श्रीमान कुमार केतकर माझ्यासाठी वय आणि अनुभव या दोन्ही बाबतीत सिनिअर
आहेत.पत्रकारितेत त्यांनी चाळीस वर्ष काढली.माझी अनुभवाची (
पत्रकारितेतल्या ) पुरचुंडी फक्त चार वर्षाची आहे.म्हणजेच त्यांच्यातला
अनुभवाचा अधिकचा 'शून्य'माझ्यात 'उणे'आहे.शिवाय मला कधीच त्यांच्या 'अंडर
प्रेशर' काम करण्याची पाळी आली नसल्याने त्यांचे खायचे सोडाच,दाखवायचे दात
सुद्धा मला पाहण्याची वेळ आली नाही. हे एकाअर्थी बरेही म्हणावे
लागेल.असो,पण हे मान्य करावेच लागेल की राजीव गांधी” पुरस्कार, “रत्नदर्पण”
पुरस्कार, “जाएन्ट्स आंतरराष्ट्रीय” पुरस्कार शिवाय
भारत
सरकारचा पद्मश्री एवढे पुरस्कार केतकरांच्या झोळीत आहेत.त्या मानाने आमची
ओंजळ अजून रीती आहे.दुसरे म्हणजे कुमार केतकर जग फिरून आलेले आहेत.मी अजून
महाराष्ट्रही पुरता पाहिलेला नाही.तिसरे म्हणजे त्यांना सगळे ओळखतात (आणि
'ओळखून'आहेत ) मला कोणीच ओळखत नाही.थोडक्यात पत्रकारितेत माझी पाटी कोरी
आहे,केतकरांची 'पाटी' मात्र शिगोशीग भरलेली. अगदी दादा कोंडकेंच्या
'सोंगाड्या' या सिनेमातील 'काय ग सखू ' या गाण्यातल्या प्रमाणे
'डोईवर पाटी,पाटीत भाकरी,भाकरीवर तांब्या,
तांब्यात दूध हाय गाईचं,गाईचं व ..
घेता का दाजीबा वाईच..( किंवा वाईनचं !)
- यांचं असं का होतं ?
- भाग दोन : केबीन कॉक कुमार केतकर
इतकी
शिगोशीग ! आठ वर्ष महाराष्ट्र टाईम्स,सात वर्ष लोकसत्ता,काही महिने (
बहुतेक साडेतीन ) दैनिक लोकमत,आणि प्रदीर्घ विश्रांती नंतर 'दिव्य
मराठी'च्या दलदलीत नामधारी मुख्यसंपादकपद भोगून पत्रकारितेतून एक्झिट.स्वतः
केतकर किंवा केतकरपंथी 'एक्झिट'शब्दाला विरोध करतील.पत्रकार शेवटपर्यंत
पत्रकार असतो.तो कधी निवृत्त होत नाही वगैरे छापील वाक्यांश आमच्या तोंडावर
फेकतील.पण सरणावर जाई पर्यंत पत्रकार म्हणून जगायला( आणि पत्रकार म्हणून
मरायला) माणूस मुळात पत्रकार असावा लागतो.तो सुद्धा नुसता हाडामासाचा
नाही,तर गरम रक्ताचा ! केतकर पत्रकार आहेत पण थंड रक्ताचे.ते वेटोळे घालून
बसायला नेहमीच आयते बीळ शोधतात.शीत निद्रा घेतात.सरपटतात,आणि डूख धरून दंश
देखील करतात.विशिष्ट कालावधी नंतर औ'कात'सुद्धा सोडतात .उदाहरणार्थ आता ते
काँग्रेसच्या वतीने राज्यसभेत खासदार आहेत. (त्या वरून काँग्रेसची राजकीय
विचार आणि भूमिकांची दिवाळखोरी किती वाढली आहे याचा अंदाज यावा.) केतकर
राज्यसभेत किंवा माध्यमात खरेच काँग्रेसला साह्यभूत ठरणार आहेत का ? संसदेत
होणारी काँग्रेसची वैचारिक कोंडी फोडणार आहेत का ? राजकीय सभा,प्रचार आणि
निवडणूक काळातील उपद्व्याप हा केतकरांचा पिंड नाही,त्यांना ते झेपणार
नाही,पेलवणार नाही,आणि मानवणारही नाही.पण निदान थिंक टँक म्हणून का होईना
केतकर काँग्रेसला किफायती ठरतील का ? याचे उत्तर 'शून्य'असे आहे,म्हणजे
नाही ! केतकर कधी कोणाच्या उपयोगाला आले म्हणून काँग्रेसच्या येतील ?
