मुंबई: मराठी वृत्तवाहिन्यांच्या दुनियेत नेहमीच चर्चेत असणारे, आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार आणि अँकर प्रसन्न जोशी पुन्हा एकदा चॅनल बदलण्याच्या तयारीत आहेत. 'एबीपी माझा'मधील आपला तिसरा टप्पा ( २००७ ते २०१५ , २०१८ ते २०२० , २०२४ ते २०२५ ) पूर्ण करून ते आता 'पुढारी' वृत्तवाहिनीमध्ये प्रवेश करत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यांच्या या 'घरवापसी'मुळे माध्यम वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
प्रसन्न जोशी यांचा वृत्तवाहिन्यांमधील प्रवास नेहमीच चढ-उतारांचा राहिला आहे. 'एबीपी माझा'मधून आपल्या कारकिर्दीला मोठी ओळख मिळवल्यानंतर त्यांनी 'जय महाराष्ट्र', 'साम टीव्ही', 'बीबीसी मराठी' आणि 'पुढारी' असा प्रवास केला होता. त्यानंतर सहा महिन्यापूर्वी 'एबीपी माझा'च्या संपादिका सरिता कौशिक यांनी सुरू केलेल्या 'झिरो अवर' या डिबेट शोसाठी त्यांना पुन्हा एकदा 'माझा'मध्ये मोठ्या अपेक्षेने आणण्यात आले होते. मात्र, हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत म्हणावा तसा प्रभाव पाडू शकला नाही.
आता पुन्हा एकदा त्यांनी 'पुढारी'ची वाट धरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या टीआरपीच्या स्पर्धेत काहीशा मागे असलेल्या 'पुढारी' वृत्तवाहिनीला प्रसन्न जोशींसारख्या अनुभवी चेहऱ्यामुळे नवी ऊर्जा मिळेल, अशी आशा व्यवस्थापनाला आहे. तर दुसरीकडे, 'एबीपी माझा'सारखी आघाडीची वाहिनी सोडून पुन्हा 'पुढारी'मध्ये जाण्याचा जोशी यांचा निर्णय धाडसी मानला जात आहे.
या बदलामुळे 'पुढारी'च्या प्रेक्षकसंख्येत आणि टीआरपीमध्ये कितपत फरक पडणार, तसेच प्रसन्न जोशी आपल्या नव्या इनिंगमध्ये कोणती जादू दाखवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या