अग्रलेखांचा बादशहा वाहतो पखाली...

'अग्रलेखांचे बादशहा' अशी वाचकांनी दिलेली पदवी अभिमानाने मिरवणाऱ्या 'नवा काळ'चे संपादक
निळूभाऊ अर्थात नीलकंठ यशवंत खाडिलकर.आता ८५ वर्षांचे आहेत.त्यांनी 'नवा काळ'चं संपादकपद केव्हाच सोडलंय.त्यांच्या कन्या जयश्री पांडे-खाडिलकर आणि जामात रमाकांत पांडे सध्या 'नवा काळ' चे 'काम' पहातात. त्यांच्या 'संध्याकाळ'या सायं दैनिकाचे काम रोहिणी आणि वासंती या त्यांच्याच कन्या पहातात.पत्नी मंदाकिनी व्यवस्थापन पहातात.हे सगळं सविस्तर या करीता सांगितलं की,निळूभाऊंचे आजोबा नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी १९२३ साली नवा काळ सुरु केल्यापासून हे वृत्तपत्र आजतागायत एकाच कुटुंबाच्या हातात म्हणजे 'एक हाती'चालू आहे.नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे नंतर त्यांचे पुत्र यशवंत खाडिलकर आणि यशवंतरावांच्या नंतर नीलकंठ खाडिलकर .वैचारिक वारसा म्हणाल तर तो नाट्याचार्यांपासून आहे ,परंतु निळूभाऊंनी 'नवा काळ'ला जी झळाळी दिली ती अद्वितीय आहे.मुंबई आणि उपनगरात 'नवा काळ' ने खप आणि लोकप्रियतेचा सुवर्णकाळ अनुभवला तो नीलकंठ खाडिलकरांच्या झणझणीत लेखणीच्या जोरावर. दमदार,कडक आणि जनसामान्यांच्या प्रश्नावर पोटतिडिकीने आणि तळमळीने लिहिणारे निळूभाऊ तितकेच निर्भीड आणि बाणेदार होते.म्हणूनच त्यांना लोकमानसाकडून अग्रलेखाचा बादशहा हा 'किताब मिळाला.
  • यांचं असं का होतं ? 

  • भाग -6 

नवा काळ हे वृत्तपत्र न राहता एक व्यक्तिमत्व बनले.पण आज घडीला हाच अग्रलेखांचा बादशहा म्हणजे निळूभाऊंचे .'नवा काळ'हे वृत्तपत्र अडगळीत फेकल्यासारखे झाले आहे.एकेकाळी भांडवलशाही वर्तमानपत्रांना लोकप्रियतेच्या बळावर चितपट करणाऱ्या नवा काळची अवस्था आज घडीला राज्य खालसा झालेल्या सम्राटासारखी झाली आहे.अग्रलेखाचा बादशहा आता अंधाराच्या पखाली वाहत आहे.त्याचे कारण निळूभाऊंच्या विचारांचा वारसा पुढील पिढीला पेलवला नाही,जपता आला नाही.हे आहे.जे लोकमान्य टिळकांच्या 'केसरी'चे झाले,आचार्य अत्र्यांच्या 'मराठा'चे झाले,अनंतराव भालेरावांच्या 'मराठवाडा'चे झाले तेच आता 'नवा काळ'चे होण्याच्या मार्गावर आहे.विचार संपले आहेत.लोकप्रियताही आटोपल्यात जमा आहे.'नवा काळ'चे वाचक आता शिगोट्यांचा 'मुंबई चौफेर'वाचतात आणि अग्रलेख वाचण्या ऐवजी शब्द कोडी सोडवतात.याचे कारण लोकांना वेड लागलंय-लोक उथळ आणि मूर्ख झालेत,असे नाही.'नवा काळ 'चा खळाळ आटलाय.निळूभाऊंनी लेखणी खाली ठेवली,आणि नवाकाळची कळाच गेली.नवा काळ अजून सुरु आहे,सुरु राहीलही,वाचक अजूनही आशेने नवाकाळ घेतात.पण ती मजा नजाकत राहिली नाही.बरे वारसांना विचारापेक्षा संप्पतीच्या वारसाहक्काच्या वाट्यात अधिक रस आहे असे गृहीत धरू ,मग धंदा व्यवसाय म्हणून तरी नीट करावा.तर तेही नाही.अशा स्थितीत 'नवा काळ'ला काय भवितव्य असणार ? महाराष्ट्रातल्या तीन चार हजार लहानमोठ्या वर्तमानपत्रांपैकी एक वर्तमानपत्र.बस.तशी तर मग तालुक्याच्या ठिकाणीही ' दैनिक गदारोळ ' ,'देता का छापू ' या छापाचे शेकड्याने लंगोटी पेपर चालतात.नवा काळ कडून या रांगेत उभे राहण्याच्या अपेक्षा नाहीत.परंतु असे घडत आहे.अग्रलेखाच्या बादशहाने अंधाराच्या पखाली वाहायला सुरुवात केली आहे.
