सुंदरतेचं कुरुप पर्व...

सुंदर लटपटेंनी मोठ्या हिकमतीने उभारलेल्या एकलव्याच्या साम्राज्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात पसरला होता.माझ्या अनुमानानुसार वार्षिक टर्न ओव्हर सात ते आठ कोटीचा असावा.इतक्या झटपट हे सगळं घडलं की या क्षेत्रातल्या भल्याभल्यांना भोवळ यावी.पैसा येत होता आणि जात होता.साचत नव्हता.त्याचं कारण सुंदरची नवीन युनीट सुरु करण्याची अतिघाई,आणि आहे त्या युनीटवर केला जाणारा आडमाप वारेमाप खर्च. अनावश्यक कर्मचारी भरती,आणि त्यांचे भरमसाठ पगार.सुंदरचा स्वतः चा खर्च देखील टाटा अंबानींना लाजवणारा होता.त्यात संपत्तीच्या उपभोगापेक्षाही व्यवस्थेविरुध्दच्या विद्रोहातून आलेली सुडाची भावना होती.हे सगळं असंच चाललही असतं.पण सुंदरचं एकलव्यच्या आर्थिक व्यवहाराकडे होत गेलेलं अक्षम्य दुर्लक्ष, निरनिराळ्या आस्पेक्टवर उचलेली बँकांची,खाजगी सावकारांची,( नव्या)मित्रांकडून घेतलेली भरमसाठ कर्ज या चक्रात सुंदर फसत अडकत गेला.देणी देण्याशिवाय पर्याय नव्हता. येणी मात्र वसूल होत नव्हती.पसारा ईतका वाढवून ठेवला होता की आता तो आवरणं सावरणं हाताबाहेर गेलं होतं.त्यातच सुंदर आणि व्रंदा सोडून अख्ख्या एकलव्यला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले.वितरक,एजन्सीधारक,
वसूलीविभाग,लेखाविभाग अशी सगळी साखळीच बनली.त्यांनी सगळा येणारा पैसा गडप केला.मग देणी भागवता भागवता आणि व्यवसाय वाचवण्यासाठी आणखी कर्ज,ती फेडण्यासाठी आणखी कर्जे. कर्जाचा डोंगर वाढत गेला.व्यवसाय घटत गेला.तो वाचवण्यासाठी सुंदर सोबत विश्वासाचं एकही माणूस नव्हतं.जे होते ते दाढ दुखीला गुळाचं औषध सांगणारे होते.त्यातूनच मग,वैशाली सावंतचं "ऐका दाजीबा "वगैरे.एकलव्याच्या शोकांतिकेचा तो क्लायमॅक्स होता.सगळं संपलं.सुंदर सर्वार्थाने उध्वस्त आणि बरबाद झाला.अक्षरशः रस्त्यावर आला.दिवाभीताचं आयुष्य जगण्याची वेळ आली.जे होतं ते बँकानी जप्त केलं.उरलं सुरलं ज्याच्या हाती जे सापडलं त्यांनी लुटून नेलं.सुंदर पहात राहीला.काहीही करु शकला नाही.
हे वर्ष होतं २००७.त्यानंतर सुंदर अज्ञातवासात होता.जवळपास सहा वर्षे. या काळात त्याला डायबीटीजने गाठलं.पँरालिसीसचा अँटेक आला,पिणं स्मोकींग अति झालं.घर दार काही राहिलच नव्हतं.अक्षरशः गरजेच्या वस्तू विकून,हात उसणी घेऊन,पोटाची भूक,औषधं आणि व्यसनं भागवण्याचा भणंग उद्योग सुरु झाला.हे सगळं लाजिरवाणं होतं.अशावेळी सुंदरचा स्वाभिमान, ईगो,आत्मप्रतीष्ठा कोणत्या बीळात जाऊन लपते माहीत नाही. तो अशा अवस्थेत कोणाही समोर हात पसरु शकतो. या काळात बहुतेक गोपीनाथ मुंडेंच्या शिफारशीने तो विश्वनाथ कराड यांच्या पुण्याजवळील एमआयटी मध्ये नोकरीला लागला.खरं तर आता सुंदरने खरच औकातीने राहायला हवं होतं.पण एखादा साप कसा हवा पिला की फणा काढतो आणि फुत्कारतो,तसं सुंदरचं आहे.थोडा आधार मिळाला की त्याचा कणा मोडलेला षंढ स्वाभिमान फणा काढून डोलायला लागतो.
