पत्रकारीतेतील 'खडी' गम्मत !

पत्रकारदिनाच्या निमित्ताने तरी पत्रकारांबद्दल बरे बोला,चांगले लिहा,गुणवत्तेची दखल घ्या...
.'भेट'-'बक्षिसे'(पाकिटे) चालूच असतात.आजच्या दिवशी शुभेच्छा द्या.कौतुक नाही निदान अभिनंदन करा .असे कोणी म्हणेल.हे म्हणजे वर्षभर एकमेकाला आय भैनीवरून घोडे लावून संक्रातीला 'तीळ गुळ घ्या गोड गोड बोला म्हणण्या सारखे झाले' असो एवढी प्रस्तावना पुरे आहे.तर आज सांगायची आहे,पत्रकारितेतली 'खडी' गम्मत ! शब्द चुकला नाही,खरी नाही, 'खडी' गम्मतच सांगायचीय.खडी गम्मत म्हणजे काय ? ते आमच्यातल्या काही दगडोबांना इस्कटून सांगावं लागेल.गाव जत्रेत पूर्वी टुरिंग टॉकीज यायच्या,तमाशे यायचे,जादूगार यायचे,मौत का कुवाँ वाले,मॅजिक आरशेवाले,पन्नालाल गधेवाले,फुगे-पापण्या-पावे वाले,मुंबईची रंडी वाले,हल्या भूस खातो वाले,असे कितीतरी.या शिवाय खास मध्यरात्री जत्रेच्या एका कोपऱ्यात जरा आडबाजूला अंधारात कंदील-बत्ती लावून खडी गम्मत सुरु व्हायची.त्याचं थोडं मॉडर्न व्हर्जन आता लोकनाट्य कला केंद्राच्या रूपात सुरु आहे.पैटर्न तोच,पण बंद खोलीत.खडी गम्मत उघड्या माळरानावर असायची.'या रुपयाचं म्हणणं काय ?' कुण्या गावाचं आलं पाखरू' गाणं सुरु व्हायचं..दुसऱ्याच क्षणी अंधारात दोन रुपयांची नोट चमकायची,घुंगरू पेटी ढोलकी थांबायची.मग कमान टाकून किंवा गिरकी घेऊन,दोन रुपयाची नोट हस्तगत केली की त्या दोन रुपयाचं गाणं.'माझ्या बकरीचा सम्द्यास्नी लागलाय लळा' याला 'तोंडी-पाणी'म्हणतात.मग पाच रुपयाची नोट दातात धरून,दहाची गालगुच्चा घेऊन देऊन,विसाची गळ्यात हात घालून,पन्नासची मांडीवर बसून,शंभराची पदरात घेऊन असे एक एक टप्पे.लाज लज्जा शरम अब्रू वगैरे वेशीला टांगून तांबडं फुटेपर्यंत हा नंगानाच चालायचा.पत्रकारितेत अशी खडी गम्मत सुरु झालीय दुर्दैवाने.
  • यांचं असं का होतं ? 

  • भाग -7 
      कालच राज्यात पत्रकार दिन  साजरा करण्यात आला. पोळ्याला तरी मालकलोक बैलांच्या  अंगावर झुली, अंगाला गुलाल, शिंगांना बेगडे बाशिंगे-शेंब्या, गळ्यात घुंगरमाळा, नवे कासरे, मोरख्या, शिंगदोर्‍या वगैरे करतात, खांदा मळणी-दिवे ओवाळणी करतात. पुरणपोळी खायला घालतात. दर्पण दिनानिमित्त राज्यातला कोणताही वृत्तपत्रमालक त्याच्या वृत्तपत्रातील पत्रकारांना साध्या शुभेच्छा तरी देतो की नाही माहीत नाही. नाहीच बहुत्येक. आम्ही ज्या समाजाच्या बातम्या छापतो, ज्यावर भाष्य करतो तो समाज तरी पत्रकारांना पाहिजे त्या आदरयुक्ततेने शुभेच्छा देतो का? हेही तपासावे लागेल. नेमके काय बिघडले आहे हे पहावे लागेल. पत्रकार दिनाला ‘दर्पण दिन’म्हणण्याचीही प्रथा आहे. त्यानिमित्ताने पत्रकारांनी जरा स्वत :ला ’दर्पणा’त पाहावे हेही अपेक्षित आहे. पूर्वी फक्त  वृत्तपत्र हेच प्रसारमाध्यम होते.  संपादकाला पूर्णपणे लेखन स्वातंत्र्य असे, त्यांच्या नावानेच ती वृत्तपत्रे ओळखली जात. अलीकडच्या काळात या संरचनेत अमुलाग्र बदल झाले आहेत.  आजच्या वृत्तपत्रांतील, वृत्तवाहिन्यांतील बातम्यात विश्वासार्हता  किती, असाही एक प्रश्न सध्या चर्चेला असतो. याबरोबरच वृत्तपत्रात काम करणा-या पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न, पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाची पदवी घेऊन आलेल्या, वरिष्ठ जागांवर काम करणा-या संपादक मंडळातील व्यक्तींचे वाचन, त्यांची बौद्धिक पात्रता, विचारधारा, वृत्तपत्र कायद्यासंबंधीचे अज्ञान. पत्रकार हा समाजातील एक घटक आहे, त्यामुळे समाज परिवर्तन, समाजाच्या समस्या, राजकीय