गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरु आहे. त्याच्या बातम्या देताना मराठी न्यूज चॅनल्सनी 'आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी' म्हणून सर्रास खोट्या बातम्या दिल्या. शिवसेनेचे नेते राज्यपालांना भेटल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठींबा पत्र दिले, मुख्यमंत्री कोण होणार ? शपथविधी कधी होणार ? याची सुद्धा बातमी दिली. ते खोटे निघाले. यामुळे
चॅनल्सची विश्वासर्हता पार धुळीला मिळाली.याबाबत कुणीही माफी मागितली नाही. त्यानंतर आताही तेच सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला 'महाशिवआघाडी' हे नाव देवून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री कुणाचा आणि किती काळ राहणार ? हे पेरत आहेत , चॅनल्स बातम्या देतात की सल्ला ?
यावरच आहे औरंगाबादचे पत्रकार रवींद्र तहकीक यांचा दणदणीत लेख...
................
राष्ट्रसंत गाडगेबाबा कळवळून म्हणायचे 'बाबांनो घाण करायची तुम्ही सोडणार नाहीत,पण निदान घाणीवर माती तरी टाका रे ! ' आज आमच्या महाराष्ट्रातील सर्व वृत्तवाहिन्यांचे वार्तांकन पाहून आम्हाला गाडगेबाबांचे हेच वाक्य म्हणावेसे वाटत आहे.आमच्या मराठवाडी गावठी भाषेत असे म्हणतात की थोडं पाहणाऱ्यानेही लाजावं आणि थोडं हागणाऱ्याने.आता तुम्ही जे दाखवता आहात,विशेषतः गेल्या १५-२० दिवसात राज्यात सुरु असलेल्या राजकीय तमाशा बद्दल.ते पाहणाऱ्यांना लाज वाटू लागली आहे.प्रश्न आपल्या लाज वाटण्याचा आहे.खरंच आपण जे बोलता आहात,दाखवता आहात,सांगता आहात त्या बद्दल आपल्याला थोडीशी सुद्धा लाज वाटत नाही ? मी आज कोणत्याही चॅनलचे किंवा त्यातील पत्रकार-वार्ताहराचे नाव घेणार नाही.कारण कोणाला वेगळे निवडावे असे काही नाही.सगळे घोडे बारा टक्के अशी परिस्थिती आहे.एकतर चॅनलवाल्याना नेमकी कशाची घाई आहे हे कळायला मार्ग नाही.
भाजपची सत्तास्थापनेची संधी हुकली
म्हणून सगळ्या वृत्तवाहिन्या आणि त्यांचे अँकर-वार्ताहर-पत्रकार-संपादक
इतके अस्वस्थ का आहेत ? दुसरे म्हणजे जिथे राज्यपालांना सरकार बनवण्याची
घाई नाही,शिवसेनेला नाही,काँग्रेस-राष्ट्रवादीला नाही तिथे चॅनलवाल्याना
सरकार बनवण्याची एवढी घाई का म्हणून आहे.जवळपास सर्वच वृत्तवाहिन्यांच्या
चर्चा आणि त्यांचे विषय पहा.जणू काही भाजपा आणि फडणवीसांची पाठराखण
करण्याचा आणि शिवसेनेने फार मोठे घोर महापाप केल्याचा कांगावा केला जात
आहे.राष्ट्रवादी आणि काँग्रेसला तर खलनायकाच ठरवायचे बाकी ठेवले आहे.याला
पत्रकारिता म्हणतात का ?
ब्रेकिंग न्यूजला काही महत्व आहे की नाही.सुप्रिया
सुळे आणि शरद पवार एकाच गाडीतून दक्षिण मुंबईच्या दिशेने निघालेत.आमची टीम
त्यांच्या मागोमाग आहे,पण ते कुठे चाललेत माहित नाही.राष्ट्रवादीचा दुसरा
कोणीही नेता त्यांच्या सोबत नाही.काही वेगळे समीकरण पुढे येत आहे काय ?
पवार काही वेगळी बातमी देणार काय ? वगैरे वगैरे.काय आहे हे ? यात कोणती
ब्रेकिंग न्यूज आहे.कोणतीही माहिती नसताना सूत्रांचा हवाला सोडून काहीही
पुड्या सोडण्याचा उदयोग नेमकं करतंय कोण ?
काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच् या
सरकार बनवण्याच्या चर्चेला आता कुठे प्राथमिक सुरुवात झाली आहे.अजून काहीच
ठरलेलं नाही.तरच सगळ्या चॅनलनी या आघाडीचं फक्त नामकरणच नाही तर
मंत्रिमंडळ देखील ठरवून टाकलं.महाशिव आघाडी ही काय भानगड आहे ? कोणी आणली
ही महाशिव आघाडी ? एक्झिट पोलच्या वेळी इतकं थोबाड फुटूनही
चॅनलवाल्याची खोट्यानाट्या बातम्या पेरण्याची आणि चालवण्याची खोड अजून
जिरलेली नाही.शिवसेनेला काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने कोणतेच पत्र दिलेले
नसताना,पत्र निघाले,पत्र पोहचले,पत्र चुकले,आणि नंतर पत्रच नाही आले,अशा
बातम्या आल्या.
परवाची अजित पवार चिडले बारामतीला चालले ही बातमीही
अशीच.एकूणच सगळा प्रकार हास्यास्पद आहे.वृत्त वृत्तवाहिन्यांबद्दल
सर्वसामान्य लोक,काय बोलतात ते एका जरा माणसात मिसळून.शहरातलेच नाही
खेड्यापाड्यातले सुद्धा.जेष्ठ नागरिक-तरुणच नाही शाळकरी मुलं सुद्धा
चॅनलवाल्याना हसताहेत.आपल्या वार्ता आणि वार्तालाप अक्षरशः विनोदी
मनोरंजनाचे साधन वाटू लागलाय लोकांना.जादा ढोसलेल्या एखाद्या दारुड्याची
बेताल असंबद्ध बडबड ऐकतात ना लोक 'जाने दो पीएला है ' म्हणून अगदी त्याच
प्रमाणे न्यूज चॅनल पाहू लागलेत लोक.तुमचा तो उतावीळपणा,ती उबग आणणारी अखंड
आणि कंठाळी बकबक,तो आक्रस्ताळेपणा,उथळपणा.लोचटपणा. झीट आणि वीट येतो
हो हे सगळं गलथान-अजागळ पाहून.पत्रकारितेची थोडीतरी इभ्रत राखा.पाहणारे
लाजताहेत.तुम्हीही जरा मनाची नाही निदान जनाची लाज बाळगा.घाण करायचे तुम्ही
सोडणार नाहीत,निदान घाणीवर माती तरी टाका.
-रवींद्र तहकीक