पत्रकाराची बातमी...बातमीतली पत्रकार !

पत्रकारांना सोशल मीडियात ट्रोल करणे सोपे आहे. विशेष करून वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार हे ट्रोलर्सचे 'सॉफ्ट टार्गेट' असल्याचे दिसून येते. तथापि, ही मंडळी इतक्या प्रचंड तणावात काम करतात की, ज्याने कुणी वृत्तवाहिन्यांची कार्यसंस्कृती पाहिली अथवा याची प्राथमिक माहिती जरी मिळवली तरी ते या लोकांना कधीही हिणवण्याआधी नक्की विचार करतील.

विधानसभा निवडणुकीनंतर हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा सुरू असतांना विविध चॅनल्सच्या वृत्तांकनावर टीका करण्यात आली. अर्थात, टिका करणारेच टिव्हीला चिपकून होते हे विसरता येणार नाही. याच कालखंडात एका वृत्तवाहिनीवर रात्री उशीरा राजकीय घटनाक्रम सांगण्यासाठी अँकर फिल्डवर असणार्‍या महिला रिपोर्टरला प्रश्‍न विचारत असतांना आम्ही घरात बघत होतो. ती तरूणी प्रचंड शिणलेली वाटत होती. तर अँकरदेखील खूप  दमलेला होता. माझ्या पत्नीने लागलीच ''अरे बाबांनो बातम्या सोडा...पहिल्यांना आराम करा !'' अशी प्रतिक्रिया दिली होती. कमी-अधीक प्रमाणात मुद्रीत आणि डिजीटल माध्यमातही असलाच तणाव असतो. माध्यमांमध्ये काम करणारे हेदेखील माणसेच आहेच. त्यांनाही भावना आणि अर्थातच मर्यादा असल्याचे लक्षात घेतल्यास त्यांच्याकडून कुणी 'सुपर ह्युमन'सारखी अपेक्षा करणार नाही. अर्थात, कामाच्या प्रचंड तणावात पत्रकारांची सत्वपरीक्षा घेणारे अनेक क्षण येतात. कधी कुणा अँकरचे आप्तजन अपघातात वारल्याची बातमी त्यांना द्यावी लागते. तर कधी एखाद्या विचीत्र वा भयंकर घटनेमुळे त्यांना भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. असाच एक किस्सा केरळमध्ये घडला आहे. अर्थात, ही थोडी नर्मविनोदी घटना असल्याने आज याबाबत सांगावेसे वाटले.  http://bit.ly/2UNePtZ

मातृभूमि या मल्याळी वृत्तवाहिनीत श्रीजा शाम ही तरूणी अँकर म्हणून काम करते. बुधवारी सकाळी ती बातम्यांचे सादरीकरण करत असतांना अचानक एक ब्रेकींग न्यूज समोर आली. खरं तर ब्रेकींग न्यूज ही थोड्या उत्साहात आणि साहजीकच मोठ्या आवाजात वाचली जाते. मात्र ही बातमी बघताच श्रीजाला थोडा धक्का बसला. कारण केरळ राज्य सरकारच्या पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा झालेली असून यात श्रीजा हिला सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार मिळाल्याची ती बातमी असते. हे वृत्त समोर येताच ती काही सेकंद अक्षरश: थबकते. यानंतर ती आवाजावर नियंत्रण ठेवून बातमी देते. अर्थात, तिला झालेला आनंद लपवत चेहर्‍यावर हसू आणत ती पुढच्या बातमी कडे वळते. श्रीजा शाम हिचा हा 'प्राऊड मोमेंट' आता सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे. आपण याला सोबतच्या ( http://bit.ly/2UNePtZ ) लिंकवर क्लिक करून बघू शकतात. यातील भाषा मल्याळम असली तरी काही अडत नाही. कारण भाव हा भाषेपेक्षा अधिक लवकर लक्षात येतो.


फेसबुकच्या एका कंटेंट मॉडरेटरने अलीकडेच या कंपनीवर दावा दाखल केला आहे. फेसबुकवरील हिंसक, लैंगीक आणि अमानवी कृत्यांच्या कंटेंटवर नजर ठेवतांना आपल्याला मानसिक विकार जडल्याची तक्रार करत त्याने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या दाव्यातील अतिरंजीतपणा सोडून दिला तरी तो विचारणीय नक्कीच आहे. अगदी याच प्रकारे कंटेंट क्रियेशन करतांना अनेकदा पत्रकार हा त्या बातमीची हिस्सा बनतो. बहुतांश वेळेत भयंकर घटनांनी तो विचलीत होतो. त्याला शब्द सुचत नाही. भावना अनावर होतात. पत्रकार हा समाजात घडणार्‍या बर्‍या-वाईट घटनांचा साक्षीदार असतो. यामुळे त्याला स्वत:ची मनोदशा सांभाळत वृत्तांकन करावे लागते ही बाब मीडियाला उठसुठ नावे ठेवणारे लक्षात घेतच नाहीत. असो. श्रीजा शामच्या निमित्ताने पत्रकार आणि पत्रकाराशी संबंधीत बातमी हा मुद्दा चर्चेत आला हे ही नसे थोडके !

जाता-जाता:

गत वर्षाच्या उत्तरार्धात सांगलीत झालेल्या अतिवृष्टीचे वृत्तांकन करतांना एबीपी माझा वाहिनीच्या कुलदीप माने या प्रतिनिधीला (http://bit.ly/2OSvzw6) शब्दच सुचेनासे झाले तेव्हा त्याने सरळ अश्रूंना मोकळी वाट करून दिली होती. तर याच काळात कोल्हापुरात झी२४ च्या कॅमेरामनने (http://bit.ly/2vrwY5N) चार दिवस महापूरामुळे अडकून पडल्यानंतर सुटका करणार्‍या चमूतील जवानांचे अगदी हृदयपूर्वक चरणस्पर्श करणार्‍या महिलेची कृतज्ञता फुटेजच्या माध्यमातून जगासमोर आणली होती. माझ्या मते या दोन्ही घटना मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात आयकॉनीक म्हणून गणल्या जाणार्‍या आहेत. मीडियाचा हा ह्युमन फेस आपण लक्षात घ्यावा. अन्यथा, एखाद्याने खूप अध्ययन आणि चिंतन करून लिहलेला लेख वा अग्रलेख हा फालतू असल्याची एका ओळीची कॉमेंट करणे खूप सोपे आहे. आणि बातमीसाठी जिवाचे रान करणार्‍या, काही वेळेस जीव मुठीत घेणार्‍या पत्रकारांच्या बातमीतील व्याकरण वा तत्सम चुका शोधून खिल्ली उडवणे वा कुचाळक्या करणे हे देखील खूप सुलभ आहे. तथापि, वर्तमानाचा इतिहास निर्माण करणार्‍यांच्या व यासाठी अहोरात्र झटणार्‍यांच्या समस्या कुणी लक्षात घेऊ शकत नाही. सर्वात मोठी शोकांतिका अशी की, सगळ्या जगाच्या समस्या मांडून त्यांना न्याय मिळवून देणारे मीडियाकर्मी हे आपल्या अडचणी कधी मनमोकळेपणाने मांडूच शकत नाही.

शेखर पाटील
जळगाव