कार्यकर्ते, शासनातील अधिकारी यात समन्वय राखण्याची जबाबदारी पत्रकारांची असते. याची या व्यवसायातील किती पत्रकारांना जाणीव आहे? हा विचारही आजच्या स्थितीत महत्त्वाचा आहे. वृत्तपत्रांनी बातमीचा सोर्स सांगावा का ? असा मुद्दा नेहमीच चर्चेचा बनतो. यावर सार्वजनिक हिताच्या गोष्टीबाबत शोध घेऊन लोकांना माहिती देणे हे वृत्तपत्रांचे प्रमुख काम तर आहेच, वृत्तपत्राचे ते स्वातंत्र्यही आहे. कारण यामुळेच वाचकाला इतरत्र न मिळणारी माहिती मिळते. अनिष्ट-गैर गोष्टींना आळा बसण्यास सहाय्य होते. कित्येकदा वाचकाला किंवा सामान्य नागरिकाला ज्यात रस वाटतो ते लोकहिताचे असतेच असे नाही. उलट त्यातून कधी कधी अशांतता निर्माण होण्याची शययता असते.  काही पथ्ये ही कायद्याबरोबर समाजहित पाहून पाळायला हवीत. त्यासाठी कायद्याचेही थोडेङ्गार ज्ञान असणे जरुरीचे आहे. प्रेस कौन्सिल कायद्याप्रमाणे त्यांच्यापुढे येणार्‍या प्रकरणात प्रेस कौन्सिल पत्रकारांवर सोर्स सांगण्याची सक्ती करू शकत नाही. कायद्याच्या कलम 15(2)मध्ये याबद्दल स्पष्ट सूचना दिल्या असल्या तरी प्रेस कौन्सिलला न्यायालयाचे सर्व अधिकार नाहीत हेही पत्रकारांनी समजून घेतले पाहिजे. चटपटीत, चटकदार बातम्या अधिक वाचल्या जातात. त्यामुळे पोलीस वृत्तांना अधिक वाचक              मिळतो, पण केवळ गुन्हा दाखल झाल्याने तेवढयावरून बातमी देणे हे कितपत योग्य आहे? पोलीस नियंत्रण केंद्र, किंवा पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या बातमीचा पत्रकारांनी पाठपुरावा करून त्यामागील सत्य जाणून घेतले पाहिजे. राजकारणात कित्येकदा स्वत:च्या फायद्यासाठी काल्पनिक घटनातून खोटे गुन्हे दाखल होतात. त्याचे पुढे काय होते; काय झाले हे वाचकाला समजावून देऊन योग्य बातमी देण्यातच पत्रकाराचे कौशल्य असते.राजकीय मंडळी, चित्रपट व्यवसायातील व्यक्ती, उद्योजक, बांधकाम व्यवसायिक यांच्याविरुद्ध अनेकदा गुन्हे दाखल होतात. त्या बातम्या जशाच्या तशा छापल्या तर त्यातून एकाद्या व्यक्तीवर अन्याय होऊ शकतो. त्याची समाजात बदनामी होते. यासाठी पत्रकारांनी पोलिसांच्या बातम्या देताना सावधानता बाळगली पाहिजे. गेल्या ३० -३५  वर्षातील गुन्हेगारी क्षेत्रातील बातमी लेखन करणार्‍या काही पत्रकारांच्या बातम्या पहिल्या, तर त्यात उथळपणाच अधिक दिसतो. आजकाल गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत चालले आहे. त्याचा अभ्यास करून लेखन केले, तर पोलिसांनाही मदत होऊ शकेल. लेखनाचेही स्वागत होईल. पत्रकारितेत आता महाविद्यालयीन उफ शिक्षणाची सोय झाली आहे. असे पदवीधर तरुण वृत्तपत्रांत आले तरी लेखनाचा, प्रात्यक्षिकाचा अनुभव नसल्याने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दंगल, स्ङ्गोट, आग, अपघात, आपत्कालीन परिस्थिती अशावेळी नेमके कसे वागायचे? याची माहिती-अनुभव नसल्याने अशा घटनात स्वत:वरच जायबंदी होण्याची वेळ येऊ शकते. पत्रकारांवरील ह्याविरोधात कायदा व्हावा म्हणून पत्रकार संघटना प्रयत्नशील असल्या तरी शासन पत्रकार, यांच्याशिवाय, केवळ जी व्यावसायिक वृत्तपत्रे आहेत, त्यांचे   मालक यात कितपत आग्रही आहेत? त्यांच्या दृष्टीने तर कोणता पत्रकार किती चांगले लेखन करतो यापेक्षा कोणता पत्रकार आपल्या वृत्तपत्राला अधिक जाहिराती मिळवून देतो हे महत्त्वाचे! तो आदर्श पत्रकार, त्याला अधिक मानसन्मान दिला जातो. अशा परिस्थितीत या वृत्तपत्राकडून निखळ समाज प्रबोधन, समाज परिवर्तनाची काय अपेक्षा करणार? याबद्दल पत्रकार संघटना काहीही आवाज उठवण्यात तयार नाहीत.

