त्या पत्रकाराच्या कुटूंबीयास मदत द्या- धनंजय मुंडे

नागपूर - नागपूर येथील देशोन्नतीचे ज्येष्ठ पत्रकार दिवंगत श्री. देवेंद्र वानखेडे यांच्या कुटूंबीयांना मुख्यमंत्री मदत निधीतून जाहीर केलेली एक लाख रूपयांची मदत तातडीने द्यावी, अशी मागणी विधानपरिषदेत आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी औचित्याच्या मुद्दाद्वारे केली.

 सन 2016 मध्ये श्री.वानखेडे यांचे निधन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटूंबीयांना एक लाख रूपये मदत देण्याचे जाहीर करूनही देान वर्षात ही मदत मिळालेली नाही.

 याबाबत श्री.वानखेडे यांच्या पत्नी श्रीमती सुनिता वानखेडे यांची मुख्यमंत्री मदत निधी एक अफवा अशी एक पोस्ट सोशय मिडीयात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने त्याआधारे श्री.मुंडे यांनी वानखेडे कुटूंबीयास मदत देण्याची मागणी केली.

दिवंगत पत्रकार देवेंद्र वानखेडे यांच्या पत्नी सुनीता झाडे यांनी, मुख्यमंत्री निधी मिळत नसल्याबद्दलची  खंत फेसबुकवर मांडली होती. 

काय आहे पोस्ट ?
 ......


#मुख्यमंत्री_मदतनिधी_एक_अफवा

आपल्याकडे नैसर्गीक आपत्ती, अपघात, अकस्मीक संकटात मृतांना आणि जखमींना मुख्यमंत्री मदत निधी घोषीत केल्या जाते. मदतनिधी घोषीत झालेल्या मृतांच्या, जखमींच्या नातेवाईकांना त्यावेळी ही घोषणा एकूण तात्पुरता दिलासा मिळतो. पण प्रत्यक्षात मदत काही मिळत नाही. मुख्यमंत्र्यांची मदतनिधी ही केवळ अफवा ठरते. 
हे वेगळ सांगायला नको की, घरातील एक माणूस गेला किंवा आजारी पडला तर सर्वसामान्य माणसापुढे जगण्याचा पेच निर्माण होतो. नजीकचे लोक हात वर करतात. महागाई काही केल्या ऎकत नाही. अश्या परिस्थीतीत त्याच्यासोबत जगणारया माणसांची मोठी सर्कस होत असते. त्यात आपला समाज, आपली कुटूंबव्यवस्था, आपली शासनव्यवस्था त्यांची मौज घेण्यात आनंद मानतात हा भाग आपल्यातील सुशक्षित सुसंस्कारी असण्याचा, सुसंस्कृतपणाचा वैगेरे... अधोरेखीत करावा.
मध्यंतरी सगळीकडे सरकारचे लाभार्थी असण्याच्या जाहिराती प्रकाशित होत होत्या त्यावेळपासून  ही सल मनाला लागून होती वाटलं तुमच्याजवळ मोकळी करावी. 
सप्टेंबर २०१५ ला वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी माझे यजमान देवेन्द्र वानखेडे (जेष्ठ पत्रकार, देशोन्नती) यांचे गंभीर आजाराने निधन झाले. अगदी बेताची आर्थीक परिस्थीती, उपचाराचा खर्च आणि कर्जाचा बोजा अश्या परिस्थीतीत ते आम्हाला सोडून गेले. त्यानंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसाठीच्या मदत निधीतून आम्हाला एक लाख रुपये मदत निधी देण्याचे घोषीत केले. त्यादरम्यान एक आठवडा आधी सकाळचे पत्रकार प्रदीप भानसे यांचाही अकस्मात मृत्यू झाल्याने त्यांच्याही परिवारास मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसाठीच्या मदत निधीतून एक लाख रुपये मदत निधी देण्याचे जाहीर केले. त्यानंतर अर्जाचे सोपस्कार झाले. त्यानंतर अर्ज पोहचल्याचा एक मॅसेज आला. बस. त्यानंतर काहीच नाही. या गोष्टीला आजमितीस तीन वर्ष होत आहेत. 
पत्रकार संघाच्या वरीष्ठांना याबाबत सांगीतलेले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री नागपूरच्या या दोन्ही पत्रकारांना वैयक्तीकरित्या ओळखत होते. 
आपल्या मेलेल्या माणसाच्या नावावर मदतीची याचना, सरकारी मदतनीधीची वारंवार चौकशी बरी दिसत नाही म्हणून सोसणारे चुप बसतात. व्यवस्था हे जाणून आहे... 
आज जे आमच्या सोबत झाले ते इतरांसोबत झाले आहे. होत आहे. होत राहील. त्यामुळे इथे यानिमित्ताने निवेदन एवढेच की, 
अकस्मीक संकटग्रस्तांनो मुख्यमंत्री मदतनिधी एक अफवा आहे. यावर विश्वास ठेवू नका. 

---------------------
सुनीता झाडे
(सुनीता झाडे या प्रसिद्ध लेखिका आणि  पत्रकार आहेत. )