आदिनाथ चव्हाण ‘ॲग्रोवन’च्या संपादक-संचालकपदी

पुणे : ‘ॲग्रोवन’ या कृषी दैनिकाच्या संपादक-संचालक पदी आदिनाथ चव्हाण यांची पदोन्नतीसह नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते ‘ॲग्रोवन'च्या संपादकपदी काम करत आहेत.

देशातील एकमेव कृषी दैनिक असणाऱ्या ‘ॲग्रोवन'ने गेल्या पंधरा वर्षांपासून शेती, शेतीपूरक उद्योग, कृषी संशोधन आणि ग्रामविकास क्षेत्रांमध्ये स्वतःचा ठसा उमटवत असताना राज्यातील असंख्य शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेतीचा विचार आणि अनुषंगिक संशोधन पोचवून त्यांच्या व्यवसायात आणि रोजच्या जगण्यात अमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. 

चव्हाण गेली ३१ वर्षे ‘सकाळ माध्यम समूहा’त कार्यरत असून ‘ॲग्रोवन'च्या संपादकपदाची जबाबदारी स्वीकारण्याआधी त्यांनी ‘सकाळ'च्या संपादकीय विभागात विविध पदांवर काम केले आहे. ‘ॲग्रोवन'चे संपादक म्हणूनही त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली. कृषी क्षेत्रातील बदलांवर त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. ‘ॲग्रोवन'द्वारा कृषी क्षेत्राला निश्‍चित दिशा देण्याच्या ‘सकाळ माध्यम समूहा'च्या प्रयत्नांमध्ये त्यांचा लक्षणीय सहभाग आहे. शेती आणि ग्रामीण विकासासाठीच्या अनेक उपक्रमांतही त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. 

शेतकऱ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम आणि आधुनिक शेतीसाठी आवश्‍यक असणारी कौशल्ये राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यात ‘ॲग्रोवन'च्या माध्यमातून चव्हाण यांनी योगदान दिले आहे.

‘ॲग्रोवन’चे संपादक-संचालक म्हणून चव्हाण यांच्याकडे ‘ॲग्रोवन'शी संबंधित सर्व घटकांच्या समन्वयाबरोबरच ‘ॲग्रोवन’च्या पुढच्या वाटचालीची दिशा ठरवण्याची मुख्य जबाबदारी असेल.