उदाहरणार्थ 'राफेल' बद्दल केतकरांनी अजून अवाक्षरही काढलेल नाही.राहुल
गांधी सावरकर स्वातंत्र्यवीर नाहीत असे म्हणाले,त्यावर ते कसे
स्वातंत्र्यवीर नाहीत हे केतकरांनी सांगायला हवे होते,पण केतकर गप्प.नजी
सुभाष चंद्र बोस आणि सरदार पटेलांवर काँग्रेसने अन्याय केला असे मोदी
म्हणाले,मोदींचा हा खोटा आरोप केतकरांनी खोडून काढला नाही.पटेलांचा एवढा
उंच पुतळा कशासाठी उभारला ? असे केतकरांनी विचारले नाही.पण याच केतकरांनी
आघाडी सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक बांधण्याच्या
निर्णयाला अग्रलेख लिहून विरोध केला होता.( इंदू मिल मधील डॉ .बाबासाहेब
आंबेडकर यांच्या स्मारका बाबत मात्र सोयीस्कर मौन बाळगलं होतं) अगदी जेम्स
लेन प्रकरणात ग्रंथ लेखकाच्या संशोधन आणि लेखन स्वातंत्र्याच्या अधिकाराचे
समर्थन आणि भांडारकर संग्रहालयावरील हल्ल्याचा निषेध करण्याचा
'वैचारिक'अधिकारही त्यांनी वापरला होता.अगदी खैरलांजी बाबतही केतकरांची
प्रिडिक्शन अत्यंत अमानुष आणि असहिष्णू अशीच होती.दुसरीकडे बाबासाहेब
पुरंदरेंना दिलेल्या महाराष्ट्र भूषणाचे मात्र त्यांनी सहर्ष स्वागत केले
होते.परभणीत ब्राम्हण अधिवेशनाला जाऊन तिथे ब्राम्हण पूर्वी गो मांस भक्षण
करीत असे सांगून त्यांनी काय साधले ते त्यांनाच माहित,पण ती घटना आणि
घटनाक्रम आमच्या दृष्टीने अजूनही शंकास्पद आणि संशयास्पद आहे.
केतकर हा 'इसम', केबीन कॉक आहे ! म्हणजे पूर्वी दिवसभर घरात बसून
पडून झोपून राहणाऱ्या इसमाला 'घर कोंबडा'म्हटले जायचे ना ? तसे केतकर केबीन
कॉक आहेत.गावात कोणी मेला काय किंवा कोणाच्या घरी काही गोड बातमी आली काय ?
घर कोंबड्याला त्याचं ना सोयर,ना सुतक ! तसेच केतकर. स्वतःच्या केबीन
पलीकडे त्यांच्या दृष्टीने जगाचा नकाशा संपतो.त्यामुळेच केतकर चार पाच पेपर
फिरले तरी केतकरच राहिले.त्यांचा स्वतःचा एक कंपू आहे.म्हणजे गॅंग ! टोळी
म्हणा हवेतर.या टोळीचे केतकर 'म्हाळे' आहेत.( किंवा होते असे म्हणा)
टोळीतील म्हाळ्या हा टोळीचा मालक चालक प्रमुख सूत्रधार असतो.स्वतःच्या
टोळीत तो 'नरा'ला वाढू देत नाही.कोणी वाढू लागलाच तर त्याच्या नरडीचा घोट
घेतो .माद्या मात्र पाळतो ,भोगतो,सांभाळतो.त्यांचे रक्षण देखील करतो .पण एक
दिवस असाही येतो की म्हाळ्या गाळपाटतो.मग त्यानेच हाकलून दिलेला एखादा
वा'नर' हल्ला करून म्हाळ्याला पिटाळून लावतो.( जसं दिव्य मराठीत घडलं )
असो.
