तुळशीदास भोईटे एबीपी माझा मध्ये जॉईन


मुंबई - लोकमत ऑनलाईन मधून अवघ्या तीन महिन्यात बाहेर पडलेल्या तुळशीदास भोईटे यांनी एबीपी माझा जॉईन केल्याने अनेकांच्या  भुवया उंचावल्या आहेत तर एबीपी माझाच्या प्रस्थापित टीममध्ये अस्वस्थता पसरली आहे. दुसरीकडे संपादक राजीव खांडेकर महाराष्ट्र टाइम्सच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे.

एबीपी माझा नंबर १ करण्यात राजीव खांडेकर यांचा सिंहाचा वाटा आहे, मात्र खांडेकर नंतर मीच  सेंकड पोस्टवर असल्याचे अनेकजण सांगत होते. त्यात इनपुटची भारत माता, बातम्यांची खिचडी करणारा कोल्हापुरी , स्पेशल रिपोर्ट करणारा सातारकर आणि सदैव प्रसन्न असणारा अँकर आघाडीवर होते. इतकेच काय तर मराठवाड्यात दुसऱ्यांच्या स्टोऱ्या स्वतःच्या नावावर देणारा उस्मानाबादी  मीच अमुक पदावर असल्याचा दावा करीत होता. मात्र भोईटे जॉईन झाल्यामुळे या सर्वामध्ये अस्वस्थता  पसरली आहे. भोईटे यांची नेमकी पोस्ट काय आहे, हे कळू शकले नाही, मात्र ते लवकरच संपादक होणार असल्याचे कळते.

दुसरीकडे संपादक राजीव खांडेकर महाराष्ट्र टाइम्सच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्र टाइम्सचे विद्यमान संपादक अशोक पानवलकर सेवानिवृत्त होणार आहेत. त्या जागेवर खांडेकरांची वर्णी लागली असल्याचे वृत्त आहे. खांडेकर महाराष्ट्र टाइम्सला गेल्यास आणि तुळशीदास भोईटे  एबीपी माझाचे संपादक झाल्यास माझामध्ये अनेक घडामोडी घडणार आहेत.