'एमआरयूसी'च्या अध्यक्षपदी प्रतापराव पवार यांची निवड

मुंबई, : माध्यम सर्वेक्षणात अग्रेसर असलेल्या 'मीडिया रिसर्च यूझर्स कौन्सिल' (एमआरयूसी) या संस्थेच्या अध्यक्षपदी 'सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची आज निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी आयपीजी "मीडिया ब्रॅंड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी सिन्हा यांची निवड झाली.

'एमआरयूसी'च्या संचालक मंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत आज हा निर्णय झाला. त्यापूर्वी संस्थेची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभादेखील झाली. पवार यापूर्वी 'एमआरयूसी"चे उपाध्यक्ष होते. मावळते अध्यक्ष आशिष भसिन यांच्याकडून पवार यांनी सूत्रे स्वीकारली. अध्यक्ष पदाचा त्यांचा कार्यकाल दोन वर्षांचा असेल.

उपाध्यक्षपदी निवड झालेले शशी सिन्हा हे माध्यम आणि जाहिरात क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आहे. पार्ल्यातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरवात केली व त्यानंतर लोड स्टार अॅडव्हर्टायझिंग एजन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली. सध्या ते आयपीजी मीडिया ब्रॅंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
उच्चविद्याविभूषित असलेल्या प्रतापराव पवार यांनी अनेक प्रतिष्ठित अशा देशी आणि विदेशी कंपन्यांचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. अनेक औद्योगिक संस्थांशी संबंधित असलेल्या पवार यांनी यापूर्वी इंडियन न्यूज पेपर सोसायटीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. त्यांना 2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'एमआरयूसी'ची स्थापना 1994 मध्ये झाली. त्यांच्यातर्फे गेल्या दोन दशकांपासून माध्यम क्षेत्रातील विविध पैलूंवर शास्त्रशुद्ध सर्वेक्षण केले जाते. इंडियन रीडरशिप सर्व्हे (आयआरएस) हे भारतातल्या वृत्तपत्र वाचकांचे सर्वांत मोठे आणि सर्वांत विश्‍वासार्ह सर्वेक्षण 'एमआरयूसी'च्या वतीने केले जाते. माध्यम क्षेत्रातील बदलांचा वेळीच अंदाज घेऊन भविष्यकालीन धोरणांचा विचार करण्यासाठी "एमआरयूसी'च्या सदस्यांना या सर्वेक्षणांचा; तसेच वेळोवेळी करण्यात येत असलेल्या अभ्यासाचा फायदा होतो.
अध्यक्षपदी निवड झाल्यावर पवार यांनी एमआरयूसीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. कौन्सिलची जबाबदारी आतापर्यंत समर्थपणे सांभाळलेल्या भसीन यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.
या पुढच्या काळात आपण सर्वांनी एकत्र काम करून "आयआरएस'ला विशिष्ट उंची गाठून देऊ. त्याचप्रमाणे माध्यम समूहांना विश्वासार्ह, अचूक आणि अभ्यासपूर्ण सर्वेक्षणाचा तपशील देऊ. माध्यम समूहांपुढील अडचणी सोडण्याबाबत आपण लोकशाही पद्धतीने प्रयत्नशील राहू आणि सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. त्यायोगे माध्यम समूहांना आपल्या कामात अचूकता गाठता येईल.
- प्रतापराव पवार, नवनिर्वाचित अध्यक्ष एमयूआरसी, अध्यक्ष सकाळ 

कौन्सिलचे उद्देश 
1. प्रसारमाध्यमांसाठी आणि जाहिरातदारांसाठी वाचक-प्रेक्षक आदींचे सर्वेक्षण करणे.
2. या सर्वेक्षणांमध्ये सर्वोच्च दर्जाची विश्वासार्हता आणि अचूकता कायम राखणे.
3. सर्वेक्षणाच्या तपशिलाचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेणे.
4. माध्यम सर्वेक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती विकसित करणे.
5. माध्यम सर्वेक्षणाबाबत कौन्सिलच्या सदस्यांना माहिती देणे व मार्गदर्शन करणे.
6. सर्वेक्षणासंदर्भातील माहितीची देवाण-घेवाण व तक्रार निवारण यासाठी सदस्यांना सुयोग्य व्यासपीठ पुरवणे.