सुरमा भोपालीचा असाही 'दिव्य' दृष्टिकोन !

फक्त बातम्याच नाही जाहिरातीही नकारात्मक  शोले सिनेमात सुरमा भोपाली नावाचे एक पात्र आहे.लाकडाच्या वखारीचा धंदा करणारा हा बनेल बनिया कमिशन घेउन भुरट्या चोरांच्या जमानती घेण्याचा जोडधंदा करतो आणि त्यांचे चोरीचे पैसे देखील सांभाळतो.त्याच्या दृष्टीने हे सकारात्मकच काम असल्याने आपल्या कृत्याची त्याला खंत ना खेद असते.उलट फुशारकी मारत तो " हमारा नाम सुरमा भोपाली युंही भई नई है ! असे स्वतःच्या कौतुकाचे पालुपद आळवत असतो.असाच एक सुरमा भोपाली आमच्या मराठी वृत्तपत्र सृष्टीत आला आहे.वर्तमानपत्र  आता प्रबोधनाचे माध्यम राहिले नाही.व्यावसायिकता अपरिहार्यच आहे.आपले काम काय घडले हे सांगायचे आहे,काय घडावे किंवा घडले पाहिजे हे सांगण्याचे नाही वगैरे अंगचोर मानसिकता आता जवळपास सर्वच वृत्तपत्र मालक चालक आणि पत्रकारांनी स्वीकारली आहे.काही सन्माननीय अपवाद अशा करीता म्हणायचे की 'कडी लावा आतली म्हणणाऱ्यांना ,आम्ही नाही त्यातले' असे म्हणण्याची सोय व्हावी.
     तर विषय असा आहे की सकारात्मक बातमी ही नवीच संकल्पना आणणाऱ्या एका दिव्य दृष्टीच्या वर्तमानपत्राने २६ जुलै रोजी गुरु पौर्णिमे निमित्त आसाराम बापू या बलात्काराच्या गुन्ह्यात न्यायालयाने २० वर्षाची शिक्षा ठोठावलेल्या गुन्हेगाराचा भला मोठा फोटो असलेली पूर्ण पण जाहिरात छापली.जाहिरात कोणी दिली हा गौण मुद्दा आहे.जाहिरातदार जशी जाहिरात देईल तशी छापावी लागते हे ही खरे.व्यावसायिकता सांभाळावी लागते हेही बरोबर.परंतु मध्यम म्हणूनही काही जबाबदारी असते की नाही ? उद्या दाऊद इब्राहिमचा एखादा पंटर तुमच्या कडे आला आणि त्याने 'डॉन'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्यात तुमचे फुलपेज केव्हढ्यात आहे बोला ? असे म्हटले तर,तुम्ही दाऊद इब्राहिमची जाहिरात देखील छापाल का ? बहुतेक होय,ज्या अर्थी आसाराम बापूची छबी असलेली,त्यात त्याला 'सदगुरु परम पूज्य संत'म्हटलेली जाहिरात तुम्ही बिनदिक्कतपणे कमर्शियल आस्पेक्ट म्हणून छापू शकता तिथे दाऊदचे काय वावडे असणार.उद्या कोणी नथुराम गोडसेंच्या फाशी दिनी त्याची अमर शाहिद म्हणून जाहिरात द्यायची म्हटले तर तुम्ही त्याला रेटकार्ड द्याल.ही केवळ कल्पना नाही असे प्रत्यक्ष घडले आहे.सुरमा भोपालीत आसाराम बापूची जाहिरात पहिल्या नंतर माध्यम जगतात काय प्रतिक्रिया उमटायच्या त्या उमटल्या.परंतु ज्या वाचकाला आपण आपले दैवत आणि अन्नदाते मानतो त्यांनी देखील या हलकट आणि तद्दन धंदेवाईक मनोवृत्तीची छी थू केली.जेष्ठ प्रौढ तरुणांनीच नाही तर शाळकरी मुला-मुलींनी सुध्दा! प्रशांत दीक्षित,यांच्या सारखे ज्येष्ठ अनुभवी,वैचारिक पृष्ठभूमी असणारे संपादक असताना असे घडत असेल तर ही बाब गंभीर आहे.आजवरचे ठीक आहे.म्हणजे एखाद्या बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा झाली असेल तर ही बाब सकारात्मक असतानाही बातमीच्या मथळ्यापूर्वी 'नकारात्मक बातमी 'असा उल्लेख करण्याची कायदेशीर गफलत नजरचुक म्हणून किंवा 'दिव्य'दृष्टिकोन म्हणून खपवूनही घेतली जाऊ शकते.परंतु मीडिया पार्टनर होऊन जवळपास १० हजार विद्यार्थ्यांची शाळा बुडवून त्यांना उद्धव ठाकरेच्या वाढदिवसाच्या इव्हेंट निमित्त त्यांची चित्रे रंगवायला बसवणे यात कोणती सकारात्मक बातमीदारी आहे हे माझ्या सारख्या अल्पमती संपादकाला कळत नाही.
     कोणी म्हणेल हा कोल्ह्याला द्राक्षे आंबट असा प्रकार झाला.इतर पेपरचे काय माहिती नाही,परंतु संबंधित जाहिरातदार साधक माझ्याकडेही आले होते.पूर्ण पान जाहिरात देण्यासाठी.त्यांचा मजकूर आणि फोटो पाहून मी जाहिरात स्वीकारण्यास नकार दिला. आमच्या वृत्तपत्राचे मालक श्री अंकुशराव कदम यांनी देखील माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला,वास्तविक सुरमा भोपालीच्या तुलनेत आमचा पेपर सर्कुलेशन,पानांची संख्या,बातम्यांचे कव्हरेज,आर्थिक आवक जावक आणि उलाढाल या सर्वच बाबतीत किरकोळ आहे.एक पूर्ण पान जाहिरात नाकारण्याचा तोटा आमच्या पेपरसाठी मोठा आहे.सुरमा भोपालीसाठी एखादी जाहिरात म्हणजे दर्या में खसखस आहे,असे असूनही 'हमारा नाम सुरमा भोपाली युंही भई नहीं है ' म्हणत सुरमा भोपालीने जाहिरात घेतली.प्रत्यक्ष फोन करून स्पष्टीकरण विचारल्यावर 'हा जाहिरात विभागाचा मामला आहे' असे न पटणारे उत्तर देऊन मला 'पटव'ण्याचा..स्वारी कटवण्याचा प्रयत्न झाला.चला या निमित्ताने बलात्कारासारख्या गुन्ह्यात  तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगारांनाही वर्तमानपत्रात जाहिरात देऊन संत महात्मे सदगुरु सत्पुरुष ठरवण्याचा मार्ग मोकळा झाला.या अभिनव आणि दिव्य सकारात्मक दुष्टीकोणाचे स्वागत करायचे काय ?

-- रवींद्र तहकिक
कार्यकारी संपादक,दैनिक लोकपत्र