एमआयटीत तेच घडलं.

  • यांचं असं का होतं ? 

  • भाग तीन :तो प्रवास 'सुंदर' होता... उत्तरार्ध
अकाऊंटला पैसे मागताना "मी विश्वनाथ कराडचा बाप आहे "म्हटल्यावर काय होणार?अर्धा तासात टेम्पो भरावा लागला.तसंही सामान होतच काय?एकलव्याच्या फायलींची आणि साप्ताहिक महाराष्ट्रच्या अंकांची रद्दी. खरी गोष्ट अशी की औरंगाबाद पर्यंत यायला बसभाड्याला पैसे नव्हते म्हणून टेम्पो भाड्याने केला.त्यात ही रद्दी आणि सुटकेस.कपडे वगैरे.औरंगाबादच्या नगर नाक्यावर आल्यावर जायचं कुठं हा प्रश्न होता.मेहुणा संजीव उन्हाळेने सोय करुन देतो असं सांगूनही ऐनवेळी तुमचं तुम्ही पाहून घ्या म्हणून अंगचोरपणा केला.अखेर मनपात मुख्य अभियंता असलेल्या सखाराम पानझडेंनी मित्र म्हणून मदत केली,आणि लटपटेंनी पुन्हा औरंगाबादेत पाय ठेवला.पण करायचं काय.राहायचं कुठे. खर्च कसा भागवायचा हा प्रश्न होताच.या बिकट प्रसंगात उन्हाळे कुटूबीयांनी सुंदरला आणि व्रंदाला मदतीचा हात,आधार,सावली द्यायला हवी होती.पण ते घडले नाही.वैभवात आकस मीटला नाही तो दुर्दैवात काय मिटणार ? अखेर काही दिवस सुंदरने त्रीमूर्ती चौकात चक्क आँमलेट भूर्जी पावचा ठेला चालवला.पण त्यात काय भागणार.ठेल्यावर कमाई किती ? सुंदरला महिन्याला कमीत कमी सात ते आठ हजार घरभाडे, तीस हजार औषधोपचार खर्च,४० हजार घर खर्च आणि २५ते ३०हजार व्यसन खर्च. असा एकुण किमान लाखभर रुपये खर्चाला लागतात.ते कुठ आणायचे ? लोक मित्र म्हणून, आदर म्हणून,दया म्हणून देऊन देऊन किती देणार आणि किती वेळा.
पण याही अवस्थेत सुंदरच्या नशीबाने तब्बल तीनवेळा ऊचल खाल्ली.सुंदरला सावरण्याची, पुन्हा उभे राहाण्याची संधी मिळाली.पहील्यांदा तिथे, जीथे त्याने त्याच्या पत्रकारितेच्या पहील्या ईनिंगची लेखणी मँनबंद केली होती.दैनिक लोकपत्र...
सुंदरला कार्यकारी संपादक पद मिळालं.राहायला चार खोल्यांचा प्रशस्त फ्लँट, फोरव्हीलर आणि भक्कम पगार.शिवाय मेडीकल उपचार मोफत.सुंदर इथं काहीही न करता फक्त शांत राहिला असता तरी त्याचा उत्तरार्ध सुखाचा राहिला असता.मी व्रत्तसंपादक म्हणून सगळं पहात होतोच.पण म्हणतात स्वभाव खोडीला औषध नसतं. लोकपत्र मध्ये सुंदरने अक्षरशः मठ उभा केला.त्याच्या भोवती झुलणारे जोगते जोगतिणी.त्यांनी सूंदरला हवेत नेले,किंवा सुंदर खुडलेल्या,खुंटलेल्या,खुरटलेल्या आणि कुरुप बनलेल्या त्याच्या बधीर अहंकाराचा कंडू त्या चिलीयाबाळांकडून शमवून घेत होता.त्यातच त्याला एक अवदसाही आठवली,बाकी व्यसने होतीच.त्याच्या गाडीला ब्रेक नसतंच.त्याला कोणीही ढकलून दिलं नाही, त्यानंच उडी फेकली.
