मोदींना
नाही,अमित शहांना नाही,उद्धव ठाकरेंना नाही,फडणवीसांना नाही,संजय राऊतांना
नाही,काँग्रेस -राष्ट्रवादीवाल्याना नाही,अगदी राज्यपालांनाही
महाराष्ट्रात नवीन सरकार बनवण्याची घाई पडलेली नाही .सगळे एकमेकांची मजा
घेताहेत.एकमेकांना अजमावताहेत.पुराने हिसाब चुकते करताहेत.खरे सांगू काय ;
एव्हाना उद्धव ठाकरे भाजपशी गुळणा-गुळणी खेळून सत्यनारायण घालायला मोकळेही
झाले असते.पण संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे
काढून त्यांचीही गोची करून ठेवली आहे.त्यांची म्हणजे अख्ख्या
शिवसेनेची.शिवसेनेचे अनेक आमदार आणि मंत्री खाजगीत 'संज्या ने हे काय लचांड
उभं केलं,मध्येच.सालं आतापर्यंत शपथविधी घेऊन मोकळे झालो असतो.सरकार आलं
असतं.आता जर तेलही गेलं आणि तूपही गेलं तर हातात धुपाटणं घेऊन काय करायचं ?
असं म्हणताहेत.मिलिंद नार्वेकरांची तर महाभयंकर फजिती झाली आहे.मोठ्या
मेहनतीने त्यांनी मिळवलेला मातोश्री आणि शिवसेनेवरील रिमोटकंट्रोल राऊतांनी
पळवलाय.राऊतांनी शिवसेनेची केलीय तशीच कोंडी भाजपाचीही केलीय आणि काँग्रेस
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा केली आहे.वाघ म्हटले तरी खातो आणि
वाघोबा म्हटले तरीही खातोच ! बरे घडत काहीच नाही.नुसत्याच पत्रकार परिषदा
होत आहेत.
हे असो.म्हणजे खरे तर आम्ही प्रसरमाध्यमातल्या पत्रकार मंडळींनी
राजकीय पक्षांच्या या झोंबी कडे कसे पाहायला हवे हा खरा प्रश्न आहे.या
लोकांनी जनादेश आणि लोकशाहीची जी थट्टा चालवली आहे त्यावर कोणी पत्रकार चार
ओळी खरडतोय का ? राजकारणाचा खेळखंडोबा करून त्याचा पोरखेळ करणाऱ्या नव्या
जुण्या जाणत्या अशा सगळ्याच राजकारण्यांना त्यांच्या कर्तव्य जबाबदारी आणि
किमान औचित्याची नैतिकतेची जाणीव आठवण करून देत आहोत का आपण ? तर नाही !
त्यांची ती चिखलफेक,आचरट बोलणे याच्या आपण बातम्या करतो.त्यात जनतेच्या
हिताचं काय आहे,लोकशाहीच्या अनहिताचं काय आहे हे पाहत नाही.प्रसारमाध्यमे
लोकशिक्षणाचं काम करतात ना ? लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ ना आपण ? पण झालय
काय की अनेक वर्तमानपत्रांनी आर्थिक बाबतीत हाय खाल्लीय,अनेकांची कंबरडी
मोडलीत.बड्यांचा बडा घर पोकळ वासा झालाय,छोट्यांची तर पार XXX वासलात
लागलीय.त्यामुळे प्रिंट मीडियातल्या मंडळींवर जुन्या खानदानी घराण्यातल्या
बायका प्रमाणे नाकापर्यंत पदर घेऊन रोजगार हमीवर जाण्याची वेळ आली
आहे.त्यामुळे त्यांच्या जखमेवर आणखी मीठ चोळण्यात अर्थ नाही,पण आमची
