झी मराठी दिशा दिशाहीन ...

मुंबई- दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आलेलं झी मराठी दिशा अखेर दिशाहीन झालं आहे. हे साप्ताहिक बंद करण्यात आले असून, जवळपास २५ कर्मचाऱ्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

सध्याच्या डिजिटल युगात प्रिंट मध्ये साप्ताहिक सुरु करण्याचा धाडसी निर्णय झी मीडियाने घेतला होता. सकाळ माध्यम समूहात मुख्य संपादक राहिलेल्या विजय कुवळेकर यांची यासाठी निवड करण्यात आली होती. त्यामुळे हे  साप्ताहिक चांगले चालेल अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र एकंदरीत अंकावर नजर टाकली तर हा अंक बेचव वाटत होता. वाचकांचा म्हणावा तसा प्रतिसाद याला लाभला नाही.

झी मीडिया सध्या प्रचंड  कर्जबाजारी आहे, त्यात झी  मराठी दिशा हे साप्ताहिक तोट्यात सुरु असल्याने ते  बंद  करण्याचा निर्णय घेण्यात आला . तशी सूचना देखील चालू अंकात आली आहे.

विजय कुवळेकर यांच्याकडे झी मराठी दिशा बरोबर झी २४ तासची धुरा होती. आता झी २४ तासचे सर्व अधिकार नवे कार्यकारी संपादक आशिष जाधव  यांच्याकडे देण्यात आले असून कुवळेकर फक्त  मार्गदर्शक आहेत. त्यात झी मराठी दिशा बंद पडल्याने कुवळेकर यांना झी मधून लवकरच नारळ दिला जाईल, अशी शक्यता आहे.