दिव्य मराठीचा नवा प्रयोग संपादक संजय आवटे यांच्या अंगलट !

औरंगाबाद -     सकाळी ७.३० वाजता लगबगीने महाविद्यालयाकडे निघालेल्या एका २४ वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भररस्त्यात पेटवून दिल्याची संतापजनक घटना सोमवारी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली. तरुणीला पेटवल्याचे पाहताच काही शाळकरी मुलींनी आरडाओरड करीत जवळपासच्या मदतीची याचना केली. त्या वेळी धावत येऊन नागरिकांनी तत्काळ तरुणीच्या अंगावर पाणी ओतून आग विझविली. या घटनेत ही तरुणी ४० टक्के भाजली असून नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत आहे. विशेष म्हणजे आरोपी विकेश ऊर्फ विकी नगराळे (२९) विवाहित असून एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

या संतापजनक घटनेची बातमी देताना दिव्य मराठीने संतापजनक प्रकार केला आहे. पान 1 वर फुल्ल पेज  पीड़ित प्राध्यापक महिलेचा अर्धवट जळालेला फोटो प्रसिद्ध केला आहे.  भयंकराच्या दारात असे कॅप्शन देऊन विचार करा,ही तुमची लेक आहे, मग तुमचे अंतःकरण जळेल असे आवाहन देखील केले आहे. 
 दिव्य मराठी ईपेपरची लिंक-  दिव्य मराठी पाहा...

हा नवा प्रयोग आहे, असे संपादक संजय आवटे यांचे म्हणणे आहे, हे पेज जास्तीत जास्त लोकांनी शेयर करा असे आवाहन देखील त्यांनी अनेक व्हाट्स अँप ग्रुप आणि फेसबुकवर केले आहे.

पण वाचकानी जेव्हा सकाळी सकाळी  दिव्य मराठीचा अंक पाहिला तेव्हा  घटनेचा संताप येण्याऐवजी दिव्य मराठीवर संताप व्यक्त केला. असा भयंकर फोटो प्रसिद्ध करताना पत्रकारितेचे सर्व मापदंड धाब्यावर बसवण्यात आले आहेत. वाचकांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आवटे यांनी दिव्य मराठीचे पेज जेव्हा फेसबुक वर पोस्ट केले  तेव्हा फेसबुक ने सुद्धा तो फ़ोटो बाद करून हाईड केला आहे.
This Photo may show violent or Graphic cantent असा मेसेज येत आहे. दिव्य मराठीचा नवा प्रयोग संपादक  संजय आवटे  यांच्या अंगलट आला आहे. संजय आवटे यांच्या फेसबुक पेजवर नेटिझन्सने झोडपले आहे.
या प्रयोगाला काय म्हणावे ?

दिव्य मराठी दैनिकाने आज हिंगणघाटमधील दुर्दैवी घटनेचा पानभर फोटो छापला. त्या महिलेच्या दुर्दैवाचे दशावतार मोठ्या आकारात वाचकांपर्यंत पोहचवले. असा अघोरी प्रयोग खरेच गरजेचा होता ?

हो किंवा नाही च्या बाजूने पत्रकारांनी बोलायला हवे.

अपघातातील मृतांचे फोटो, बलात्कार झालेल्यांचे फोटो, बालगुन्हेगारांचे फोटो, ओळखपरेडपूर्वी आरोपीचे फोटो शक्यतो छापू नये हा अलिखित नियम सर्वजण पाळतात. त्याच मालिकेत आजचाही फोटो येत होता की नव्हता ? यावर मत मांडावे.

माझे मत -
या फोटोमुळे दिव्य मराठीची खूप विश्वासार्हता वाढली असे तर काही नाही. बरे एवढे मोठे छापून समाजमनात कालवा कालव होईल असेही नाही. मग कोणाच्या अट्टहासाखातर हे घडले असावे ? 

- दिलीप तिवारी, ज्येष्ठ पत्रकार, जळगाव