...म्हणून पत्रकारांनी हेल्मेट घालून घेतल्या भाजप नेत्यांच्या मुलाखती


रायपूर (छत्तीसगड): येथील पत्रकार हेल्मेट घालून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या भेटीला गेले व त्यांच्या मुलाखती घेतल्या. पत्रकारांनी हेल्मेट घालण्याचे कारण होते निषेधाचे.
2 फेब्रुवारी रोजी सुमन पांडे या पत्रकारावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. सुमन पांडे या पत्रकाराने विचारलेले काही प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना खटकल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर हल्ला करत बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. शिवाय, पांडे यांना त्यांच्या कॅमेरात असलेले फुटेज डिलिट करण्यास सांगितले होते, मात्र, तसे करण्यास नकार दिल्याने मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा निषेध म्हणून इतर पत्रकारांनी पोलिस ठाणे गाठून भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पांडे यांना मारहाण करणाऱया कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी चार भाजप कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
या घटनेचा निषेध म्हणून पत्रकारांनी बुधवारी (ता. 6) हेल्मेट घालून भाजप नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. भाजपचे नेते व कार्यकर्तांवर विश्वास नसल्याने आम्ही सुरक्षेसाठी आम्ही हेल्मेट घातल्याचे पत्रकारांनी सांगितले. दरम्यान, पत्रकारांनी घातलेल्या हेल्मेटचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.