 .....आणि तोतये 
 आजच्या पत्रकारितेचा विचार केला, तर दुचाकी वाहनावर प्रेस’ लिहून अधिका-यांवर इम्प्रेशन मारणारे, सरकारी कार्यालयात नियम न पाळता या गाडया घुसवून अधिकार्‍यांना दमात घेऊन किंवा माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग करणारे तथाकथित पत्रकार दिसतात. त्यांच्या बातम्या कोणत्या वृत्तपत्रात किंवा वृत्तवाहिन्यांवर प्रसारित होतात हा एक संशोधनाचा विषय आहे. या संदर्भात एका उपाहारगृह चालवणा-या एका विधवा महिलेची तक्रार मोठी गंभीर आहे.   महापालिकेच्या पत्रकार कक्षात येणारी व स्वत:ला पत्रकार म्हणवणारी एक व्यक्ती रोज कॅन्टीनमध्ये मी पत्रकार आहे मला नाश्ता, जेवण दे,’ असे सांगून फुकट  खाते, शिवाय तुमचे खाद्यपदार्थ खाण्यायोग्य आहेत का? त्यांची तपासणी केली आहे का? आग प्रतिबंधक यंत्रणा तुम्ही अग्निशामक दलाकडून तपासली आहे का? अशा प्रकारच्या चौकशा करीत असते. खरेच ती व्यक्ती पत्रकार आहे का? अशी चौकशी तिने पत्रकारांकडे, संघटनांकडे केली.तर महाशय तोतया निघाले.एका महिला पत्रकाराला अवैध बांधकाम प्रकरणात प्रत्यक्ष लाच घेतानाच लाचलुचपत विभागाने पकडले.काही दिवसापूर्वी पत्रकारच पत्त्याचा क्लब  चालवताना पकडले गेले. राजकीय नेत्यांच्या मागे शेपटासारखे चिकटणारे,अवैध धंद्यावाल्याकडून हप्ते घेणारे,सरकारी अधिकार्‍यांपासून सर्वसामान्यांपर्यंत जो बकरा रिग्यात येईल त्याला ब्लॅकमेल करणारे,गुंड मवाल्यापासून सानांपर्यंत कोणाकडूनही पाकिटे घेण्यास विधिनिषेध न बाळगणारे,रोज फुकटात दारू पार्ट्या खाऊन सोकावलेले आणि नंतर पार बुंगारी होऊन देशोधडीला लागलेले किती नमुने सांगायचे? अशा  पत्रकारांमुळे समाजमन कलुषित होते. या प्रकारच्या पत्रकारांची शासनाकडून चौकशी होणे गरजेचे आहे.आता निवडणुका आल्याने अनेकजण वृत्तपत्रे डोके वर काढतील. त्यात खरोखर वृत्तपत्रे किती याचाही विचार महत्त्वाचा आहे. पत्रकारितेत चांगले अभ्यासू पत्रकार पाहिजेत यात वाद नाही. वृत्तवाहिन्यांचे प्रमाण पाहता नोकरीसाठी यातायात करावी लागते. नोकरी लागली तरी पगार मिळेलच याची खात्री नसते, यातूनच पत्रकारितेत आज वाईट प्रवृत्ती येत आहेत, या सर्वाचा पत्रकार दिनाच्या निमित्ताने विचार व्हायला हवा. त्यासाठी वृत्तपत्र चालकांनी आणि पत्रकारांनी आत्मपरीक्षण करून पत्रकारिता हा समाजाचा आरसा आहे. त्याबरोबरच आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
---रवींद्र तहकिक 
कार्यकारी संपादक,दैनिक लोकपत्र