महिला पत्रकाराचा आरोप - कैलाश खेर चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता...

अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकप्रकारे #MeToo मोहिमेला सुरुवात झाली आहे. लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवत अनेकजण समोर येऊन बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘क्वीन’ चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहल याच्यावरील असभ्य वर्तनाचे आरोप ताजे असतानाच आता प्रसिद्ध गायक कैलाश खेरवर एका महिला पत्रकाराने आरोप केले आहेत.
टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, एका फोटो जर्नलिस्टने कैलाश खेरवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. संबंधित महिला कैलाशच्या घरी मुलाखतीसाठी गेली असता ही घटना घडली. यावेळी मुलाखतीसाठी तिच्यासोबत आणखी एक महिला साथीदार होती. ट्विटरच्या माध्यमातून या महिला फोटोग्राफरने हा धक्कादायक खुलासा केला आहे.
ट्विटमध्ये तिने लिहिले, ‘मुलाखत देताना कैलाश खेर सतत आमच्या मांडीवर हात ठेवत होता. मुलाखत पटापट संपवून आम्ही दोघी तिथून बाहेर पडलो. माझ्या साथीदार पत्रकाराला मी मुलाखतीत या घटनेविषयी लिहिण्यास सांगितलं होतं. पण वृत्तपत्र अशी बातमी छापणार नाही, असं तिचं म्हणणं होतं.’
कैलाश खेरसोबतच या महिलेने मॉडेल जुल्फी सय्यदवरही आरोप केले. ‘क्रूज लाइनरवर मी माझ्या काही पत्रकार मित्रांसोबत गेले होते. त्यावेळी माझा फोन चार्जिंगला लावण्यासाठी मी जुल्फीच्या रुममध्ये गेले असता, त्याने मला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत तक्रार करण्याविषयी माझ्यासोबत असलेल्या पत्रकारांशी बोलले असता, तुझे हे आरोप कुणीच छापणार नाही असं मला सांगण्यात आलं. दुसऱ्या दिवशी जुल्फीने माझी माफी मागितली,’ असं तिने ट्विटरवर लिहिलं.


साभार - लोकसत्ता