कविवर्य कुसुमाग्रजांची एक प्रसिद्ध कविता आहे,
' तो प्रवास सुंदर होता.
आभाळ उशाला धरती.
तेजोमय
नक्षत्रांचे आश्वासन माथ्यावरती''

- यांचं असं का होतं ?
- भाग तीन : तो प्रवास 'सुंदर' होता...
सुंदर लटपटेंनी स्वतःला थोडी शिस्त लावून घेतली असती.जरासा
व्यवहारीपणा राखला असता,त्यांच्या बद्दल आस्था आत्मीयता जिव्हाळा आणि प्रेम
असणाऱ्या हितचिंतकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले नसते आणि नियतीने जराशी
साथ दिली असती तर सुंदर लटपटे बाबतीत 'तो प्रवास 'सुंदर' होता ' या
काव्यपंक्ती तंतोतंत खऱ्या ठरल्या असत्या.पण ते होणे नव्हते.आज घडीला सुंदर
कुठे आहे,काय करतोय,कसा राहतोय , मला माहित नाही.दोन वर्षांपूर्वी
औरंगाबादेतच कुठल्याश्या अपार्टमेंटमध्ये तो राहात असल्याचे कळल्यामुळे
तिथं भेटायला गेलो होतो.जरासा भीत भीतच.कारण तो कसा प्रतिसाद देईल याचा
अंदाज नव्हता.दैनिक लोकपत्रच्या व्यवस्थापनाने सुंदरला कार्यकारी संपादक
पदावरून हटवून मला कार्यकारी संपादक केलं होतं.त्यालाही दोन वर्ष उलटून
गेली होती.अर्थात त्याची नोकरी जाण्यात माझा काही रोल नव्हता.चाटे कोचिंग
क्लासेसच्या पब्लिकेशन जाहिरात आणि क्रिएटिव्ह डिपार्टमेंट मध्ये काम
करणाऱ्या मला सुंदर लटपटेनेच लोकपत्रमध्ये आणलं,आणि वर्तमानपत्र क्षेत्राचा
काहीही अनुभव नसताना,जर्नालिझमची पदवी नसताना केवळ चांगला लिहू शकतो
म्हणून थेट वृत्तसंपादक करून टाकलं.अर्थात सुंदरचे आणि माझे स्नेहबंध फक्त
लोकपत्र पुरतेच मर्यादित नव्हते आणि नाहीत.औरंगाबादच्या 'शासकीय
विद्यानिकेतन'चे आम्ही विद्यार्थी.आम्ही म्हणजे मी (रवींद्र तहकिक),सुंदर
लटपटे,चाटे शिक्षण समूहाचे मछिंद्र चाटे,अर्थक्रांतीचे यमाजी
मालकर,मंत्रालयाच्या माहिती आणि जनसंपर्क,तसेच 'लोकराज्य'मध्ये कार्यरत
असलेले ब्रिजकिशोर झंवर,इत्यादी.एक दोन वर्ग आगे-मागे असे आम्ही तब्बल सहा
वर्ष एकत्र निवासी वसतिगृहात राहिलेलो.तेही पाचवी ते दहावीच्या
वयात.सुंदरचं शाळेतील नाव 'दिलीप'.मराठवाड्यातील माजलगावचे बडे राजकीय
प्रस्थ आणि पुलोद सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेल्या सुंदरराव सोळंके
यांच्या नावावरून दिलीपच्या वडिलांनी सुंदरला 'सुंदरराव'म्हणायला सुरुवात
केली आणि दिलिपचे नाव सुंदर पडले.सुंदर लटपटे ! सुंदरचे वडील प्राथमिक
शिक्षक होते.आष्टी तालुक्यातील एका खेड्यागावातील कोरडवाहू अल्पभूधारक
कुटुंबातून आलेला सुंदर वि वि चिपळूणकरांसारख्या प्रेमळ शिक्षक आणि
शिक्षणतज्ज्ञाच्या नवोन्मेषी दृष्टीत वाढला.दहावी नंतर त्याने कला शाखा
निवडली.पदवीचे शिक्षण घेता घेता दैनिक मराठवाड्यात चिकटला.समाजवादी आणि
युक्रांद चळवळीशी जोडला गेला.समाजवादी आणि युक्रांदवाल्यानी औरंगाबादेत काय
सामाजिक परिवर्तन घडवून आणलं माहिती नाही,पण या चळवळीतल्या बहुतेकांनी
प्रेमविवाह केले.तेही आंतरजातीय.बहुतेक प्रकरणात तरुण बहुजन आणि कन्या
ब्राम्हण असाच जोड असायचा,अर्थात यालाही अपवाद होताच,पण सुंदरच्या बाबतीत
कॉमन तेच घडलं.त्याची पत्नी 'वृन्दा' ; ब्राम्हण.आणि हा वंजारी.लग्न झालं