इलेट्रॉनिक माध्यमे.काय ते स्टुडिओ,चकचकीत फर्निचर,अत्याधुनिक
तंत्रज्ञान,कॅमेरे,लाईट्स,फोकस. मॅन पावर,सिनेमातले हिरो हिरोईन वापरतात तसे कपडे,कोट,जाकिटं,टाय,टॉप,मेकअप, हेअर
स्टाईल,विचारू नका.पायातल्या शूज सॅन्डल पासून डोक्यावरच्या पिनांपर्यंत
सगळं इंपोर्टेड.म्हणजे दिसतंय ते सांगतोय.परफ्युम -बॉडी स्प्रे सुद्धा
इम्पोर्टेडच असणार.( आपण काय अजून कुणाचा वास घेतला नाय बुआ ) थोडक्यात या
लोकांना पगार नेमका किती मिळत असावा,म्हणजे हे सगळं करून ,पुन्हा गाड्या
वापरून,मुंबईत स्वतःचा किंवा भाड्याचा फ्लॅट घेऊन राहायचं म्हणजे जरा
अग्निदिव्यच की.बरं प्रफोशन असं की हे सगळं मेंटेन केल्याशिवाय गत्यंतर
नाही.गबाळं राहता येत नाही.परफेक्शन पेक्षा प्रेझेंटेशनला,म्हणजे कंटेन
पेक्षा दिसण्याला आणि चुरुचुरु बोलण्याला महत्व.
(भाग ३ रा )
अलीकडेतर बहुतेक चॅनलवर
पुरुषसत्ताक पद्धती बाद होऊ लागली आहे.चांगली गोष्ट आहे.माध्यमात महिलांचा
सक्रिय सहभाग वाढला पाहिजे.पण सक्रिय सहभाग आणि लुडबुडीतला,अगोचरपणातला फरक
आमच्या भगिनींनी डोक्यात घेतला पाहिजे.दुसरे असे की जरा जनहिताच्या
मुद्यावरही कधी चर्चा,माहिती मार्गदर्शन केले पाहिजे.राजकीय पक्ष काय
करायचे ते करतील.आपण काय कोणाला सत्तेवर आणण्याची सुपारी घेतलीय ? की अमुकच
पक्ष सत्तेवर यावा.अमुकच माणूस मुख्यमंत्री व्हावा.एकतर आपण भाजपाला खुश
करण्यासाठी खोटा एक्झिट पोल दिला.तो लुक्का हुकला.मग आता सगळेच भाजपाची
सत्ता यावी,फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत या साठी बूम पाण्यात घालून बसलेत.(
चॅनलचे पैसे अडकलेत का ?) काय ती धडपड,काय ती उलघाल,लग्न मंडपात नवरदेव
नवरीपेक्षा कलवऱ्यांचीच जास्ती कलकल असते ना,तसलाच प्रकार सध्या चाललाय.हे
सगळं झीट आणि उबग आणणारं आहे.उमेश कमकुमावत, निर्जीव खांडेकर या महाभागांनी
तर राजकीय वधुवर सूचक मंडळ तर चालवायला घेतले नाही ना असाच सगळा प्रकार
चाललाय.हे सर्व असो,मला सर्वात आश्चर्य वाटतं ते भारतकुमार राऊत
यांचं.किती हव्यास असावा माणसाला.महाराष्ट्र टाइम्स सारख्या वर्तमानपत्राचा
संपादक राहिलेला माणूस,राज्यसभेत खासदार असलेला माणूस.बुभुक्षितसारखा या
चॅनलवर त्या चॅनलवर येतो काय.आज याची तर उद्या त्याची तळी उचलतो काय.हेतू
खरेच जन प्रबोधनाचा आहे की मानधनाचा ? हे असं झालय बघा आपल्या
पत्रकारितेचं.बोलायला-लिहायला जावं तर फार भयानक आहे.आपण सगळ्यांची
ठासतो..पण आपली कोणी ठासायची ? की ब्रम्ह निंदे प्रमाणे पत्रकार निंदाही
घोर महापाप आहे ?
-रवींद्र तहकिक