पत्रकारांचा ड्राय डे !

आज पत्रकार दिन.पत्रकारांचा ड्राय डे.आज सगळेच पत्रकार स्वतःच्या निस्पृह, निर्भीड, परखड, पारदर्शी आणि तटस्थ पत्रकारितेचे राग आळवतील.दारुड्यांचा जसा ड्राय डे असतो ना,अगदी तशाच प्रकारे पत्रकार मंडळी आज बाळकृष्ण जांभेकरांच्या जयंतीनिमित्त दर्पण दिन साजरा करतील.दर्पण दिन हा आता एक उत्सव झाला आहे.एखादा धार्मिक सण उत्सव किंवा पारंपरिक विधी साजरा करावा तसे सगळे आहे.त्यातही दर्पण दिन बाप दाखव नाही तर श्राध्द कर या पद्धतीने सुतकी चेहर्‍याने आणि स्मशान वैराग्याने पार पडतो.पाप्यांच्या पितरांचे सत्कार होतात.त्रस्त समंधाना पुरस्कार दिले जातात.बारा पिंपळावरचे मुंजे व्याख्याने झोडतात.झाला दर्पण दिन.

या निमित्ताने कोणी आपला चेहरा दर्पणात पाहतो का? माहित नाही.बहुतेक नाहीच.  काही  सन्माननीय अपवाद वगळता (हे वाक्य मी उगीच आपला एक शिष्टाचार म्हणून वापरतोय) काही पट्टीचे तळीराम जसे ड्राय डे ला सुद्धा मिळवतात आणि खाडा पडू देत नाहीत त्याप्रमाणे पत्रकारितेतही काही एकच प्याल्यातले ‘सुधाकरी’ (सुधारकी नव्हे) पत्रकार असतातच. थोडक्यात पूर्वीची ध्येयवादी पत्रकारिता आज राहिलेली नाही, छापील असो की इलेट्रॉनिक.किंवा सोशल मीडिया.चौथ्या स्तंभाची प्रतिष्ठा कोठे जपली जाते हे कोणाही मुमुक्षूनि आम्हाला दाखवून द्यावे.आम्ही त्याच्या टांगाखालून जाऊ. मालकांना नफा पाहिजे म्हणून पत्रकारही धंदेखोर झालेत. मग कशाला जांभेकर, टिळक,आगरकर, महात्मा फुले.   डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, खाडिलकर,आचार्य अत्रे,अनंत भालेराव. यांची नावे घ्यायची? पूर्वी पेपर काय छापतो याला महत्व होते. आता किती छापतो याला महत्व आले आहे. पेपरच्या मजकुरावर नव्हे तर खपावर दर्जा गुणवत्ता आणि श्रेष्ठता ठरू लागली आहे.

जनजागृती हा विषय केव्हाच हद्दपार झाला आहे. कणा  मोडलेला पत्रकार समाजाचा आणि लोकशाहीचा आधारस्तंभ कसा ठरणार? एक काळ असा होता की समाजात राजकारणात पत्रकारांचा दरारा असे.पण गेल्या पंधरा वीस वर्षात या क्षेत्रात आलेल्या लाचार लोचट आणि लंपट माणसांनी चौथ्या स्तंभाचा आब घालवला आहे.  नीतिमत्ता राहिलेली नाही. विश्‍वासार्हता संपुष्टात आली. या सर्वातून ‘पाकीट पत्रकारिता’  निर्माण झाली. जाहिराती मिळवण्यासाठी भल्या-बुर्‍या मार्गाचे लेखन सुरू झाले. निवडणुका किंवा मोठे कार्यक्रम यांच्या बातम्यांना काही प्रमाणात पीतपत्रकारितेचे स्वरूप प्राप्त झाले. निवडणुकीच्या काळात तर माध्यमांनी  काही राजकीय पक्षांशीच बांधून घेऊन त्यांच्या प्रचाराचे काम घेतले. यामुळे राजकीय स्वरूपाचे वास्तव चित्र वाचकाला मिळेनासे झाले. यातून वृत्तपत्रांची म्हणण्यापेक्षा त्यांच्या मालकांची आर्थिक बाजू भक्कम होऊन संपादकांचे लेखन, विचार स्वातंत्र्य संपुष्टात आले. ते सांगकामे बनले. या सर्व परिस्थितीने वृत्तपत्रापासून दर्दी, वाचनाची आवड असणारा जिज्ञासू वाचक दूर झाला. त्यातही मराठी वृत्तपत्रांचे दिवस फारच खराब. संपादकांना पूर्वीसारखे लेखन स्वातंत्र्य नाहीच. मालकांनी दिलेले जाहिरातीचे ‘टार्गेट’ मात्र पूर्ण करावे लागते. तेही मानेवर खडा ठेवून. त्यामुळे त्यांना स्वत:लाही नि:पक्षपातीपणे लेखन करता येत नाही.