तेव्हा सुंदर फार फार तर २२ वर्षांचा असावा.वृन्दा माझ्यामते अल्पवयीनच
असावी.हे लग्न उन्हाळे कुटुंबाला मान्य नव्हतं.विशेषतः संजीव उन्हाळे
यांना.स्वतः संजीव उन्हाळेंनी प्रेम विवाह केलेला.तोही आंतरजातीय.विशेष
म्हणजे बहूजनातल्याच मुलीशी.असे असताना आपल्या बहिणीने एका बहुजनांच्या
मुलाशी विवाह करणे संजीव उन्हाळेंसह संपूर्ण उन्हाळे कुटुंबाच्या पचनी पडले
नाही,टोकाचा विरोध झाला.तरी वृन्दा-सुंदर विवाह झाला.उन्हाळेंनी सुंदरला
कधीच आपला मानला नाही,वृन्दाशीही नातं तोडलं.त्या काळात मित्रांनी सुंदरला
खूप मदत केली.मछिंद्र चाटे,सखाराम पानझडे,आता औरंगाबाद मध्य चे शिवसेना
आमदार असणारे संजय सिरसाठ, असे आणखीही काही हातभार होते.सुंदरने काही काळ
अक्षरशः रिक्षा चालवून संसाराचा गाडा ओढला.परिस्थिती बिकट होती,नंतर काही
काळ लोकमत मध्ये आणि १९९५ च्या पहिल्या टप्प्यात लोकपत्रमध्ये उपसंपादक
म्हणून काम करताना सुंदरला जेमतेम १५०० रुपये पगार होता. त्याकाळी सुंदर
चारमिनार सिगारेट ओढायचा.जगणे बेधुंद तेव्हाही होतेच.सुदैवाने पत्नी वृन्दा
हिला बँकेत नोकरी लागली होती.पगारही चांगला होता.त्यामुळे बरे दिवस
होते.परंतु 'कोळी'जसा स्वतः भोवती जाळं विणत जातो आणि त्यात अखेर स्वतःच
अडकतो तशा सुंदरच्या चाली नेहमीच त्याच्या अंगलट येतात.उदाहरणार्थ :
सुंदरने
दैनिक मराठवाडा सोडण्याचं कारण त्याचं इंटरकास्ट लव्ह मॅरेज हे होतं.( असे
हे पुरोगामी ,समाजवादी !) लोकमत सोडण्याचं कारण सुंदरचा अंगभूत दुराग्रही
आणि नको त्या प्रसंगी नको तितका अणकुचीदार होणारा अवाजवी स्वाभिमान हे
होतं.( खुद्द 'दर्डा'ला 'दरडावून' बोलल्यावर आणि 'केला'ची 'सालटी'
काढल्यावर दुसरं काय होणार ?) सुंदर जवळ जेव्हा हाताला काम आणि खिशात
पैसा असतो तेव्हा तर तो जग्गजेता सम्राट असतोच.पण जेव्हा त्याच्यावर उधार
उसनवारी करण्याची वेळ येते तेव्हाही त्याच्या नजरेतला वागण्यातला
बोलण्यातला कैफ उतरत नाही.१९९७ ते २००७ या दहा वर्षाच्या काळात 'एकलव्य
स्वाध्यायमाला', 'साप्ताहिक महाराष्ट्र' आणि' एकलव्य लर्निग पॉईंट' या
उद्योगसंस्थांच्या रूपात सुंदरने न भूतो न भविष्यती एवढे वैभव
पहिले,उपभोगले.अक्षरशः कोरोडोची उलाढाल.याच काळात त्याने वृन्दाला बॅंकेतली
नोकरी सोडायला लावली.दोघे मिळून व्यवसाय बघू लागले.औरंगाबादेत स्वतःची
भव्य पाच माजली इमारत.बंगला.छापखाना,चार पाच फोरव्हीलर,मुंबईत दादर
सारख्या मोक्याच्या ठिकाणी मोठं कार्पोरेट ऑफिस.राज्यभर दीड दोन हजार
कर्मचारी आणि डीलर एजन्सीधारक. व्यवसायासाठी २०-२५ ओमिनी गाड्या.असं सगळं
जमून आलं होतं.मेहनती पेक्षाही नशिबाने.सुंदरचं 'दैव'त्याच्यावर मेहरबान
झालं होतं.पण म्हणतात ना दैव देते आणि कर्म नेते.तसंच झालं.अचानक आणि एकदम
मिळालेलं अवाढव्य यश सुंदरला पचवता आलं नाही बहुतेक.पहिली काही वर्षे सोडली
तर सुंदर रेंगाळत गेला.अवाजवी आणि अवास्तव इगो त्याला जात्याच होताच,अचानक
आलेल्या श्रीमंतीने त्याला फाटे ( खरे तर काटे ) फुटत गेले.त्यात त्याची
व्यसने ; ड्रिंक्स,स्मोकिंग,हॉटेलिंग वगैरे.त्याला धरबंध राहिला नाही.