. चळवळीच्या,प्रबोधनवादी,वैचारिक पत्रकारितेला उतरती
कळा लागून वृत्तपत्र उद्योगाचे व्यावसायिकीकरण होण्याच्या सीमेवर जो संघर्ष
झाला,त्यात काळानुसार धंदेवाईक न बनूशकलेली वृत्तपत्रे आणि पत्रकारही
संपले.तेव्हा केतकर नावाचा ठाण्याचा कोकणी ( चित्पावनी ) 'पांडा' मात्र
सर्व्हायव्हल ऑफ दि फिटेस्ट ठरून तरला.अगदी रामायणातल्या समुद्रात
तरंगलेल्या ' दगडा'सारखा ! त्या वेळी या 'दगडावर' कोणाचं नाव होतं ? हे
सगळ्यांना माहित आहे.पण हा असा हनुमान निघाला ज्याने 'सेतू' बांधण्या ऐवजी
सुतावरून स्वर्ग गाठत रामालाच सातासमुद्रापार धाडलं.तेही कायमचं ! बाकी मग
आपल्या प्रदीर्घ वृत्तपत्रीय प्रवासात केतकरांनी अनेक राजसूय यज्ञ
केले.त्यात ढिगाने समिधा आणि बळीही दिले.सर्पसत्रही केलं .कांगारूला जशी
शिंगे नसतात तशी केतकरांना वैचारिक भूमिका वगैरे काही नाही.पोटाला मात्र
स्वार्थाची अप्पलपोटी पिशवी आहे .त्यातली पिल्ली ते प्रसूतीनुसार बदलत
असतात .त्यांचे काँग्रेस प्रेम देखील ढोंगी आणि दांभिक आहे. जे आहे ते
सुद्धा नेहरू,इंदिरा गांधी या दोन व्यक्तीशी निगडित आहे.त्यांची आणीबाणीचे
समर्थन करण्याची भूमिका देखील निव्वळ कातडीबचाऊ होती आणि आहे.बाळासाहेब
ठाकरे यांच्या प्रमाणे केतकरांनाही त्यावेळी आणीबाणीत आपली मान तुरुंगात
अडकवून घ्यायची नव्हती.बस इतकेच.दुसरे त्यांचे नेहरू प्रेम ! महाराष्ट्रात
पत्रकारिता करून काही लाभ पदरात पाडून घ्यायचे असतील तर आज जसे उदय
निरगुडकर,राजीव खांडेकर वगैरे मंडळी मोदी आणि फडणवीसांची तळी उचलतात त्याच
प्रमाणे केतकर पंडित नेहरू, इंदिरा गांधी,राजीव गांधी ,यशवंतराव
चव्हाण,वसंतराव नाईक,वसंत दादा पाटील यांची तळी उचलत राहिले.काहीही होवो
'आपले खुराडे शाबूत राहिले पाहिजे' इतकी ही भूमिका सरळसोट आहे .आणि केतकर
त्या बाबतीत पक्के खिलाडी आहेत.त्यांना म्हणे बदलाचा 'वास'येतो.वासाचा
'फ्लेवर'कसा आहे त्या नुसार केतकर मोल्ड होतात.त्यांचा पत्रकारितेचा प्रवास
पहिला तरी त्यांचा हा 'हुंगण्याचा'सिक्स सेन्स किती पावरफुल आहे हे आपल्या
लक्षात येईल.केतकरांना काहीही वर्ज्य नाही.ते सर्वभक्षी आहेत .त्यांना
कशाचा अभिनिवेश नाहीं तसाच कशाचा विधिनिषेधही नाही.पुन्हा कशाचा पश्चातापही
नाही.त्यांच्या इतका 'कोडगा'माणूस मराठी पत्रकारितेत तरी माझ्या पाहण्या
ऐकण्यात नाही.त्यांची राजकीय सामाजिक समज,वाचन व्यासंग अभ्यास अनुभव
वादातीत आहे,यात तुसुभरही शंका नाही.परंतु ते केबीन कॉक आहेत,स्वतःच्या
खुराड्यापलीकडे एकूण पत्रकार विश्वाचा,त्यांच्या प्रश्नाचा, समस्या आणि
अडचणींचा सहानुभूतीने सोडाच माणुसकीच्या नात्याने देखील ते विचार करत
नाहीत.कधी करणार नाहीत.म्हणूनच ते खासदार झाले तरी पत्रकारविश्वासाठी
काहीही करणार नाहीत .हे नक्की .केतकर नेहमीच स्वतःची दंडेलशाही आणि तोरा
गाजवत राहतात,'तुरा'नाचवत राहतात.मला स्वतःला त्यांच्या या 'कोंबडू' पणाचा
प्रत्यक्षात अनुभव नाही,पण अनेक जण सांगतात,त्यात संगती आहे. त्यांची
बोलण्याची पद्धत,बॉडी लॅंग्वेज,आवाजाचा स्वर आणि लहेजा,लिखाणाची पद्धत आणि
शैली,मुख्य म्हणजे 'विषय' ! आणि त्याहून मुख्य त्यातील 'मी ! ' पणा !!
स्वार्थी सेल्फिश पायापुरते पाहणारा आणि तितकाच पाताळयंत्री,मनाचा
थांगपत्ता लागू न देणारा,कोणालाही सुगावा लागू न देता शिकार साधणारा असा हा
'कोंबडा'आहे ! केबीन कॉक !
यांचं असं का होतं कळत नाही...
रवींद्र तहकिक
रवींद्र तहकिक
कार्यकारी संपादक,दैनिक लोकपत्र
------------------------------ ---
पुढील सोमवारी वाचा
तो प्रवास 'सुंदर 'होता