दर सोमवारी ठरलेल्या दिवशी लेख न टाकू शकल्या बद्दल सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि वाचकांची मनःपूर्वक माफी मागतो.आणि माझ्या या लेखमालेला उदंड प्रतिसाद आणि प्रतिक्रिया दिल्या बद्दल सर्वांचे धन्यवाद सुद्धा.अनेकांनी मला वैयक्तिक फोन करून लेखमालेतील लेखाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिल्या.काहींनी 'हे कशासाठी लिहिताय ?' असंही विचारलं.म्हणून या लेखमालेची भूमिका आणि उद्देश स्पष्ट करतो.सर्वप्रथम स्पष्ट सांगतो की या लेखमालेतून कोणा व्यक्तीची निंदा नालस्ती,टवाळी करण्याचा किंवा उगीचच लक्तरे वेशीवर टांगण्याचा,बदनामी करण्याचा माझा हेतू नाही.तसे वाटले तर आपण सांगाल त्या दिवसापासून मी ही लेखमाला बंद करून टाकीन.
यातून कुणाचे समुपदेशन किंवा प्रबोधन करण्याचा किंवा पत्रकार विश्वाला काही एक विधायक दिशा आणि दृष्टी देण्याचा वगैरे उदात्त हेतू आहे असेही नाही.माझी तेवढी पात्रता अनुभव व अधिकारही नाही.मुळात मी लौकिकार्थाने पत्रकारही नाही.म्हणजे पत्रकारितेची कोणतीही पदवी माझ्याकडे नाही.मी कधी कोणत्या बीटवर काम केलेले नाही.बातमीदारी केलेली नाही.टेबलला बसून बातम्या लिहिलेल्या किंवा एडिट केलेल्या नाहीत.किंवा पाच दहा वर्तमानपत्रात फिरलेलो देखील नाही.मुळात वयाच्या पंचेचाळिशीत मी पत्रकारितेत आलो आणि थेट कार्यकारी संपादक झालो.गेली पाच वर्ष कार्यकारी संपादक म्हणून काम करत आहे.नोकरीवर रुजू झाल्याच्या पहिल्या दिवशी पत्रकारितेतील काहीही अनुभव नसताना अग्रलेख लिहावा लागलेला आणि नंतर कायम तीच जबाबदारी सांभाळलेला मी अपवादात्मक पत्रकार आहे.हे अशा साठी सांगतोय की वयाचं जाऊद्या परंतु आपण सगळे मला सर्वार्थाने सिनिअर आहात.हे मला आपल्या ध्यानात आणून द्यायचं आहे.असो तर आपण मूळ विषयाकडे म्हणजे महावीर भाई कडे वळूया.
महावीरभाई म्हणजे महावीर जोंधळे.महावीर जोंधळेंना पुण्या-मुंबईकडचे,नगर जळगाव नाशिक सोलापूर कोल्हापूरकडचे पत्रकार कितपत ओळखतात माहिती नाही,मराठवाड्यातही आता ते विस्मृतीत गेलेत,परंतु १९९३ ते २००२ पर्यन्त जवळपास नऊ वर्ष औरंगाबादच्या दैनिक लोकमत आवृत्तीचे कार्यकारी संपादक असल्याने मराठवाड्यात त्यांना बरेच जण ओळखतात.पत्रकारितेतल्या न्यू जनरेशनला महावीर भाई म्हणजे काय चीज होती ते माहित नाही.तसेही भाई नावालाच पत्रकार आणि संपादक होते .एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्याने मास्तराच्या धाकापोटी नियमित गृहपाठ करावा अशी महावीर भाईंची पत्रकारिता नियमित,संयमित,माफक,किफायतशीर,संतुलित,आणि सुमार दर्जाची होती.लेखक म्हणून त्यांच्या कथा,कविता,ललित लेखन,बालनाट्य,बाल कादंबऱ्या देखील सुमार दर्जाच्याच होत्या,तिथेही त्यांनी गृहपाठाच लिहिले,पण त्यावर समीक्षा करण्याचे हे स्थान नाही.आपणाला त्यांची पत्रकार म्हणून उलट तपासणी करायची आहे,पत्रकार विश्वाने महावीरभाईंना काय दिले ? आणि भाईंनी पत्रकारविश्वाला काय दिले ? या दोन्ही प्रश्नाचे उत्तर काहीही नाही असे आहे.त्याचे कारण त्यांनी जिथे पत्रकारितेच्या नावाखाली गृहपाठ लिहिले त्या लोकमत समूहाकडे त्यांना काही देण्याची दानत नव्हती आणि महावीरभाईंकडे पत्रकारविश्वाला काही देण्याची कुवत नव्हती.थोडक्यात नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे.
