उतावीळ मराठी वृत्तवाहिन्यांची गांजेकस बातमीदारी

मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये नेमके कोणते पत्रमहर्षी काम करतात,ते कोणत्या गुरूंचे चेले असतात आणि त्यांची मराठी मायबोली नेमकी कोणत्या 'आळी'त राहते ? असे घनघोर प्रश्न पडून डोके चक्रावून जावे आणि स्वतःच्याच हाताने स्वतःचे केस उपटावेत असे एकाहून एक अकलेचे तारे सध्या विविध मराठी वृत्त वाहिन्यांवरून तोडले जात आहेत.मराठी भाषेची तर अक्षरशः ऐशी तैशीच केली जाते.शिव सेनेचा उल्लेख चक्क 'शव सेना' करण्यापासून बलात्कार-खुनासारख्या घटनांमध्ये पीडित महिलेचे फोटो प्रकशित करू नयेत असा दंडक असताना पीडित महिलेच्या अब्रूचे धिंडवडे काढण्याचा विकृतपणा तर राजरोस केला जातोच,त्याहून हद्द म्हणजे घटनेशी दुरान्वयाने संबंध नसलेल्या नामसाधर्म्य असलेल्या दुसऱ्याच महिलेचे फोटो फ्लॅश करण्याच्या गाढवचुका करून पुन्हा त्या बद्दल निर्ल्लजपणे हसत ' दिलगिरी'ची जिलेबी घोटवण्याचा बेशरमपणा ,वाहिन्यांचे ' समालोचट'करतात तेव्हा या 'पिंडीवर चढलेल्या विंचवांना वहाणेनेनेच बडवायला पाहिजे.दुसरा उपायच नाही याची खात्री पटल्याशिवाय राहत नाही.
     मराठी वृत्तवाहिन्या म्हणजे निव्वळ बेशरमाची बागाईतदारी आहे.कशी ? त्याचा प्रत्यय परवा माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधन वार्तेच्या निमित्ताने आला.वाजपेयी गेल्या सात ते आठ वर्षांपासून दुर्धर अशा मधुमेह,स्मृतीभंश यां सह आणखीही काही व्याधी आणि आजारांनी ग्रस्त होते.स्वतःचीच ओळख विसरलेल्या वाजपेयी यांची स्थिती जवळपास मरणासन्नच होती.असे असतानाही त्यांचे जेष्ठत्व आणि त्यांच्याबद्दलच्या श्रद्धा सद्भावना म्हणून फक्त त्यांचा पक्षच नव्हे तर अवघा देश त्यांच्या जीवितासाठी प्रार्थना करीत होत्या.काय होणार ? किंवा काय झाले असेल ? याचा सर्वानाच अंदाज आला होता.पण मढ्याच्या टाळूवरचेही लोणी चाटण्याची एक हापापलेली बुभुक्षित वृत्ती असते.नागड्याना औचित्याचे भान कोठून येणार ? त्यात पुन्हा कमरेची सोडलेली कुणाची लंगोटी वेशीच्या वरच्या टोकाला सर्वात आधी पोहचते या साठी अहमहमिका.त्यातून  मग एम्स रुग्णालयाकडून वाजपेयींच्या निधनाची अधिकृत सूचना जारी होण्याआधीच काही वृत्तवाहिन्यांनी वाजपेयींच्या निधनाची बातमी झळकावून टाकली.फक्त एबीपी माझा,सारख्या व्यावसायिक वृत्तवाहिन्यांनीच नाही तर सह्याद्री सारख्या सरकारी वाहिन्यांनी देखील ही " श्रावणी" केली.त्याहून कहर म्हणजे टीव्ही ९ या वृत्तवाहिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच मुखातून स्वतःच्याच मृत्यूचे शोक प्रगटन करण्याचा धक्कादायक प्रकार केला.
      दिवंगत माजी पंतप्रधान आणि जिवंत आजी पंतप्रधान यांचे बाबतीत झालेल्या या चुका केवळ तांत्रिक आणि कंपोझीट मिष्टेक म्हणून कशी खपवून घ्यायची हा प्रश्न आहे.मराठी वृत्तवाहिन्यांच्या या असल्या सवंग प्रसिद्धीसाठी बेभान झालेल्या धंदेवाईक बेजबाबदार उतावीळ आणि गांजेकस पत्रकारितेला फक्त आळा-चापच नाही तर जाब देखील विचारला गेला पाहिजे,आणि त्यानेही नाही सुधारले तर प्रेक्षकांनी त्यांचेवर सामूहिक बहिष्कार घालायला पाहिजे.त्या शिवाय हा  उठवळपणा थांबणार नाही.

----रवींद्र तहकिक
कार्यकारी संपादक,दैनिक लोकपत्र