बादशाहत सलामत रहेगी !

अग्रलेखाचा बादशहा ही लोकांनी दिलेली बिरुदावली अभिमानाने आपल्या नवाकाळ या वर्तमानपत्राच्या पाहिल्यापानावर मानाने मिरवणारे निळूभाऊ उपाख्य नीलकंठ यशवंत खाडिलकर निवर्तले.वय वर्ष ८५.गेली काही वर्षे आजार आणि वृद्धत्वामुळे बादशहाने आपली लेखणी म्यान करून नवाकाळची सूत्रे कन्या जयश्री खाडिलकर यांच्याकडे सुपूर्द केली होती,पण नवाकाळच्या शीर्षभागावर कोरलेले 'अग्रलेखाचा बादशहा'हे बिरुद कायम होते.आजही कायम आहे आणि उद्याही राहील.

बादशहाचे आसन रिकामे राहू नये असा संकेत आहे.पण ज्याला खऱ्या अर्थाने अग्रलेखाचा बादशहा म्हणता येईल असा कोणीही पत्रकार सध्यातरी मराठी वृत्तपत्र सृष्टीत आढळत नाही,त्यामुळेच निळूभाऊंची बादशाहत कायम अढळ आणि सलामत राहील.लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर काहीकाळ केसरीचे संपादक बनलेल्या नाटककार आणि विचारवंत लेखक कृ.पा.खाडिलकरांनी १९२३ साली मुंबईतल्या गिरगावात नवाकाळ सुरु केला,त्याला आता ९६ वर्षे पूर्ण झाली.यातली महाराष्ट्राच्या इतिहासातली अत्यंत धामधुमीची आणि उलथापालथीची २७ वर्षे निळूभाऊ नवाकाळचे संपादक होते.

आजोबा कृ.पा.हिंदुत्वादी विचारांचे.वडील यशवंत काँग्रेसी तर निळूभाऊ चक्क डावे.कम्युनिष्ट.मुंबईतील गिरणी कामगार,गोदी कामगार,आणि लोकलमधून वाहणारा चाकरमानी, लालबाग-परळ-भायखळा-शिवडी-बोरिवली-कांदिवली-चेंबूर-गिरगावात राहणारा आगरी-कोळी समाज.मुंबईतले डबेवाले,वडापाववाले, सर्वसामान्य मुंबईकर हा नवाकाळचा खरा वाचक.नवाकाळ कधीच लब्धप्रतिष्ठितांच्या दिवाणखाण्यांची शोभा बनले नाही.हा बादशहा हस्तिदंती मनोऱ्यातला नव्हता.गिरणी कामगारांचे आंदोलन असो,गोदी कामगारांच्या समस्या असोत,मुंबईत वाढत गेलेले अंडरवर्ल्ड असो,आधी दाक्षिणात्य आणि मग बिहार-उत्तरप्रदेश-बांगलादेश मधून मुंबईत आलेले,लोंढे-तांडे असोत,मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन असो,शिवसेनेचा वाढता प्रभाव आणि सोबतची ठोकशाही असो,कॅन्सरच्या गाठींसारखा मुंबईचा झालेला अनियंत्रित विस्तार आणि बकालपणा असो.फुटपाथवरची बुभुक्षित उत्क्रांती असो,की अजागळ विविक्षित पंचतारांकित संस्कृती असो.मुंबई महानगरपालिकांचा गलथान गैरकारभार,भ्रष्टाचार,सामान्य जनतेची लूट,राजकर्त्यांनी अनास्था,हिंदू-मुस्लिम दंगली,मुंबईचे हरवत गेलेले मराठीपण,वेश्यावस्त्या,झोपडपट्ट्या,सिंधी,गुजराथी आणि जैनांनी देशाच्या आर्थिक राजधानीवर केलेला कब्जा,कोळ्यांची दुर्दशा अशा अनेक विषयावर निळूभाऊंनी आपल्या परखड सडेतोड पण सर्वसामान्यांना समजेल उमजेल कळेल अशा भाषेत प्रहार केले.

एखादा विषय निळूभाऊंनी हातात घेतला की त्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय तें थांबत नसत.जो जनतेला नडला त्याचा पार फ़डशाच.मग तो कोणी का अब्बूराव असेना.निळूभाऊ त्याची भीडभाड मुलाहिजा राखत नसत.त्यांचा अग्रलेख पहिल्या पानावर ठळक टाईपात असे.त्यांच्या काळात नवाकाळ कृष्णधवलच होता.पण खपात मुंबईत नंबर वन ! त्यांनी त्यांचा खास वाचकवर्ग निर्माण केला होता.मुळात लोक नवाकाळ घ्यायचे तें फक्त निळूभाऊंचा अग्रलेख वाचण्यासाठी.बाकी पानांवर काय छापलंय हे नवाकाळचे वाचक बहुदा पाहतही नसावेत.नवाकाळ फक्त लोकलमध्ये आणि लोकल लोकच वाचत असे मात्र नाही,'मटा'बगलेत ठेऊन आपले तथाकथित उचभ्रुत्व कुरवाळणारे देखील माना वाकड्या करून शेजाऱ्याच्या हातातील नवाकाळच्या अग्रलेखाचं हेडिंग आणि इंट्रो डोळ्यांनी ढापत असत.असा हा अग्रलेखाचा बेताज बादशहा आता अनंताच्या प्रवासाला निघाला आहे.त्याच्या निर्वावाद आणि अढळ बादशपदाला त्रिवार कुर्निसात.

 -रवींद्र तहकीक
औरंगाबाद