परवा 'विचार वेध' नावाच्या कुठल्याश्या यु ट्यूब चॅनलवर ( हा म्हणजे पत्रकारांचा वृद्धाश्रम ! किंवा रिमांड होम अथवा अनाथालय म्हणा हवे तर ) महावीर भाई बोलताना दिसले,पत्रकार विश्वातल्या अपप्रवुत्तीवर आणि वृत्तपत्र मालकांच्या धंदेवाईकपणा बद्दल अत्यंत पोटतिडीकेने बोलले भाई.हे म्हणजे अरुण गवळीने दगडीचाळ सोडल्यावर काशीला जाऊन पारणे फेडल्या सारखं वाटलं मला.अंडरवर्ड मानवता विरोधी आहे वगैरे. किंवा दात पडल्यानंतर एखाद्याने 'शाकाहार उत्तम आहार ' म्हणत मांसाहारावर टीका करण्यासारखं . अहो महावीर भाई,महाराष्ट्रातल्या मराठी पत्रकारितेत ज्या वृत्तपत्रसमूहाने धंदेवाईकतेला सुरुवात केली त्या वर्तमानपत्राची औरंगाबादेत मुहूर्तमेढ कोणी रोवली ? तुम्हीच ना ? ताजमहालाच्या हस्तिदंती मनोऱ्यात बिछायत असे पर्यंत शरबत पीत 'वाह ताज' म्हणायचं आणि तिथून गठडी आवळून बाहेर फेकलं की त्यालाच ' मोहब्बत की कबर' म्हणायचं म्हणजे 'अन्नछ्त्री जेऊन मिरपूड मागण्या सारखं नाही काय ?'
- यांचं असं का होतं ?
- भाग - चार : सुपातले 'जोंधळे'जात्यात का भरडले ?
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या मुद्द्यावर दैनिक मराठवाडाचे संपादक अनंतराव भालेराव यांनी नामांतर विरोधी भूमिका घेतली.त्या विरोधात अग्रलेख लिहिले,त्यामुळे मराठवाड्यात काही ठिकाणी दंगली झाल्या.दलित वस्त्यांवर हल्ले झाले,जाळपोळ झाली.तत्कालीन पुलोद सरकारला नामांतराचा निर्णय मागे घ्यावा लागला,मग नामांतर आंदोलन सुरु झाले.दलित विरुद्ध दलितेतर असा संघर्ष उभा राहिला.याला अनंतराव कारणीभूत ठरवण्यात आले.अगदी ब्राह्मणी मनुवादी धोत्राखाली चड्डी घालणारा संघोटा म्हटले गेले.नेमक्या या परिस्थीतीचा फायदा नागपूरहून औरंगाबादेत लोकमत घेऊन आलेल्या राजेंद्र दर्डा यांनी घेतला.लोकमतने नामांतराला अनुकूल भूमिका घेतली,दलित चळवळीतल्या बिनीच्या कार्यकर्त्यांना बगलेत घेतले.बाबा गाडेंना तर मांडीवरच.ते ठीक म्हणजे दलित चळवळ नामांतरासाठी आग्रही असणे साहजिक होते,परंतु दर्डा बाबूंनी या निमित्ताने दैनिक मराठवाडाला खिंडार पाडले,कारण उघड होते,मराठवाडा कोसळला,नेस्तनाबूत झाला तरच औरंगाबाद आणि मराठवाड्यात लोकमतचे बस्तान बसणार होते.