खाबुगिरीची ' विल ' पावर !

डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जर्नालिझम डिपार्टमेंट मध्ये प्रोफेसर,गाईड,विभागप्रमुख, मार्गदर्शक वगैरे पदावर असताना खाबुगिरीच्या बाबतीत सर्वात अव्वल आणि 'अग्रेसर' असणाऱ्या वि.लं.नी त्रिपुरा विद्यापीठात कुलगुरू म्हणून गेल्यापासून काय घ्यायला सुरुवात केली माहिती नाही,पण 'देणाऱ्याचे हात घेताना' एरवी अत्यंत काटेकोरपणे सावधगिरी आणि 'दक्ष'ता बाळगणाऱ्या वि.लं.चा साळसूद चेहरा काल उघडा पडला. 
 
तिथल्या एका चॅनलने स्टिंग ऑपरेशन करून त्यांची पोलखोल केली.त्यात ते विद्यापीठाच्या छपाई कामाचे कंत्राट दिलेल्या एका पुरवठादाराकडून लाच स्वीकारताना दिसत आहेत.साठ लाखांच्या बिलावर दहा टक्के कमिशन.हे कमिशन त्यांनी कुलगुरू कार्यातील अँटी चेंबरमध्ये स्वीकारले.त्यासाठी हस्तक म्हणून खास गावाकडून ( धारूर जिल्हा बीड ) खास आयात करून आणलेल्या आणि त्रिपुरा विद्यापीठात स्वतःचा पीआरओ म्हणून नेमलेल्या पंटरचा वापर केला,या घटनेचे स्टिंग ऑपरेशन पश्चिम बंगाल मधील सर्व स्थानिक चॅनल्सवर दाखवण्यात आले.शिवाय द हिंदू या प्रसिद्ध दैनिकातही पत्र महर्षींच्या या कारनाम्याचा इतिवृत्तांत छापून आला आहे.
 
विशेष म्हणजे हे पत्र महर्षी मराठवाड्यात ते 'पीएचडी'वाले सर म्हणून देखील 'शी' प्रसिद्ध आहेत.
( 'कु' आणि 'सु' पेक्षा वेगळा शब्द ) म्हणजे त्यांना गाईड केलं की पीएचडी पक्की.शिष्याने फक्त 'सेवा' करायची,आणि पुरवायची,बस.गुरु प्रसन्न झाले की पुढचं काम सोप्प ! प्रबंधांच्या विषय निवडीपासून त्याला स्वीकृती मिळवणे,प्रबंधाचा ढाचा,मजकूर, त्याचे ड्राफ्टींग,डीटीपी,सबमिशन,मान्यता आणि पिएचडीची डिग्री.सगळं घरपोच.शिष्याचे ओझे असे शिरावर वाहणारा गुरु खरे तर विरळाच.ज्यांना शिष्य म्हणून स्वीकारले ते कौरव असोत की पांडव,त्यांना पाहिजे ते धडे देणार,पण त्यातही अर्जुनासाठी एकलव्याचा अंगठा कापण्याचे,कर्णाला स्पर्धेतून बाद ठरवण्याचे विलंचे कसब आणि कौशल्य द्रोणाचार्यानाही लाजवणारे.पुलं महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असतील हो,पण आमचे विलं मराठवाड्याचे 'लाट'के व्यक्तिमत्व आहेत.जिथे जातील तिथे ते काही ना काही लाटतातच.
त्यांचा संपर्क तसा दांडगा.म्हणजे सर्व पक्ष संघटना गट-तटातल्या लोकांशी ओळख उठबस,ज्याच्याकडून काम साधायचे तिकडे खनपटीला बसून काम साधून घेण्याची चिकाटी.जी कोणत्याही संघवाल्यात असतेच,तशीच ती विलं मध्येही आहेच.पण तरी हातचा कधी सोडणार नाहीत.अगदी विद्यापीठात सार्वजनिक शिक्षणाचे काम करतानाही त्यांनी संघाची शिस्त आणि बाणा सोडला नाही,संघ कार्यात कुचराई नाही,त्याचेच बक्षीस त्यांना त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून मिळाले,फक्त त्यांनाच नाही त्यांचे बंधू दिलीप धारूरकर यांनाही मराठवाडा विभागाचे माहिती आयुक्त म्हणून काम करण्याची मोठी संधी मिळाली आपल्याला मिळालेले पद कोणाच्या डोळ्यावर येऊ नये म्हणून दिलीप धारूरकर बिचारे काही कामच करत नाहीत.कुठल्या कार्यक्रमातही दिसत नाहीत.लोकांना सोडाच माध्यमांनाही काही माहिती देत नाहीत.गुरवाचे पोर महादेवावर वाहिलेली नारळे नंदीच्या मागे लपून गुपचूप खाते तसेच दिलीप धारूरकर माहिती आयुक्त पदाचा उपभोग घेत आहेत.खरे तर विलंनी देखील बंधूंच्या या गुप्तचौर्याचा आदर्श घेऊन त्रिपुरातला काळ अज्ञातवासात घालवला असता तर किती बरे झाले असते.म्हणजे आम्हाला त्यांच्या बद्दल हे असे वेडेवाकडे लिहावे लागले नसते,पण कोंबडीने अंडं दिलं की तिला वाटतं फार कठीण नाही आपण आता चंद्रही जन्माला घालू शकतो.घ्या चंद्र !
------------------------------------------

-रवींद्र तहकिक
7888030472