मराठी वृत्तपत्रसृष्टीत 'नवा काळ' चं एतेहासिक महत्व आहे.लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर तीन वर्षांनी 'नवा काळ'सुरु झाला.नाट्याचार्य खाडिलकर सुधारणावादी होतेच पण पक्के टिळकपंथी देखील होते.१९९७ मध्ये ते टिळकांच्या आग्रहास्तव केसरीत उपसंपादक म्हणून रुजू झाले.टिळकांना राजद्रोहाच्या आरोपात शिक्षा झाली तेव्हा १९०८ ते १९१० असे तीन वर्ष ते केसरीचे संपादक होते.नंतर १९१८ साली टिळक इंग्लंडला गेले तेव्हाही
टिळकांनी संपादकपदाची जबाबदारी खाडिलकरावरच सोपवली होती.पुढे टिळकांच्या निधनापर्यंत( १९२० ) खाडिलकरच केसरीचे संपादक होते.टिळक गेले आणि खाडिलकरांनी केसरी सोडला,किंवा त्यांच्यासाठी केसरीचे दरवाजे बंद झाले.१९२० ते १९२३ त्यांनी मग एका ढोंगी टिळकभक्ताच्या 'लोकमान्य'नामक दैनिकात संपादकपद स्वीकारले.पण टिळकांच्या नंतर त्यांच्या राष्ट्रवादाला आणि स्वराज्य-स्वदेशी संकल्पनेला आलेले प्रच्छन्न आणि प्रचारकी स्वरूप खाडिलकरांना मान्य नव्हते.टिळकांचा देखील काही सुधारणांना विरोध होताच,परंतु त्यातून त्यांना सांगायचे हेच होते की सुधारणेच्या नादात स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या उद्दिष्टावरून जनतेचे लक्ष्य ढळलायला नको .परंतु टिळकांच्या नंतर टिळकभक्त नावाची एक जमात निर्माण झाली ती सरळसरळ कट्टरतावादी,पुरोहितशाही आणि ब्राह्मणशाहीचा पुरस्कार करणारी मंडळी होती.त्यांना स्वातंत्र्यलढाच हायजॅक करायचा होता.पण ते जमले नाही,स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व महात्मा गांधींकडे गेले.आणि टिळकपंथीयांनी मग हिंदू महासभा तसेच रा स्व संघाच्या माध्यमातून संस्कृती परंपरा आणि धर्मरक्षणाचा लढा सुरु केला .या सगळ्या स्थित्यंतराचे आणि संक्रमणाचे कृ.प्र.खाडिलकर सक्रिय साक्षीदार होते. कृ.प्र.खाडिलकर टिळकांचे अनुयायी असले तरी त्यांना हिंदू महासभा आणि रा स्व संघाचा उन्मादी,सनातनी ब्राह्मण्यवादी हिंदुत्वादी विचारसरणी अमान्य होती.त्यामुळे नकळत ते गांधीवादाकडे वळले.याच काळात मग १९२३ साली त्यांनी स्वतःचे 'नवा काळ'वर्तमानपत्र काढले.१९२९ साली वर्तमानपत्रातील एका वादग्रस्त लेखामुळे तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवून त्यांना एक वर्षाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड देखील ठोठावला होता.