डष्टर,पिंजर,खार,खबुतर,डोली...खंजर !

पत्रकार मित्रहो, तुम्ही म्हणाल 'काय पोरखेळ लावलाय काय ?' डष्टर,पिंजर,खार,खबुतर,डोली...खंजर ! काय आहे हे ? आहो, आपल्यात सध्या जे चाललय,तेच सांगतोय.खरंच पोरखेळ झालाय.सहा जानेवारी जवळ आलाय.दर्पण दिन हो ! खरं म्हणजे आपणही आता दर्पण दिनाला 'ड्राय डे'ची मागणी करायला हरकत नाही.नको म्हणता ? ठीक आहे.मग काय,त्या निमित्ताने 'मामाचं पत्र हरवलं' खेळताय ? ते तर रोजच खेळतो की आपण.सूर पारंब्या,लगोरी,पतंग-काटाकाटी,कुरघोडी,कांदाफोडी,खो-खो,हॉलीबॉल-फुटबॉल.माहीर आहोत आपण त्यात,सर्वच.कोणी नुसतेच कोच,कोणी पट्टीचे खिलाडी,कोणी रिटायर्ड कॉमेंट्रेटर.पण खिलाडू वृत्ती नाही.निव्वळ रॅटरेस.जीवघेणा खेळ.किलिंग-स्पॉइलिंग पॉलिटिक्स.पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वाना याचा अनुभव आहे,कामाची म्हणून जेवढी काही क्षेत्रे आहेत तिथे पुढे जाण्याची स्पर्धा आहेच.परंतु कोणतेही क्षेत्र घ्या,तिथे कलीग म्हणून स्पर्धेचेही काही नियम निकष औचित्ये पाळले जातात.स्पर्धा असतेच पण निकोप असते.तत्व-बित्व सोडा,पण किमान एकमेकांबद्दल सद्भावना,सहानुभूती,करुणा बाळगायला काय हरकत आहे ? मदत नाही किमान सहकार्य.आजूबाजूला जरा बघा,कंपन्यातले कामगार,बिगारी काम करणारे मजूर,रस्त्यावर नाही ते धंदे करणारे फेरीवाले,पोलीस,प्रशासकीय कर्मचारी,शिक्षक,वकील ,डॉक्टर,व्यापारी,इंजिनियर्स,खाटीक,न्हावी-धोबी,फार कशाला आपलीच ताजी-शिळी रद्दी विकणारे पेपरस्टोलवाले,हॉकर्स,देवळातले पुजारी,फकीर-भिकारी,सगळ्या पक्षांचे पुढारी,जाऊद्या आपल्या( म्हणजे आपण जेव्हा जेव्हा ज्या ज्या वर्तमानपत्रात 'पत्रकार'म्हणून काम करत असतो त्या ) वर्तमानपत्राचे मालक एकमेकांशी कसे वागतात,एकमेकाला सांभाळून घेतात,वेळ प्रसंगी सहकार्य करतात ते पहा,आणि मग आपण काय करतो,कसे वागतो हे जरा 'दर्पणा' समोर उभे राहून न्याहाळा.
मुंग्यांचं उदाहरण देत नाही,पण गाढवं सुदधा रांगेत,शिस्तीत आणि एकमेकांशी समन्वय ठेवून ओझी वाहतात,बाकी आपण गाढवाप्रमाणेच भर उन्हात स्वतःच्याच सावलीला 'सावली'समजून उभे राहतो वगैरे ठीक.गाढवाप्रमाणेच आपले निर्मिती सामर्थ्यही एकूण आवाक्याच्या मानाने 'मोठे' आणि भयंकर असते.आणि त्याच अवसानाच्या बळावर आपण कायम 'दुगाण्या'झाडत मुर्खांच्या नंदनवनात लोळत असतो.यात नवखी शिंगरे जरा आबदार आबलुक वाटतात आणि अर्थात जुनी खोंडं 'आब'घाली.इतकेच.पण 'गाढवपणा'सारखाच.पूर्वी कधीकाळी टिळक -आगरकर,अत्रे-ठाकरे,भोपटकर-खाडिलकर,असे म्हणे वाद असायचे.पण ते वैचारिक.सध्या काय चालतं ते तुम्हीच पहा आणि ठरवा.
