महाराष्ट्राचा मोतीबिंदू !

महाराष्ट्राच्या मोतीबिंदूने परवा जाहीरपणे शाईची शपथ घेत पुन्हा एकदा नंबर वन चे वाकडे शेपूट वर काढले.त्याला फुंकणीत घालून काही होणार नाही.उपाय एकच,पण त्यासाठी वस्ताद आणि वस्तरा दोन्ही खमके हवेत.ते कुठे शोधायचे ? कारण आज शाईची शपथ घेतली,उद्या याने शाईच्या नावाने आंघोळ करून मोकळे होऊ नये म्हणजे मिळवली.

       जगाच्या आणि देशाच्या पातळीवरील पत्रकारितेला काय परंपरा आहेत-नाहीत,माहित नाही.निदान माझा तरी तितका अभ्यास मगदूर नाही.आपला पल्लाच कमी.म्हणजे महाराष्ट्रापुरता.महाराष्ट्राला दर्पणकार बाळकृष्ण जांभेकरांची वगैरे आद्य परंपरा सांगितली जाते.पण हे काही खरे नाही.त्यांच्या दर्पण पत्रिकेचा खप असून असून काय असणार ? मापटं भर कागद आणि चिपटं भर शाई.तेवढ्याने कुठला कात जळतोय ? शाईची शप्पथ खायला रोज टँकरने शाई वहायला लागते मिष्टर.तेव्हा कुठे पेपर मानबिंदू ठरतो.खपाचे..वाचक संख्येचे आकडे 'दरडा'वून सांगावे लागतात.तेव्हा कुठे पेपर व्हाईस ऑफ महाराष्ट्र ठरतो.

पत्रकारितेतले काही अनुभवी शहाणे ( म्हणजे अनुभवाने 'पोळून' शहाणे झालेले) इथे कदाचित आम्हाला सबुरीचा सल्ला देतील.व्यवसायातील इथिक्स समजावून सांगतील.कशाला उंटांचा मुका घेताय असेही म्हणतील.पण मग उंटांचा मुका घ्यायचा तरी कोणी ? तुम्हीही घेणार नाही.आम्हाला ही श्रद्धा आणि सबुरी सांगायची हे काही बरे नाही.म्हणजे या मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचा की नाही.पत्रकारिता म्हणजे काय एखादं अंडरवर्ल्ड आहे ? आणि हा त्यातल्या 'डी' गॅंगचा डॉन ! असेल तर असो,आम्ही पंगा घेणार.घेणार म्हणजे घेतलाच आहे की आता.असो,तर सांगायचं काय की एखाद्या वर्तमानपत्राचे मोठेपण कशावरून ठरवायचे ? त्याचे निकष काय ? खप,पानांची संख्या,वाचक संख्या,जाहिरातींची संख्या,वार्षिक कमाईचा टर्नओव्हर,की मग वरकमाई ? आता या बाबतीत कुणी आम्हीच नंबर वन म्हणून शाईची शपथ खात असेल तर मग जांभेकर,टिळक,आगरकर ,डॉ.आंबेडकर,आचार्य अत्रे,खाडिलकर,अनंत भालेराव,परुळेकर वगैरे मंडळींनी ज्या काही खस्ता खाल्ल्या त्या फालतूच म्हणायच्या.कारण या सगळ्यांची वृत्तपत्रे म्हणजे मानबिंदू पुढे लंगोटीपत्रेच की.सगळ्यांचा खप तीनशे ते हजारांच्या आत असणार.त्या साठी लागून लागून किती शाई लागत असणार.पुन्हा त्यासाठी पैशाची मारामार.कागद आहे तर शाई नाही आणि शाई आहे तर कागद नाही.कशाची शपथ घेणार.बरे त्या काळी जाहिरातींची कमाई नव्हती.निवडणुकाही भिक्कार.म्हणजे उमेदवारच पेपरच्या संपादकांकडून चहा-पाण्याला पैसे न्यायचे.सोबत प्रचारासाठी संपादकांच्याच सायकलला टांग मारायचे.वरतून त्यांच्या बातम्या छापा.फुक्कट ! कसलं डोंबल्याच्या जाहिराती आणि  बोडख्याचं पॅकेज.पुन्हा संपादकांना खासदार मंत्री होण्याचीही सोय नव्हती.म्हणजे सगळंच मुसळ केरात.

एकूणच शाईची शपथ म्हणजे अगदीच काही 'पोर खेळ' नव्हे.आता हेच पहा ना,म्हणजे समाजाशी नाळ,जनहिताचा ध्यास,समाजाचा अभ्यास वगैरे फक्त म्हणायचं.प्रत्यक्षात धंदा मंगता.उगाच नाही टँकरने शाई संपत.खप वाढला की माप वाढतं.मग त्यासाठी वाचकांना बातम्या,माहितीच दिली पाहिजे असे काही नाही.वाचकांनीही पेपर वाचलाच पाहिजे असेही काही नाही.उलट न वाचलेलाच बरा.नाहीतरी वाचून काय फरक पडणार ,नाही का ? त्यापेक्षा लोकांनी स्कीम पाहावी,कुपने गोळा करून डकवावीत,डबे-बाटल्या-बॅगा-रगी-छत्र्या-भांडीकुंडी मिळवावीत.हे खरे जन प्रबोधन आहे.ही खरी पत्रकारिता.हा खरा जनसंवाद.चौथा स्तंभ म्हणजे काय ? तर बिजनेस मॉल..जिथे पाहिजे तो माल मिळतो.माल है तो ताल है,वर्ना तू कंगाल है ! या मोतीबिंदूचे काय करायचे ते पहा बुआ.नाहीतर शाईची शपथ खाता खाता एक दिवस हा शाईच्या नावाने आंघोळ करायचा.

-रवींद्र तहकिक
औरंगाबाद