राजाचे तारतम्य आणि ताळतंत्र सुटल्यावर साम्राज्य गडगडायला वेळ लागत
नाही.सुंदरचं तर भान देखील सुटलं होतं.म्हणजे त्याने दारू कितीही पिली
असती,चेन स्मोकिंग केलं असतं ( करतच होता : करतच असतो म्हणा ) जगभर
विमानाने फिरला असता,कायम पंचतारांकित हॉटेलात राहिला असता,वाटेल ती ऐश
केली असती तरी काही बिघडलं नसतं.तेवढा पैसा कमवतच होताच तो.किंबहुना
त्याच्या शौक-ऐय्याशीसाठी खर्च होणाऱ्या पैशापेक्षा कितीतरी पटीने
अधिक.त्याच्या अपयशाचं त्याने स्वतः काही आत्मपरीक्षण किंवा विश्लेषण
केलेय की नाही माहित नाही,बहुदा नसावे.असले तरी ते तटस्थ नसेल.सुंदरला
कोणी त्याच्याकडे बोट दाखवलेलं अजिबात सहन होत नाही,तिथं स्वतःचं बोट कसं
खपणार ? परंतु
व्यवसायाच्या ऐन भरभराटीच्या वृन्दाची
कर्मचाऱ्यांशी वाढत गेलेली आरोगन्सी आणि सुंदरचे व्यवसायाच्या व्यवस्थान
तसेच आर्थिक उलाढालीकडे झालेले पूर्णतः दुर्लक्ष.या मुळे अत्यंत नेटक्या
आखीव रेखीव संरचनेचा अक्षरशः मोहोंजदाडो-हडप्पा झाला.सावरणं शक्यच
नव्हतं.आभाळ फाटल्यावर ठिगळ कसं जोडणार,आणि कुठं कुठं.धरण फुटल्यावर काहीही
करता येत नसतं,काय काय आणि कुठं कुठं बुजवणार.भगदाडं अनेक,एक बुजवायला
जावं तर दुसरं पडलंच समजा.यात सुंदर एकटा पडला.काही त्याने स्वतः दुरावून
घेतले होते,काही त्याची अवस्था पाहून पळाले.अक्षरशः वाताहत झाली.सगळं वाहून
गेलं .कोणातरी नात्यातल्या पोरावर डोळे झाकून टाकलेला विश्वास नडला ,हे
सगळं इतकं अंगलट आलं की कर्ज आणि देणी फेडता फेडता सुंदर अक्षरशः कफल्लक
झाला.रस्त्यावर आला.बंगला,ऑफिस,गाड्या,फर्निचर, छापखाना, सगळ्या वस्तू
,साहित्य सगळं अक्षरशः भंगाराच्या भावात फुंकावं लागलं.डायबेटिसचा आजार
जडला,पेरिलीसीसचा झटका आला .त्या नंतर सुंदर सात वर्ष भूमिगत होता.या
काळात पुन्हा चाटे ,पानझडे,या मित्रांनी,गोपीनाथ मुडेंनी त्याला आर्थिक मदत
केली.काही काळ विश्वनाथ कराड यांच्या एमआयटी संस्थेतही सुंदरने काम
केलं,पण करोडोच्या नोटात खेळलेला सुंदर आता मानसिक दृष्ट्या खचला
होता,शारीरिक दृष्ट्या कोसळला होता.नावाप्रमाणेच लटपटला होता.लटपटला नव्हता
तो त्याचा दुराग्रह ! गाठीच्या खोडासारखा त्याचा इगो कधीच कोणत्याच
प्रसंगात भावनिक किंवा हतबल होत नाही.अनेकांसाठी स्ट्रॉंग पॉईंट असणारा
व्यक्तिमत्वाचा हा पैलू सुंदरसाठी मात्र कायम पदोपदी आणि वेळोवेळी घातक
ठरला आहे ,
----------------------
मध्यंतर
---------------------
--रवींद्र तहकिक
कार्यकारी संपादक,दैनिक लोकपत्र
------------------------------------------------------------
पुढील सोमवारी वाचा : तो प्रवास सुंदर होता : भाग २