  • यांचं असं का होतं ? 

  • भाग - 5 

खरे तर मी आज दैनिक मराठवाडाचा अंत कसा झाला,महाराष्ट्रातील वैचारिक तत्वनिष्ठ भूमीकावादी पत्रकारिकरिता कशी संपुष्टात आली,वर्तमानपत्र चालवणे हा प्रशस्त व्यवसाय न उरता निव्वळ 'धंदा'कसा झाला,नैतिकतेची मूल्यवादी वस्रे एक एक करून कशी उतरवली गेली.हे वस्रहरण केले कोणत्या दुर्योधनाने ?( की द्रौपदीनेच स्वतःला एक्स्पोज केले ?) समजा तिला 'पणाला' लावले असेल तर तो जुगार मांडला कोणी ? खेळले कोण ? हरले कोण आणि जिंकले कोण ? कोणाच्या वाट्याला राज्य ? कोणाला वनवास ? कोणत्या धनुर्धरांना करावे लागले बृहन्नडा होऊन शृंगार ? कोणत्या गदावीरांना करावा लागला बल्लव होऊन स्वयंपाक ? ज्याच्या सत्यशीलतेमुळे रथाचे चाक अधांतरी राहायचे अशा कोणत्या धर्मवीराला 'कंक' होऊन हाकावा लागले रथ ? हे सगळं नैतिक नष्टचर्य कोणी ओढवून घेतलं ? दुर्योधन-दुःशासन का मातले.या सगळ्या वाताहतीला..आपल्यातलेच काही उचापतखोर जबाबदार आहेत.किंबहुना या उचापतखोरानीच मराठी पत्रकारिता बदनाम झाली आहे, बरबटली आहे,एकेकाळी पत्रकारम्हणून सर्वच ठिकाणी जो आदर सन्मान प्रतिष्ठा होती ती आता उरली नाही,समोर लोक काय बोलतात ते सोडा,मागे काय बोलतात ते पहा,एका व्यक्ती बाबत नाही म्हणत,एकूणच पत्रकार विश्वाबद्दल, व्यवसाया बद्दल बोलतोय.समाजात पत्रकारितेला विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा उरलेली नाही हे सत्य आहे.त्याला कारणीभूत ९९ टक्के आपणच आहोत.मालक मंडळी फक्त एक टक्का दोषी.पाहिलं बटन ते काढतात,तो ही अंदाज पाहून,पण आपल्यातले अनेक पाहिलं बटन उघडच ठेवतात,आणि इशारत झाली की सरळ 'न्यूड 'होतात.म्हणजे अर्थात नागडे ! त्यामुळे मालक मंडळींवर खापर फोडून काय हशील ? काय आहे, कुरणात म्हशी चरत असतात,आणि बगळे तिच्या पाठीवर शिंगावर बसून किंवा भोवताली फिरून म्हशीने उडवलेले किडे टिपत असतात,म्हशीला बगळ्यांच्या या 'खानेसुमारीशी'काहीच देणेघेणे किंवा कर्तव्य नसते,बगळे मात्र उगाचच म्हशी बदलत राहतात आणि वरतून 'अगं अगं म्हशी मला कुठे नेशी'म्हणत आपला पांढरपेशी अहंभाव कुरवाळत असतात.म्हैस कशाला कोणाला कुठे नेते.बगळेच म्हशी बदलत राहातात.दुसरा एक प्रकार त्याहून वाईट आहे.मला सांगा ज्या म्हशीच्या स्तनातून दूध निघते तिथे गोचीड काय पितात ? तर रक्त.बरे गोचिडाच्या रक्त शोषणाने म्हशीला पडून पडून काय फरक पडतो ? म्हैस मरते का ? नाही ! गोचीडच एक दिवस फुगून मरतो.थोडक्यात हे असे आहे.मला सांगायचे बरेच काही .बऱ्याच बाबतीत,बऱ्याच संदर्भात आणि बऱ्याच जनाबद्दल आहे.