संपादकांना आपल्या वार्ताहरांची व्यावसायिक नीतिमत्ता जपणे कठीण जात आहे. जो जास्त जाहिराती आणतो, त्याला वृत्तपत्रात  मानाचे स्थान मिळते. अनेक पुरस्कारांनी गौरवले जाते. पत्रकार म्हटला, तर किमान बातमी तरी समजली पाहिजे? लिहिण्याचे कसब सर्वानाच असते असे नाही, पण त्याने दिलेला मजकूर वाचकाला किमान समजायला तर हवा.पण या बाबतही आनंदी आनंदच आहे. आजकाल पत्रकारिता महाविद्यालयातून पत्रकारितेचे धडे मिळण्याची सोय झाल्याने मोठ्या प्रमाणावर पत्रकार तयार होत असतात, पण मुळात आडात नाही तर पोहर्‍यात कोठून येणार अशी बहुतेक ठिकाणी स्थिती आहे. वाचन, अनुभव आणि जनसंपर्क नसेल, तर कोणीही  वृत्तपत्रात दर्जेदार लेखन करू शकत नाही. स्वत: जबाबदारीने लेखन करायचे, तर रोज किमान पाच दहा वर्तमानपत्रे आणि 10-20 वेबसाईट पाहायला हव्यात. आठवडयातून किमान एकतरी पुस्तक वाचायला हवे. त्यामुळे शब्दसंग्रह वाढतो. पूर्वी संपादक व्यक्तीच्या नावाने वृत्तपत्र ओळखले जायचे. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. दरवर्षी नवा गणपती बसावा त्याप्रमाणे एक वर्षातच वृत्तपत्रात नवीन संपादक दिसतो.खासगी वृत्तवाहिन्यांचा सध्या खूप बोलबाला आहे.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे वर्तमानपत्रात, वृत्तवाहिन्यांत सर्वभाषिक तरुण पत्रकारांची संख्या मोठी असली तरी नेमक्या कोणत्या बातम्या द्यायच्या. लाइव्ह बातम्या देताना बोलताना, प्रश्‍न विचारताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे, याचा अनेक पत्रकारांत अभाव दिसतो.  ‘लाईव्ह’ कार्यक्रमात लेखन नसले तरी भाषेच्या शुद्ध-अशुद्धतेवर लक्ष देणे फार जरुरीचे आहे. त्याचप्रमाणे कोणत्या विषयाला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचे, हे वाहिनीच्या संपादकाला समजणे गरजेचे आहे. ते समजले नाही, तर तो चेष्टेचा विषय ठरतो. वृत्तपत्र व्यवसायात मग तो कोणत्याही स्वरूपाचा असो. कायमस्वरूपी नोकरीपेक्षा कंत्राटी पद्धतीने काम करण्याची पद्धत सध्या सुरू आहे. त्यामुळे या व्यवसायात आता कायमस्वरूपी नोकरीची हमी राहिलेली नाही. त्यामुळे तरुण पत्रकारांचाही पत्रकारितेकडे पाहण्याचा दृष्टीकोन विधायक न राहता, बाजारू झाला आहे. पत्रकार म्हणून मिळणार्‍या विशेष अधिकारांचा वापर करून स्वत:चे स्थान निर्माण करण्याची त्यांची धडपड सुरू असते.

आपल्या कंत्राटाचे पुन्हा नूतनीकरण होईल किंवा नाही, या तणावाखाली तो सतत वावरत असतो. मराठी पत्रकारितेत आजही अभ्यासू लोक आहेत, पण ते फक्त आपल्यापुरताच विचार करताना दिसतात. नव्या पिढीशी जवळीक साधण्याचा, त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करताना ते दिसत नाहीत. त्याचप्रमाणे नव्या पिढीलाही त्यांचे मार्गदर्शन घ्यावेसे वाटत नसल्याने, मीच श्रेष्ठ पत्रकार ही वृत्ती या क्षेत्रात वाढत आहे. यामुळे आज पत्रकारितेचे खच्चीकरण होत असून, वृत्तपत्रात किंवा वाहिन्यांत ‘टोपल्या टाकू’ पत्रकारांची संख्या वाढत आहे. पत्रकार संघटनातही राजकारण शिरलेले दिसते. उच्चपदे किती वर्षे आपल्याकडे ठेवता येतील, त्यातून व्यक्तिगत लाभ घेता येतील, यासाठी काही पत्रकारांची धडपड सुरू असलेली दिसते. त्यातून राजकीय नेते जरी केवळ एक गरज म्हणून पत्रकारांना जवळ करीत असले तरी, सामान्य वाचक मात्र पत्रकारापासून दूर होत असल्याचे चित्र सध्या पत्रकारितेत दिसत आहे. असो आजच्या दर्पण दिनी खरा चेहरा दाखवणारा दर्पण दाखवला हा रसभंग ठरेलही कदाचित पण रोज धंदेवाईकपणाची गटारी साजरी करणार्‍यांनी किमान आज तरी ड्राय डे पाळून आपला चेहरा दर्पणात पाहण्याजोगा ठेवावा या अपेक्षेने (कदाचित व्यर्थ) खटाटोप केला आहे.

-रवींद्र तहकिक
औरंगाबाद