साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रात ‘नंबर १’

मुंबई - सर्वोत्तम न्यूज चॅनेल्सच्या स्पर्धेत ‘सकाळ माध्यम समूहा’चे साम टीव्ही न्यूज चॅनेल अव्वल ठरले आहे. ‘बार्क’ (BARC) या संस्थेच्या सातव्या आठवड्याच्या रेटिंगनुसार ‘साम टीव्ही’ने मराठीतील सगळ्या प्रस्थापित न्यूज चॅनेल्सना मागे टाकले आहे. या आठवड्यात २५ टक्के प्रेक्षकांनी ‘साम टीव्ही’ला पसंती दिली आहे. तर सर्व मराठी न्यूज चॅनेल्सच्या ‘टॉप १००’ कार्यक्रमांत साम टीव्हीच्या सर्वाधिक ४८ कार्यक्रमांचा समावेश आहे. निष्पक्ष आणि प्रभावी पत्रकारितेचा ठसा ‘साम टीव्ही’ने कायम ठेवल्याचे ‘बार्क’च्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.


टॉप १०० कार्यक्रमांत साम टीव्हीचे ४७, ‘एबीपी माझा’चे २९, ‘टीव्ही ९’ चे २० आणि ‘झी २४ तास’चे ४ कार्यक्रम आहेत, तर ‘न्यूज १८ लोकमत’च्या एकाही कार्यक्रमाचा टॉप १०० कार्यक्रमांत समावेश नाही. उत्तम कार्यक्रमांसह साम टीव्हीला महाराष्ट्रातील २५ टक्के प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. एबीपी माझा आणि ‘टीव्ही ९’ला प्रत्येकी २३ टक्के तर ‘झी २४ तास’ला १७ टक्के इतका मार्केट शेअर मिळवता आला आहे. ‘साम टीव्ही’च्या टॉप ५०, वर्ल्ड न्यूज धिस विक, साम अपडेट, व्हायरल सत्य, मेगा प्राईम टाइम, ३६ जिल्हे ३६ रिपोर्टर, महाराष्ट्र एक्स्प्रेस, स्पॉटलाइट या बातमीपत्रांना सर्वात जास्त प्रेक्षक संख्या मिळाली आहे.


महाराष्ट्राबरोबरच मुंबईतही साम टीव्ही नंबर १ वर आहे. या मार्केटमध्ये साम टीव्हीला २३ टक्के, ‘एबीपी माझा’ला २२ टक्के, ‘टीव्ही ९’ ला २१ टक्के, ‘झी २४ तास’ला १७ टक्के तर न्यूज १८ लोकमतला १३ टक्के मार्केट शेअर मिळाला आहे.


लोकोपयोगी, शेतकरी, ग्रामीण विकास आणि रोजगार या प्रमुख मुद्द्यांवर साम टीव्हीने सातत्याने प्रकाश टाकला आहे. बातमीमागची बातमी आणि त्या मागील सत्य उलगडणं यामुळे साम टीव्हीने इतर न्यूज चॅनेल्सच्या तुलनेत स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. त्यामुळेच सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना साम टीव्हीची सर्वच बातमीपत्रं आपली वाटत आली आहेत. सत्य, सकारात्मकता, लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळे शहरांपासून खेड्यापाड्यांपर्यंत संपूर्ण राज्यभरात साम टीव्हीच्या निष्पक्ष बातमीपत्रांना लोकप्रियता मिळाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या