अगदी चाळीशीत मुक्त पत्रकारिता या गोंडस नावाखाली मेन स्ट्रीम मधून बाहेर फेकले गेलेल्या कितीतरी पत्रकारांची उदाहरणे येथे सांगता येतील.वयाचा प्रश्न तसा येतोच कुठे ? पण कितीतरी जण अक्षरशः घरी बसलेले आहेत.त्या पैकी प्रत्येकजण नवीन संधीच्या प्रतीक्षेत आहे,पण संधी मिळत नाही.एकदा बाहेर फेकले गेले की त्यांना सहसा पुन्हा 'खेळात'घुसू दिले जात नाही.बरे हे सगळे अन्यायग्रस्त असतात का ? तर त्यांच्या बाजूने बोलायचे झाल्यास होय.पण दुसरी बाजू पहिली तर यांनीही उमेदीत आणि अधिकारात अनेकांची अक्षरशः 'वाट'लावलेली असते.मग कोणीतरी शेरास सव्वाशेर भेटतो आणि यांची वाट लावून टाकतो.हिसाब बराबर.महावीर जोंधळे काय,संतोष महाजन काय,अरविंद वैद्य काय,दिवंगत विद्याभाऊ सदावर्ते काय किंवा अगदी प्रवीण बर्दापूरकर ,संजीव उन्हाळे,धनंजय चिंचोलीकर,अनिल फळे,सुंदर लटपटे,यमाजी मालकर इत्यादी इत्यादी.. हे सगळे 'बाबा दळवी'ना 'गुरु' मानणारे पत्रकार अनुभव, ज्ञान कौशल्य-क्षमता,बाबतीत 'कुबेरा'ला ( लोकसत्तावाले नाही ) लाजवणारी मंडळी नव्हेत काय ? पण मग 'यांचं असं का होतं ?'हा खंतावणारा प्रश्न उरतोच.अख्खे आयुष्य लोकमत साठी आयुष्य झिजवलेल्या विद्याभाऊंच्या वाट्याला कायम उपेक्षाच का आली ? लोकमतसाठी मराठवाडा सोडणाऱ्या संतोष महाजनांना तरुण भारत,लोकपत्र,सांजवार्ता,गावकरी अशी उतरती भटकंती का करावी लागली ? बाबा दळवी सुध्दा लोकमत मधून लोकपत्र मध्ये दीड वर्षाचा वनवास भोगायला आले होते.महावीर भाईंना लोकमतमधून कुमार केतकरांनी हुसकावून लावले.कारण काय तर महावीर जोंधळेंना इंग्रजी बोलता,लिहिता,वाचता येत नाही.फारच सुमार दर्जाचे इंग्रजी आहे.लेखनही ललित म्हणजे साहित्यिक दर्जाचे आहे,त्यात 'पत्रकार'नाही.वगैरे.सांगणाऱ्याने सांगितले आणि ऐकणाऱ्याने ऐकले.महावीरभाई बाहेर.आता महावीर भाई आदर्श पत्रकारितेचे धडे देत फिरतात.पण त्यांनीही कमी जणांना छळले पळवले पिटाळले नव्हते.आज 'कासवं आसवं गाळताहेत' खरी परंतु यांच्या पाठी निबर कवचाच्या आहेत.लोकमत सारख्या मराठी वर्तमानपत्रातील आचारसंहिता संपवणाऱ्या आणि पत्रकारितेला भलत्याच गल्लीत नेवून 'बाजारबसवी' बटकी करणाऱ्या वर्तमानपत्राला महाराष्ट्राचा आवाज ठरवणाऱ्या अनेकांच्या नरडीला अखेर तिथेच नख लागले.महावीर जोंधळे त्या पैकीच एक.डष्टर,पिंजर,खार,खबुतर,डोली...खंजर !
खूप लिहिले,पण जे लिहिले ते पोटतिडीकेने.कुणाचा उपमर्द करण्याचा,अहवेलना करण्याचा आजिबात हेतू नाही.कुणाला तसे वाटल्यास त्यांनी मला आवश्य फोन करावा,मला क्षमा मागण्याची संधी द्यावी,चला तर मग भेटू पुन्हा,याच दिवशी.याच ठिकाणी.तो पर्यंत नमस्कार.
--रवींद्र तहकिक
कार्यकारी संपादक ,दैनिक लोकपत्र
फोन : 7888030472