तुरुंगात जातानाच त्यांनी आपले पुत्र म्हणजेच निळूभाऊंचे वडील यशवंतराव खाडिलकर यांचे हाती नवा काळची धुरा सोपवली होती.यशवंतराव खाडिलकरांचा संपादकीय मगदूर जेमतेमच होता,त्यामुळे 'नवा काळ'ला या काळात अक्षरशः अवकळा आली.सूर्याने काजळी धरावी अशीच परिस्थिती आली.पेपर आज उद्या बंद पडणार इतकी डबघाईची अवस्था.चार पाने ,ब्लॅक व्हाईट.तीही आठवड्यातून एकदा,खप नावालाच.बहुतेक रद्दीच,छपाई तरी किती ? दोनशे नाहीतर तीनशे ते चारशे.पाचशे कधीच नाही.वरतून कर्जाचा डोंगर,कर्मचाऱ्यांचे पगार,देणी थकलेली.अशा स्थितीत नीलकंठ खाडिलकरांच्या हाती वर्तमानपत्रांची सूत्र आली आणि बघता बघता नवा काळ 'अग्रलेखाचा बादशहा 'झाला.मुंबई आणि उपनगराचा 'राजा.! दैनिक म्हणून नियमित छपाई आणि पाहिल्या पानावर अग्रलेख लिहिण्याची अनोखी स्टाईल ! नवाकाळने इतिहास फक्त घडवला नाही तर बदलला.अक्षरशः नामदेवा सारखं देऊळच फिरवलं.घुमान ! एका वर्षात एक हजार वरून तब्बल सात लाख एवढा प्रचंड वेगाने खप वाढण्याचा विक्रम नवा काळच्या नावावर आहे,जो अद्याप तरी कोणाला गाठता किंवा मोडता आलेला नाही.पण आधीच सांगितले ना ; अग्रलेखाचा बादशहा म्हणून निळूभाऊंचे नाव अजरामर राहील परंतु अग्रलेखाचा बादशहा असलेला त्यांचा पेपर 'नवा काळ' मात्र आता अंधाराच्या पखाली वाहतोय.यांचं असं का होतं ?
निळूभाऊंचे मराठी वृत्तपत्र सृष्टीला योगदान काय ? हेही सांगायला हवंच.त्या शिवाय वरील लेखाचं प्रयोजन कळणार नाही.ठीक आहे भेटू पुन्हा,पुढच्या सोमवारी,याचवेळी,याच ठिकाणी.तो पर्यंत नमस्कार.
-------------------------------------
खुलासा : मागील लेखात जेष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर हे बाबा दळवींचे अनुयायी आहेत असा उल्लेख करण्यात आला होता.या संदर्भात स्वतः प्रवीण बर्दापूरकर यांनी फोन करून आपण 'बाबा दळवींच्या कंपूतले कधीच नव्हतो.माझी वृत्तपत्र सुष्टीतील सुरुवात चिपळूण येथील नाना ( यशवंत ) जोशी यांच्या 'सागर'या प्रादेशिक वृत्तपत्रापासून झाली,नंतर नागपूर पत्रिका,सकाळ,लोकसत्ता,लोकमत असाही प्रवास झाला,पण मी ना कधी 'बाबा' वादी होतो,ना कधी 'बुआ'वादी.असे बर्दापूरकांनी स्पष्ट केले आहे.अनावधानाने त्यांचा उल्लेख बाबा कंपूत झाल्याबद्दल क्षमस्व.
-------------------------------------
-रवींद्र तहकिक
कार्यकारी संपादक दैनिक लोकपत्र
7888030472
----------------------------------------