इंग्रजी वृत्तपत्रात नोकरी देण्याचे आमिष दाखवून रोहन भेंडेने अमरावतीच्या तरुणाला दीड लाखाला गंडवले !


रोहन भेंडे
नागपूर - महाराष्ट्र माझा नावाचं साप्ताहिक सुरु करणार असल्याचे  सांगून ज्येष्ठ पत्रकार  प्रवीण बर्दापूरकर, शैलेंद्र शिर्के यांच्यासह राज्यातील अनेक पत्रकारांची फसवणूक करणारा  विदर्भातील भामटा  रोहन भेंडे  याने अमरावतीच्या
एका तरुणाला इंग्रजी वृत्तपत्रात नोकरी देण्याचे आमिष दाखवून दीड लाखाला गंडा घातला आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले आहे.

संपूर्ण विदर्भात लखोबा लोखंडे म्हणून ओळखला जाणारा भामटा  रोहन भेंडे याने  महाराष्ट्र माझा नावाचं साप्ताहिक सुरु करणार असल्याचे  सांगून अनेकांना फसवले होते. याबाबतचे वृत्त बेरक्याने यापूर्वी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर त्याचा नवीन कारनामा उघडकीस आला आहे.


रोहन भेंडे याने अमरावतीमधील एका तरुणाला एका इंग्रजी वृत्तपत्रात सहाय्यक व्यवस्थापक पदावर नोकरी लावतो म्हणून  १ लाख ५२ हजार रुपये उकळले होते. ही भामटेगिरी करताना एक ज्येष्ठ पत्रकार आपले ओळखीचे असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. पोलिसांनी रोहन भेंडे विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत .

रोहन भेंडे याने नागपुरातील अनेक तरुणांना यापूर्वी फसवले होते. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करून, आजपर्यंत कुणाकुणाला फसवले याचा शोध घ्यावा, अशी मागणी पुढे आली आहे.

दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी रोहन भेंडेशी आपला काही संबंध नाही, तेव्हा तरुणांनी फसू नये, असे आवाहन केले आहे.