह