‘नेट’सत्ताक पद्धतीकडे !

इंटरनेट आजच विजेइतकीच मूलभूत गरज बनलं आहे. येत्या दशकात इंटरनेट आणि इंटरनेटला जोडलेली उपकरणं मानवी आयुष्य आणखी व्यापतील. भारतात तीन वर्षांत इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या नव्वद कोटींपर्यंत पोचेल आणि ही संख्या तेव्हाच्या लोकसंख्येच्या ६५ टक्के असेल, असा सिस्कोचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. परिणामी, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, वैज्ञानिक अशा सर्व क्षेत्रांचा कायापालट दृष्टिपथात आहे. या साऱ्या भौतिक बदलांतून नव्या व्यवस्थेकडे आपण वाटचाल करीत आहोत.


काल्पनिक किंवा ‘फिक्‍शन’ जॉनरमध्ये मोडणाऱ्या अशा सर्व कथांमध्ये एक समान सूत्र आहे. ते आहे जोडलेल्या जगाचं. अनाकलनीय व्यवस्थेनं जोडलेल्या जगाचं. ही अनाकलनीय व्यवस्था गेल्या तीन दशकांत उलगडत गेली आणि प्रत्यक्षात आली. त्या व्यवस्थेचं नाव आहे इंटरनेट. जगाला आणि जगातल्या प्रत्येकाला जोडणारी नवी व्यवस्था जग बदलून टाकेल आणि नवं-सर्वसमावेशक, अधिक प्रगल्भ, शांतीचा-प्रेमाचा संदेश देणारं जग अवतीर्ण होईल, असा आशावाद गेले कित्येक दशकं त्या त्या काळातल्या लेखकांना, वैज्ञानिकांना आहे. कल्पनेतलं इंटरनेट आलंही आणि पाहता पाहता या व्यवस्थेनं जगाला व्यापायला सुरुवातही केली. आज, २०२० मध्ये एकविसाव्या शतकातलं तिसरं दशक उलगडलं जात असताना इंटरनेटची काल्पनिक व्यवस्था नव्या अफाट विस्तारलेल्या क्षितिजाकडं वाटचाल करीत आहे. आजच्या काळातली कल्पनाशक्तीही भविष्याकडं डोळे विस्फारून पाहते आहे.

काल्पनिकता थोडी बाजूला ठेवून इंटरनेटच्या इतिहासात डोकावलं, तर गोपनीय माहितीची देवाणघेवाण करण्याच्या शुद्ध लष्करी हेतूनं आजच्या इंटरनेट व्यवस्थेचा जन्म झाला आणि आताच्या कॉम्प्युटरशी पाच दशकांपूर्वीच्या महाकाय यंत्रांचं काहीही साम्य नव्हतं, हे स्पष्ट दिसेल. ही महाकाय यंत्रं परस्परांना जोडलेली होती. एका यंत्रातून माहिती दुसऱ्या यंत्रात पाठवणं शक्‍य झालं होतं. माहितीवर प्रक्रिया करून निष्कर्ष काढणं जमलं होतं. एखाद्या उपकरणाची लष्करी गरज संपत चालली किंवा संशोधनाला मर्यादा आल्या, की त्याचं खासगीकरण होतं, हा पाश्‍चिमात्य देशांचा इतिहास आहे. इंटरनेटचंही तसंच झालं. लष्करी इमारतींमधून बाहेर पडून इंटरनेट शिक्षण संस्थांमध्ये आलं आणि यंत्रांचे आकार लहान झाले. या यंत्रांना जोडणारी व्यवस्था बळकट होऊ लागली. वेगवेगळ्या यंत्रांवरची, वेगवेगळ्या पद्धतीनं साठवलेली माहिती वर्ल्ड वाईड वेब व्यवस्थेनं जोडली ती टीम बर्नर्स ली यांनी. त्यानंतरचा, म्हणजे १९९० नंतरचा इतिहास हा वर्तमानाइतकाच ताजा आहे.

माहितीची देवाणघेवाण एकाच पद्धतीनं जगभरात कुठंही व्हायला सुरुवात झाली, तसे त्याचे परिणामही दिसायला लागले. विसाव्या शतकाचं शेवटचं दशक जगाला पहिल्यांदा आपण जोडले जात आहोत, याची जाणीव करून देणारं ठरलं. मार्शल मॅक्‍ल्युहान यांनी ‘ग्लोबल व्हिलेज’ची कल्पना त्या आधी चाळीस वर्षं मांडली होती. गावखेड्यात जशी माणसं एकमेकांच्या जवळ राहतात, एकमेकांना ओळखतात, मदतीला धावून येतात, माहितीची देवाणघेवाण सहज करतात तसं जगाचं होईल, अशी त्यांची कल्पना. वर्ल्ड वाईड वेबनं ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली आणि अमेरिकेत एखादी व्यक्ती जी माहिती मिळवतेय, तीच माहिती त्याच क्षणी भारतीय माणसालाही मिळायला लागली. १९९५ ते २००५ हा दहा वर्षांचा टप्पा माहिती साठवणं आणि मिळवणं या अंगानं भारावलेला होता. जी माहिती आपल्यापर्यंत पोचण्यास काही दिवस, महिने अथवा वर्षही लागू शकलं असतं, ती माहिती काही मिनिटांत समोर यायला सुरुवात झाली. माहिती वाहून नेण्याचा वेग हा फक्त पंधरा वर्षांपूर्वी मिनिटांमध्ये होता आणि तो आज अल्ट्रा संथ वाटू शकतो, इतकी आजची गती अफाट आणि अचाट आहे. जोडल्या गेलेल्या जगात संवाद, मनोरंजन आणि उत्पादनांची निर्मिती-मागणी या तीन क्षेत्रांवर सर्वाधिक प्रभाव झाल्याचं आता दिसतं. हातानं लिहिण्याची जागी आलेले की-बोर्ड, त्यातून वेगानं होणारा शाब्दिक संवाद एकूण संवाद प्रक्रियेचा वेग बदलवून गेला. संगीत, चित्रपट, कला यांचा एका भूप्रदेशातून दुसऱ्या संपूर्ण वेगळ्या भूप्रदेशात जाण्याचा वेग झपाट्यानं वाढला. अगदी स्वयंपाकाच्या उपकरणांपासून ते वेशभूषेपर्यंतच्या वस्तू-उत्पादनांची बाजारपेठ विस्तारली. मागणी जलद पूर्ण करण्यासाठी उत्पादक कंपन्यांच्या कारखान्यांनी देशाच्या सीमा ओलांडल्या. जोडलेल्या जगात माहितीची देवाणघेवाण वेगानं होऊ लागल्यानं आतापर्यंत अर्थतज्ज्ञांच्या पुस्तकात राहिलेली जागतिक बाजारपेठ वास्तवात उतरली.

ज्ञानाधारित व्यवस्थेकडे वाटचाल

गेल्या पंधरा वर्षांत इंटरनेटमुळं जग अधिक घट्ट जोडले गेलं. आधुनिक समाजाच्या अधिकाधिक व्यवहारांमध्ये इंटरनेट विजेइतकं आवश्‍यक बनलं. इंटरनेट केवळ तांत्रिक व्यवस्था राहिली नाही. सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, वैज्ञानिक अशा सर्व क्षेत्रांचा इंटरनेट अत्यावश्‍यक भाग बनून गेला. माहितीतून ज्ञानाधारित व्यवस्थेकडं इंटरनेटनं वाटचाल केली. या प्रक्रियेत माहितीच्या आदानप्रदानाचा वेग विलक्षण वाढलाच; शिवाय माहितीवर प्रक्रिया करून त्याचं ज्ञानात रूपांतर करण्याचाही वेग वाढला आहे. झाडावरून उतरून दोन पायांवर चालण्यासाठी मानवाला हजारो वर्षं लागली. एका भूप्रदेशातून दुसऱ्या भूप्रदेशात चालत जाऊन माहिती मिळवून त्याचं ज्ञान पुढच्या पिढीसाठी नोंदवून ठेवण्याच्या प्रक्रियेला शेकडो वर्षं लागली. प्रत्येक गोष्ट मानवाला स्वानुभवातून शिकावी लागली. स्वानुभव आणि त्याची समाजाच्या आधीच्या अनुभवाशी पडताळणी अशी ज्ञान संपादनाची कित्येक दशकांची प्रक्रिया होती. या साऱ्या प्रक्रियांचा वेग विलक्षण वाढला आणि येत्या काळात आणखी वाढत राहणार आहे.

कुणाच्या तरी कल्पनाशक्तीतून वैज्ञानिक कथेत उतरलेला मोबाईल फोन प्रत्येक भारतीयाच्या रोजच्या जगण्याचा भाग अवघ्या अडीच दशकांत बनला. ३१ जुलै १९९५ ला पश्‍चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री जोती बसूंनी तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना पहिला कॉल लावला. तेव्हापासून खणाणत राहिलेला मोबाईल फोन आज ७६ कोटी भारतीयांच्या हातात आहे. ही संख्या येत्या तीन वर्षांत आणखी वीस कोटींनी वाढेल, असं ‘सिस्को’ या जागतिक कंपनीचा अहवाल सांगतो आहे. जवळपास सत्तर टक्के भारतीयांच्या मोबाईलवर इंटरनेट असणार आहे. ज्या जगात आपण आज आहोत, ते आणखी झपाट्यानं बदलणार आहे आणि नव्या दशकात नव्या जगाला आपण स्पर्श करणार आहोत. गेल्या तीन दशकांत झालेल्या बदलांची गती येत्या दशकात आणखी वाढत जाईल, असं आजचं संशोधन सांगतं आहे. या बदलाचे स्वाभाविक परिणाम मानवी व्यवहारांवर होणार आहेत. त्यासाठी आपण तयार आहोत का, तयार कसं व्हावं लागेल आणि तयार नसलो, तर काय घडू शकतं याचा अंदाज घ्यायला आता फारसा वेळ उरलेला नाही.

‘मॅन्युफॅक्‍चरिंग ऑन डिमांड’

अधिकाधिक जोडलेल्या येत्या जगातल्या परिणामांची चर्चा व्यापक पातळीवर होते आहे. काही क्षेत्रांतल्या बदलांचा अंदाज घेतला, तर येऊ घातलेल्या बदलांची व्याप्ती समजून येईल. अर्थव्यवस्था आणि ती चालवणारी उत्पादनं मागणी तसा पुरवठा या तत्त्वाच्या अधिक जवळ जातील, असा अंदाज आहे. उत्पादनं तयार करून ठेवायची आणि मागणी येईल तशी द्यायची, अशी आजची व्यवस्था आहे. गोडाऊन्सची ही व्यवस्था कमी होत जाईल. मागणी येईल तसं अत्यंत वेगानं उत्पादन करायचं आणि तत्काळ पुरवठा करायचा, अशा नव्या व्यवस्थेकडं वाटचाल सुरू होईल. ‘मॅन्युफॅक्‍चरिंग ऑन डिमांड’ (एमओडी) या नव्या पद्धतीत इंटरनेट मध्यवर्ती असेल. थ्री-डी प्रिंटिंग मावळत्या दशकात उदयाला आलं. या तंत्रज्ञानात आणखी प्रगती होईल. परिणामी, उत्पादक कंपन्यांनी निर्मिती करून वस्तू साठवून ठेवून विकण्याची व्यवस्था टप्प्याटप्प्यानं निकालात निघेल. मागणी कुठून येऊ शकते, यासाठी बिग डेटा ॲनॅलिसिस आणि आर्टिफिशयल इंटेलिजन्स (एआय) वापरलं जाईल. विकेंद्रित पद्धतीची ही व्यवस्था अस्तित्वात यायला या दशकातच सुरुवात झाली. ई-कॉमर्स त्यासाठी कारण ठरलं. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट आणि त्यांची ‘फुलफिलमेंट सेंटर्स’ म्हणजे मावळत चाललेल्या जगातली शोरूम्स आणि गोडाऊन मानता येतील. शोरूमची जागा ई-कॉमर्सनं व्यापायला सुरुवात झाली आहे. कंपन्यांची गोडाऊन्स ‘फुलफिलमेंट सेंटर्स’मध्ये बदलत चालली आहेत.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जगाच्या भविष्याचा नियमित आढावा घेतला जातो. नफा मिळविण्याच्या हेतूनं स्थापन झालेल्या कंपन्यांच्या ताब्यात एनजीओ म्हणून तयार झालेला हा फोरम आहे, अशी टीका अधूनमधून होते. दावोसला फोरमची दरवर्षी परिषद भरते. परिषदेचा मुख्य हेतू भविष्यात काय घडू शकेल, याची चाचपणी करण्याचा आणि त्यादृष्टीनं बिझनेसची नवी क्षेत्रं निवडण्याचा असतो. त्यामुळं, भोवतीचं जग किती बदलणार आहे, याची झलकही आपल्याला दावोसमध्ये सापडते. जसा उत्पादन उद्योगांवर इंटरनेट आणि जोडलेलं जग परिणाम करणार आहे, तसंच ते आरोग्य क्षेत्राला पूर्ण बदलवून टाकणार आहे, असं फोरममध्ये सांगितलं जातं आहे. हेल्थटेक कंपन्यांमध्ये जगातल्या धनाढ्यांना आणि गुंतवणूकदारांना म्हणूनच अधिक रस आहे. इंटरनेटचा वेग आणि व्याप्ती जसजशी वाढते आहे, तसतसं शारीरिक-मानसिक आजारांवर, अचानक उद्‌भवणाऱ्या संसर्गजन्य रोगांवर सामूहिक संशोधनातून मार्ग काढण्याचं प्रमाण वाढतं आहे. आजचा कोरोनाव्हायरस कदाचित शंभर वर्षांपूर्वी आला असता, तर लाखो लोकांचे प्राण गेले असते. व्हायरसचे बळी आपण आजही पूर्णतः रोखू शकलो नसलो, तरी संख्येनं ते मर्यादित राहिले आहेत. इंटरनेटची ही किमया आहे. येत्या काळात वेअरेबवल डिव्हाईसेसचं प्रमाण वाढत जाईल, तशी आपल्या शरीराची नव्यानं ओळख व्हायला लागेल. आजारी पडण्याआधीच तशा सूचना मिळायला लागतील. त्यावरच्या उपचारांची जंत्री हाती असेल. स्वतःला आजारी पडण्यापासून रोखणं अगदीच अशक्‍य राहणार नाही. आज-उद्या हे तंत्रज्ञान हाती येईल, असं नाही. मात्र, तो दिवस अशक्‍य नाही, याची साक्ष ‘गूगल फीट’ आजच देत आहे.

आरोग्यसेवेचंही ‘वैयक्तिकीकरण

इंटरनेट, त्यातून मिळणारा डेटा, त्या डेटाचा अर्थ लावणारं ऍनॅलिसिस, ‘एआय’चं अल्गॉरिदम आणि व्यक्तिगत पातळीवरच्या गरजांनुसार औषध निर्मिती करणाऱ्या भविष्यातल्या कंपन्या यामुळं हायपर पर्सनलाईज्ड मेडिसिन या क्षेत्राचा उदय होतो आहे. डोकेदुखीसारख्या तुलनेनं क्षुल्लक आजाराचं कारण पित्तापासून अथवा चष्मा लागण्यापासून ते ब्रेन ट्युमरपर्यंत काहीही असू शकतं, हे आजही माहिती आहे. मात्र, एखाद्याच्या डीएनएची रचना, त्यानुसार त्याची शारीरिक वाढ, आजारांची कौटुंबिक हिस्ट्री, अन्न-व्यायामाच्या रोजच्या सवयी अशा गोष्टींची माहिती कदाचित त्या व्यक्तीलाही नाही. वेअरेबल डिव्हाईसेसमधली प्रगती ही माहिती इंटरनेटवर नोंदवत राहील. त्या व्यक्तीला सुटेबल अशीच मेडिसिन सुचवली जातील. ती उपलब्ध करून देण्याचं काम ई-कॉमर्सच्या माध्यमातून होईल. अमेरिकेतल्या बोस्टन चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये ॲटॅक्‍सिया-टेलॅन्जिएक्‍टेशिया (एटी) नावाच्या मेंदूशी संबंधित दुर्मिळ रोगावर संशोधन चालतं. रुग्ण लहान मुलं आहेत. प्रत्येकाच्या डीएनए रचनेनुसार उपचाराची पद्धत एटीमध्ये वापरली जाते. डेटा, त्याचे मॉडेलिंग आणि त्यातून नव्या उपचारपद्धतींवर जगभरातून मिळणारा सल्ला-त्यांचे अनुभव या हायपर पर्सनलाईज्ड मेडिसिनमध्ये वापरले जात आहेत. उद्याच्या जगामध्ये डोकेदुखीवर केमिस्टच्या दुकानात जाऊन ‘साधी गोळी द्या’ असं सांगून मिळेल ती गोळी गिळण्याची वेळ येणार नाही. जे औषध गरजेचंच असेल, ते मागवता येईल. त्यासाठी ॲप खिशातल्या मोबाईलवर असणं फार दूर राहिलेलं नाही.

‘आयओटी’चा नवा मंत्र

सतत खिशाशी असलेला मोबाईल अधिकाधिक संपन्न होण्याचा उद्याचा काळ आहे. मोबाईलच्या संख्येत आणि वापरात आपण भारतीय आघाडीवर आहोत; मात्र स्मार्टफोनमध्ये आजही भारत मागं आहे. फोर-जी इंटरनेट कनेक्टिविटी आता कुठं शहरांमध्ये स्थिरावते आहे. येत्या दशकात ती वाढणार आणि एका बाजूला फाईव्ह-जी मोबाईल कनेक्‍टिविटी सुरू असतानाच फोर-जी फोनची संख्या आगामी तीन वर्षांत दुप्पट होईल. जगभरात सुरू असलेल्या संशोधनाचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या उत्पादनांचा लाभ घेणं भारतीयांसाठी अप्राप्य राहणार नाही. ती उत्पादनं आरोग्य क्षेत्रातली असोत वा ऑटोमोबाईल; ‘हायपर पर्सनलाईज्ड’ गोष्टींपासून भारतीयांना दूर राहावं लागणार नाही. भारतातलं, शिक्षणासारखं क्षेत्र इंटरनेटच्या वाढत्या गतीनं मुळापासून बदलाच्या उंबरठ्यावर आहे. आजच्याच गतीनं शिक्षण क्षेत्राची वाटचाल सुरू राहिली, तर पुढच्या दहा वर्षांत तयार होणारं मनुष्यबळ तेव्हाच्या कौशल्याला पारखं होईल. तशी भीती फक्त भारतातच नव्हे; तर जगभरात व्यक्त होत आहे. त्यामुळं, शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. इंटरनेट ऑफ थिंग्ज- आयओटी (म्हणजे इंटरनेटनं जोडली गेलेली उपकरणं- उदाहरणार्थ, वॉशिंग मशिन, टीव्ही, फ्रीज, कुकर, ॲमेझॉन ॲलेक्‍सा, ऍपलची सिरी, फिटनेस उपकरणं आदी) वाढत जातील आणि शिक्षण क्षेत्रात ती वेगानं पसरतील, अशी भाकितं वर्तवली गेली होती. ती भाकितं खरी ठरण्याचा काळ तीन-चार वर्षांवर येऊन ठेपलाय. भारतात आजघडीला १५० कोटी उपकरणं जोडलेली आहेत. ती संख्या २१० कोटींवर पोचलेली असेल. शिक्षण क्षेत्रात त्याची गती वाढेल. इंटरनेटवर माहिती साठवणं आणि ती माहिती हव्या त्या क्षणी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये उपलब्ध करून देणं ‘आयओटी’ आजपेक्षा कित्येक पटींनी अधिक सोपं बनवेल. इंटरनेट आणि मोबाईल इंटरनेटमुळं हव्या त्या अभ्यासक्रमाचं शिक्षण घेण्याची प्रक्रिया जशी गतिमान बनेल, तशीच व्यक्तिगत गरजांनुसार शिक्षणाची नवी व्यवस्था जोर धरेल. पर्सनलाईज्ड एज्युकेशन ही संकल्पना अशक्‍य राहणार नाही. घाऊक शिक्षणाच्या बाजारपेठांचा भर ओसरत जाणार आहे. अत्यंत नेमक्‍या आणि तरीही वेगवेगळ्या विद्याशाखांचा समन्वय असलेलं शिक्षण उद्याची गरज बनणार आहे.

‘शेअर्ड’ व्यवस्थेची मानसिकता

एका फार मोठ्या बदलाची सुरुवात आपण आजही नकळत अनुभवतो आहोत, ती म्हणजे शेअर्ड व्यवस्थेची. उबर-ओला हे त्याचं रूप. गरजेनुरूप वस्तू-गोष्टी वापरण्याची मानसिकता रुढ होण्याची ही सुरुवात आहे. कारमधून प्रवास करण्यासाठी ती विकत घेण्याची आवश्‍यकता नाही. हवी तेव्हा कार उपलब्ध असली, तरी पुरेसं आहे. मग, पैसे गुंतवण्यापासून ते मेन्टेनन्स, ड्रायव्हिंग असल्या कटकटींपासून आपोआप सुटका होते. इंटरनेटशिवाय उबर-ओला कंपन्या अस्तित्वात नसत्या. शेअर्ड वस्तूंची इकॉनॉमी इंटरनेटसोबत आणखी वाढणार आहे. घरगुती वस्तू ‘भाड्यानं’ घेण्याची मानसिकता आताशी तयार होते आहे. ती मानसिकता पुढच्या काळात स्वतंत्र उद्योगांना जन्म देणारी ठरणार आहे. को-वर्किंग स्पेपेससारख्या संकल्पनांनना पुणे, मुंबई, बंगळूरमध्ये मूर्त स्वरूप येऊ लागलं आहे, तर टीव्हीपासून मिक्‍सरपर्यंत कोणतीही वस्तू भाड्यानं देणारी ‘रेन्टोमोजो’सारखी ॲप्स पुढच्या पाच वर्षांत महानगरं व्यापून शहरांमध्ये विस्तारलेली असतील. हवं तेव्हा, हव्या त्या प्रकारचं मनोरंजन उपलब्ध करून देणारे नेटफ्लिक्‍स, ॲमेझॉन प्राईमसारखे ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा फेसबुक-ट्विटर-इन्स्टाग्राम-युट्यूब या सोशल मीडिया जाळ्याचा विस्तार हा मुद्दा भविष्यातही आहेच. या प्लॅटफॉर्ममधून निर्माण होणाऱ्या माहितीवरची प्रक्रिया आणि त्यानुसार पर्सनलाईज्ड आवडीनिवडींवर भर देणाऱ्या कन्टेंटचा ‘पुरवठा’ येत्या काळात वाढेल.

इतक्‍या साऱ्या भौतिक बदलांचा समाज म्हणून आपल्यावर काहीच परिणाम होणार नाही...? जरूर होणार आहे. इंटरनेटनं जोडलेलं जग अस्तित्वात आलं, तसा सोशल मीडिया आला आणि त्यानं ‘फ्रीडम ऑफ एक्‍स्प्रेशन’ला, अभिव्यक्तीला नवा आयाम दिला. आपल्याला आवाज आहे, ही जाणीव व्यक्तींना जशी सोशल मीडियानं दिली; तशीच या आवाजाला ‘वेळीच दाबण्याची’ भावनाही राज्यकर्त्यांमध्ये पसरली. जनतेच्या भावनांचा अल्गॉरिदम शोधण्यासाठी राज्यकर्त्यांची धडपड फक्त भारतातच नव्हे; सर्वत्रच सुरू आहे. अल्गॉरिदम समजलेल्या राज्यकर्त्यांमध्ये ‘बिग ब्रदर’ची प्रवृत्ती पसरण्याचा धोका आगामी काळात उभा आहे. स्वातंत्र्याच्या मूलभूत मानवी आकांक्षाच ‘बिग ब्रदर’ला रोखू शकतात, असं आतापर्यंतच्या वैज्ञानिक काल्पनिक कथांनी आपल्याला सांगितलं आहे. ‘इंटरनेटसत्ताक’ व्यवस्थेकडं वाटचाल करताना स्वातंत्र्याची ही आकांक्षा सतत जागती ठेवणं, आपल्या हाती आहे.

- सम्राट फडणीस
Editor,Sakal,pune 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या