दर्डांना आंबडकरी चळवळ,नामांतर या बाबत खूपच आस्था वगैरे होती असे नाही,परंतु अनंतराव भालेराव आणि दैनिक मराठवाडाला संपवण्यासाठी नामांतर चळवळ आणि इथल्या तथाकथित पुरोगामी समाजवाद्यांना हाताशी धरून या संधीचा हत्यार म्हणून वापर करण्याचा धंदेवाईक चाणाक्षपणा बाबुजींकडे होता,त्यांनी तो अत्यंत खुबीने वापरला.बाबूजींच्या सुदैवाने आणि अनंतराव भालेराव तसेच दैनिक मराठवाडाच्या दर्दैवाने दर्डांच्या जाळ्यात 'पंखावाला कोंबडा' गवसला.म.य.उपाख्य बाबा दळवी ! अनंतरावांची नामांतरविषयक भूमिका टोकाची आततायी आणि चुकीची होती असे मानून चालू,वास्तविक अनंतरावांचा नामांतर विरोध जातीय नव्हता.मराठवाडा मुक्तिलढ्याची आठवण म्हणून विद्यापीठाचे नाव मराठवाडा असावे असे अनंतरावांचे म्हणणे होते.फार तर त्यात नामविस्तार करा,बाबासाहेबांचे नाव द्या,पण मराठवाडा वगळू नका असे अनंतराव म्हणत होते,अखेर ते तसेच झाले.पण या मुद्द्यावर अनंतरावांवर तुटून पडणाऱ्यांनी ( त्यात महावीर भाई सुध्दा आले ) बाळासाहेब ठाकरे जेव्हा 'घरात नाही पीठ आणि मागताय विद्यापीठ' असे म्हटले तेव्हा का कडकडीत अग्रलेख लिहिले नाहीत ? तेव्हा त्यांचे पुरोगामीत्व कोणत्या घाटावर पाणी पीत होते ? मुळात बाबा दळवी आणि त्यांच्या मागोमाग मराठवाडा सोडून दैनिक लोकमत मध्ये 'बाबां'ची जी काही (तथाकथित समाजवादी पुरोगामी) अंडीपिल्ली पक पक पकाक करत आली ( त्यात भाई होते ) ती काही वैचारिक मतभेदातून झालेली क्रांती किंवा उठाव वगैरे नव्हता.सगळे आले ते नव्या खुराड्यात दाणे टिपण्यासाठीच.खुराडा चकचकीत,अंडी घालायला आणि उबवायला मऊशार मुलायम वातानुकूलित खोपे,टिपायला टपोरे दाणे,पण या खुराड्याला दरवाजाही आहे ,आणि 'पोल्ट्री फॉर्मचा मालक' रोज 'पाखाडी' उचलून 'अंडं' दिलं की नाही हे तपासतो .(प्रसंगी 'बोट घालून' सुध्दा ! ) खुडूक कोंबड्याना सरळ 'खाटकाचं खोड' दाखवलं जातं.याचा कुणालाच अंदाज नव्हता .तो पुढे येत गेला,एका एकाला.क्रमा क्रमाने,त्यात एका दिवस महावीर भाईंचाही नंबर लागला,कसा ? तो वाचा पुढील भागात,पुढील सोमवारी,याच वेळी ,याच ठिकाणी. तो पर्यंत धन्यवाद !
पूर्वार्ध
पूर्वार्ध
--रवींद्र तहकिक
कार्यकारी संपादक दैनिक लोकपत्र