वलसाद (गुजरात) -येथे एका माजी सरपंचाने आपल्या विरुद्ध छापून आलेल्या बातमीवरून एका वृत्तपत्राच्या आवृत्ती प्रमुखासह व त्याच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात आवृत्ती प्रमुखाची पत्नी, दीड वर्षाची मुलगी जखमी झाली.
पोलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, हर्शद अहिर (वय ३४, रा. भगदावडा, ता. वलसाद, रा. गुजरात) हे गुजरात मित्र या दैनिकाचे ब्युरो चिफ प्रमुख म्हणून काम पाहतात. भगदावाडा गावातील एका तलावाच्या सुशोभीकरणाचे काम तत्कालीन उपसरपंच धर्मेश पटेल यांनी केले. नंतर ते सरपंच झाले. मात्र त्यांनी केलेले काम निकृष्ट दर्जाचे होते. यंदाच्या पावसात तलाव परिसरातील सुशोभीकरणाचे काम खराब झाले होते. याबाबतचे वृत्त दैनिक गुजरात मित्रमध्ये प्रसिद्ध करण्यात आले.
तलावाच्या सुशोभीकरणात तत्कालीन उपसरपंच धर्मेश पटेल यांनी गैरव्यवहार केल्याचा या वृत्तात आरोप करण्यात आला होता. याचा राग मनात धरून पटेल यांनी शनिवारी रात्री वलसाद येथे पत्रकार हर्षद अहिर यांच्या घरात घूसून त्यांच्यासह पत्नी केतना (३०) व सहा महिन्याच्या मुलीवर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी वलसाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.