लोकपत्र नंतर पुन्हा
अज्ञातवास.या काळात त्यानं मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टी भागात हाँटेल टाकून पाहिलं,चाललं अर्थात नाही. शैक्षणिक समुपदेशन, आर्थिक उद्योग व्यवसाय सल्ला वगैरे खटपट करून पाहीली.पण ही बुडणाऱ्या जहाजाला खिळेपट्टी होती.मुळात त्याने सोबत घेतलेली माणसे भंगार आणि मुर्ख होती.नुसतीच पोटभरु. सुंदरला माणसं कधीच ओळखता आली नाहीत.सदोदित लबाड भामट्या मवाल्यांवरच विश्वास. तोही डोळे झाकून.त्यातच सुंदर मध्ये आता काम करण्याची धमक धडाडी उरलेली नाही. तो कामच नाही करू शकत.एकतर आजार व्याधी,दोन आळस आणि तिसरं मानसिक द्रुष्ट्या झालेली पडझड परवड...त्यामुळेच लोकपत्र नंतर त्याला पुन्हा पुण्यनगरी सारख्या जबरदस्त खपाच्या दैनिकात नोकरी लागली तेव्हा तो ही नोकरी महिना दीड महिनाही टिकवू शकला नाही. ईथंही त्याचा भूछत्रासारखा परपोषी षंढ स्वाभिमान ऊफाळला.हे म्हणे पुरोगामी, फुल्यांचे २१व्या शतकातले अवतार.मग त्याला तेलि तांबोळी पाहिजेतच.यांनीही तांबोळ्यासाठी 'पुण्य नगरीत 'बंड केलं.परिणाम फुले पुन्हा निर्माल्य झाले.पण नशीब बलवत्तर. पुण्यनगरी ची फांदी मोडायला आणि औरंगाबादेत पुढारी यायला एकच गाठ पडली.हडळीला नवरा पाहिजे होता आणि झोटींगाला बायको.पण शेवटी भूतांचा संसार चालणार कसा..हे भूत तरी निदान पडक्या वाड्यातले आहे..ते डोंगरावरचे आहे.भल्या भल्यांना झपाटते आणि उरावर बसून घोळसून जीव घेते.त्याच्या पुढे सुंदर म्हणजे दाभणापुढे सुई.सुंदरला घाई नडली.पुढारी हा रवंथ करणारा प्राणी आहे.शेणाचं माप घेऊन चारा खाणारा.सुंदरला त्या कोल्हापुरी ऊसाचं कांडकं काही हाताळता सोलत आलं नाही, मुळ वाढं पेरं बारं सरी डोळा गवसला नाही. पुढारीला पुढारीच लागतो.सुंदर च्या 'बस'ची बात नव्हतीच ती.परीणाम,पुन्हा रस्त्यावर. संधी मिळालीतर सुंदर आजूनही एखाद्या मागच्या रांगेतल्या पेपरला चर्चेत सुस्थीतीत आणू शकतो.त्यासाठी त्याने काही नियम निर्बंध मात्र पाळले पाहिजेत.तो ते पाळणार नाही हे माहित असूनही तशी अपेक्षा मी करतोय.हे खरं,पण एवढी सकारात्मकता सिंपथी म्हणून का होईना दाखवली पाहीजे.
 ( समाप्त)
-रवींद्र तहकीक
कार्यकारी संपादक
दैनिक लोकपत्र
----------/-/
पुढील सोमवारी वाचा

सुपातले "जोंधळे"जात्यात का
भरडले....